धीरूभाई अंबानी आणि नसली वाडिया ही भारतीय उद्योग जगतातील बलाढ्य अशी नावे आहेत. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स उद्योग समूहाची स्थापना केली. तर मुंबईमध्ये पारशी कुटुंबात जन्मलेले नसली वाडिया हे बॉम्बे डाईंगचे चेअरमन होते. नसली वाडिया यांची अजून खास ओळख सांगायची झाली तर, पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचे आणि रतनबाई दिनशॉ पेटिट यांचे नातू होते. तसेच वाडिया यांच्या आईची आजी ही जे.आर.डी टाटा यांची मोठी बहीण होती.
तर मंडळी, धीरूभाई अंबानी यांनी लहानपणी बाजारात भाजी विकून, पेट्रोल पंपावर काम करुन शून्यातून रिलायन्स इंडस्ट्रीची स्थापना केल्याचे आपण अनेक ठिकाणी वाचले असेलच. तर नसली वाडिया यांचा बॉम्बे डाईंग हा वंशपरंपरागत टेक्सटाईलचा व्यवसाय होता. ७० चे शतक आले तेव्हा धीरूभाई अंबानी हे पॉलिस्टर किंग म्हणून ओळखले जाऊ लागले होते. व्यवसायाच्या बाबतीत धीरूभाई हे प्रचंड महत्वाकांक्षी होते, त्यासाठी प्रसंगी कायदे नियम मोडायचीही त्यांची तयारी असायची. दुसऱ्या बाजूला नसली वाडिया सर्व गोष्टी कायद्याच्या चौकटीत करण्यावर भर द्यायचे.
१९८० च्या दशकात धीरूभाईंनी रिलायन्सचा व्यापार ३००० कोटींपर्यंत वाढवला होता. तर वाडियांचा व्यापार ३०० कोटींपर्यंतच अडकला होता. त्यावेळी धीरूभाई आणि वाडिया हे एकमेकांचे कट्टर स्पर्धक बनले होते. त्याकाळी उदयाला आलेल्या पॉलिस्टर इंडस्ट्रीवर ताबा मिळवणे हा दोघांचा हेतू होता.
धीरूभाईंना पीटीए केमिकलपासून तर वाडियांना डीएमटी या केमिकलपासून पॉलिस्टर धागा बनवून या इंडस्ट्रीवर आपले वर्चस्व गाजवायची होते. परंतु काळाच्या ओघात पॉलिस्टर निर्मितीसाठी डीएमटी ऐवजी पीटीएला प्राधान्य मिळायला सुरुवात झाल्याने धीरूभाई-वाडिया वादात धीरूभाईंची सरशी झाली.
वाडियांना डीएमटीपासून पॉलिस्टर बनवण्याचा प्रोजेक्ट सुरु करायचा होता, परंतु केंद्रातील सरकार त्यांना परवानगी देत नव्हते. जनता पार्टी सरकारने परवानगी दिल्यानंतर वाडियांनी मशिनरी आणली, पण परत सरकार बदलल्याने त्यांचा प्रोजेक्ट थंडावला. त्याकाळी इंडियन एक्सप्रेस समूहाचे रामनाथ गोयंका हे धीरूभाईंचे चांगले मित्र होते. त्यांच्या वृत्तपत्राच्या मदतीने धीरूभाईंनी वाडियांच्या डीएमटी प्रोजेक्टच्या मशिनरी आणि उत्पादित मालाची गुणवत्ता निकृष्ट असल्याच्या बातम्या चालवल्याचे आरोपही झाले. पण तोपर्यंत धीरूभाई हे केंद्रातील सरकारचे एकदम खास बनले होते. धीरूभाई-वाडिया वाद टोकाला गेला होता.
दरम्यान १९८९ साली मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त वसंत सराफ आणि सहआयुक्त इनामदार यांनी “धीरूभाई अंबानी यांनी नसली वाडियांच्या ह त्येची सुपारी दिली” असा गौप्यस्फोट करुन देश हादरून सोडला. त्यावेळी महाराष्ट्रात शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यावेळी पोलिसांची तपासचक्रे फिरली. संशयितांना अटक झाली. तेव्हा वाडिया यांच्या घरावर पाळत ठेवल्याप्रकरणी रिलायन्स उद्योग समूहाचे अधिकारी कीर्ती अंबानी यांना अटक झाली.