नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील सांगवी गावच्या अत्यंत गरीब कुटुंबातील एका मुलीने प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आणि तिची उपजिल्हाधिकारी निवड झाली. आई वडील मोल मजुरी करायचे, भाऊ रिक्षा चालवायचा. एवढ्या गरीब परिस्थितीतून तिने हे यश मिळवले. सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला, सत्कार समारंभ झाले. पण तिला आजही संघर्षच करावा लागत आहे.
हि मुलगी आहे नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील सांगवी गावची शेख वसिमा मेहबुब. वसिमाने जून २०२० मध्ये राज्यसेवा परीक्षा पास केली. वडिलांना मानसिक आजार, त्यात घरची परिस्थिती हलाखाची. पण वसिमाला भावाने रिक्षा चालवून साथ दिली. शिक्षणाला लागणार खर्च करणे देखील त्यांच्याकडून शक्य नव्हते. त्यामुळे वसीमाने स्वतःचा अभ्यास केला.
वसीमाचे सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच झाले. पुढे कंधारला १२ वि पर्यंत शिक्षण घेतले. चांगले मार्क असूनही तिला परिस्थितीमुळे डीएडला ऍडमिशन घ्यावे लागले. पण पुढे सीईटी परीक्षाच झाली नाही. मुक्त विद्यापीठातून तिने बीएची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला. क्लास लावण्यासाठी पैसे नव्हते म्हणून सेल्फ स्टडी केला.
तयारी करतानाच तिचे लग्न घरच्यांनी लावून दिले. पण नंतरही तिने तयारी सुरूच ठेवली. घरच्या परिस्थितीची जान असल्याने तिने प्रचंड मेहनत घेतली. आई वडिलांच्या कष्टाची देखील तिला परतफेड करायची होती. तिने स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून एसटीआय पद मिळवले. नागपूर येथे विक्री कर निरीक्षकपदी नियुक्ती झाली.
पण तिला IAS व्हायचं स्वप्न काही शांत बसू देत नव्हतं. तिने अभ्यास सुरूच ठेवला आणि एमपीएससी मध्ये यश मिळवून उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली. पण तिच्या नशिबात या पदासाठी संघर्ष आला. कारण आता १० महिने उलटूनही तिला नवीन नियुक्ती मिळाली नाही. आयुष्याचे ७-८ वर्ष या पदासाठी लावल्यानंतर यश मिळूनही पद मिळत नसल्याने ती हताश आहे.
उपजिल्हाधिकारी बनल्यानं अत्यानंद झाला, पण नियुक्ती नसल्यानं आज तेवढचं दु:ख होतंय असं वसिमा म्हणते. नियुक्तीला होणाऱ्या विलंबामुळे आमचं आर्थिक नुससान तर होतंय, पण मानसिक खच्चीकरणही होतंय. खरंच, उपजिल्हाधिकारी झालाय का? अशा कुत्सित प्रश्नांच्या नजरा आमच्याकडे फिरतात, असे म्हणत वसिमा यांनी नुकताच आपला संताप व्यक्त केलाय.
काही दिवसांपूर्वी नायब तहसिलदार प्रवीण कोटकर यांचे एक ट्विट मोठ्या प्रमाणात वायरल झाले होते. त्यांचीही १० महिन्यांपासून नियुक्ती झाली नाहीये. प्रवीण यांच्यावर तर आज शेती करण्याची वेळ आली आहे. शिवाय समाजात टोमणे खावे लागत आहेत. प्रवीण कोटकर यांच्यासारखीच वसिमा यांचीही अवस्था आज बनलीय.