माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे जेष्ठ नेते दिलीप गांधी यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. ७० वर्षीय गांधी यांनी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. दिलीप गांधी हे नगरचे ३ वेळा खासदार होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिपद देखील भूषवलं. नगरसेवक ते केंद्रीय मंत्री हा दिलीप गांधींचा प्रवास खूप संघर्षमय राहिला.
दिलीप कुमार मनसुखलाल गांधी यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातला. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण देखील पुण्यातच झालं. ९ मे १९५१ ला जन्मलेल्या दिलीप गांधी यांचे १० वी पर्यंत शिक्षण झालेलं. त्यांचे वडील श्री मनसुखलाल श्रीमालजी गांधी हे एक व्यापारी होते तर आई विमलबाई या गृहिणी. पुणे जिल्ह्यात जन्मलेल्या गांधींचं कुटुंब पुढे नगरला स्थायिक झालं.
नगरमध्ये दिलीप गांधी यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांना सुरुवातीपासूनच समाजकार्याची आवड होती. याशिवाय त्यांना हिंदुत्वाची देखील आवड लागली. दिलीप गांधी हे सुरुवातीला नगरपरिषद मधील विविध योजनांसंदर्भात समुपदेशक म्हणून काम करायचे. याच कामातून त्यांचा संपर्क भाजपसोबत आला. त्यांनी नंतर भाजपमध्ये काम सुरु केलं.
दिलीप गांधी हे भाजपमध्ये एक एक करत पायऱ्या चढत गेले. सुरुवातीला ते भाजपचे युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष बनले. नंतर त्यांनी नगरपालिका निवडणुकीत विजय मिळवून नगरसेवक पद मिळवलं.एवढ्यावरच न थांबता आपल्या कामामुळे त्यांना उपनगराध्यक्ष पद देखील मिळाले. १९८५ ते १९९९ त्यांनी नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं.
दिलीप गांधी हे यांना त्यांच्या कामामुळे आणि लोकप्रियतेमुळे १९९९ ला लोकसभेचे तिकीट मिळाले. ते मोठ्या मताधिक्याने जिंकले आणि पहिल्यांदा खासदार बनले. आपल्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना थेट अटल बिहारींच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपद देखील मिळालं. २९ जानेवारी २००३ ते १५ मार्च २००४ या कालावधीत ते केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री होते. पुढे २००४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना राष्ट्रवादीच्या तुकाराम गडाख यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला.
पराभवानंतरही दिलीप गांधी थांबले नाहीत. आपला जनसंपर्क कायम ठेवला. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवाजीराव कर्डीले यांचा पराभव करत पुन्हा खासदारकी मिळवली. २०१४ च्या मोदी लाटेत तर दिलीप गांधी २ लाखाहून अधिक मतांनी निवडून आले होते. २०१९ ला मात्र काँग्रेसमधून आलेल्या सुजय विखे यांच्यामुळे त्यांचं लोकसभेचे तिकीट कापले गेले.
केंद्रीय मंत्री राहिलेला, ३ वेळा खासदार राहिलेला हा नेता पक्षाने तिकीट कापल्यावरही भाजपसोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिला. पक्षाचे कट्टर कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी नेते अशी त्यांची ओळख होती. काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार अनिल राठोड यांचेही करोनामुळे निधन झाले. नगरचे दोन हिंदुत्ववादी नेते करोनामुळे गमावल्याच्या भावना नगरकरांमध्ये आहेत.