नुकतंच एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये एक आई अन एक मुलगा होता. आपल्या डोक्यावरील पीएसआयची टोपी आईच्या डोक्यावर ठेवलेली, तर हातातील छडीही आईच्या हाती दिलेली. यावेळी, आईच्या खुललेला चेहरा अन् उमटलेलं हास्य अवर्णनीय असेच या फोटोत दिसत आहे. सोबत या फोटोला कॅप्शन आहे ‘कष्टाचं चीज झालं’. मनाला भावणारा हा प्रसंग या फोटोमध्ये दिसला.
या फोटोतील तो तरुण आहे पीएसआय सचिनकुमार तरडे. गावाकडे शेतात राबणाऱ्या आईवडिलांचं पोराला सरकारी नोकरी मिळावी हे स्वप्न सचिनकुमारने मोठ्या मेहनतीने पूर्ण केलं आहे. सचिनच्या आईला नेहमी वाटायचं आपला मुलगा मोठा साहेब व्हावा, आपल्या घराण्याचं नाव काढावं. म्हणजे, गावात ताठ मानेनं जगात येत, अभिमानानं चालता येतं. अन आईवडिलांचं हे स्वप्न पूर्ण करूनच सचिनकुमार तरडे खांद्यावर स्टार, डोक्यावर खाकी टोपी अन् हातात पोलीस इन्स्पेक्टरची काठी घेऊन थाटात गावात आले.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कचरेवाडी हे छोटंसं खेडेगाव. गावातील तरडे हे अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंब. तरडे कुटुंबात एक मुलगा जन्मला. या मुलाला या शेतकरी आई वडिलांनी कष्ट करून शिकवलं. शेतीत राबले, काबाड कष्ट केले. पण मुलाला शिक्षणात काही कमी पडू दिलं नाही. गावात प्राथमिक शिक्षण झाल्यावर सचिनकुमारला त्यांनी माळशिरस तालुक्यातील सदाशिवराव माने विद्यालयात घातलं. दहावी झाली. नंतर सचिनकुमारने माळशिरस येथील गोपाळराव देवक प्रशालेत बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
शिक्षणाची आवड सचिनला लागली होती. शिक्षणासाठी पुण्याला जायचं ठरलं. सचिनकुमार पुण्यात आला. बीएला प्रवेश घेतला. बीएला प्रवेश घेतल्यानंतर सचिनने अधिकारी होण्याची गाठ मनाशी बांधली. एमपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. बीए झाल्यावर एकीकडे अर्थशास्त्र विषयात एमए पूर्ण करतानाच दुसरीकडे स्पर्धा परीक्षेचीही जोरदार तयारी त्याने केली.
स्पर्धा परीक्षांचं माहेरघर असलेल्या पुणे शहरातच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यामुळे सचिनकुमारला एमपीएससीचा अभ्यास करण्यास फायदा झाला. २०१७ मध्ये सचिनकुमारने PSI पदाची पूर्व परीक्षा दिली. या परीक्षेत यश मिळालं. २० ऑक्टोबर २०१८ रोजी मुख्य परीक्षा झाली. त्यातही यश मिळवलं अन शारीरिक चाचणी देखील झाली. ८ मार्च २०१९ रोजी पीएसआय परीक्षेचा निकाल लागला. या शेतकऱ्याच्या मुलाला परीक्षेत यश मिळालं होतं. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षण सुरु झालं.
७ जानेवारी २०२० रोजी १५ महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि स्पर्धा परीक्षेच्या काळात ज्या शहरात शिक्षण झालं, जिथे पोटाला चिमटे दिले, धडपड केली, त्याच पुणे शहराची सेवा करण्याचं भाग्य लाभ सचिनकुमारला लाभलं. पुणे शहरमध्येच पीएसआय म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली. ७-८ वर्षाच्या संघर्षानंतर मिळवलेल्या नोकरीवर रुजू झाल्यानंतर प्रथमच गाव गाठलं. आपल्या लेकाला फौजदारकीच्या रुबाबदार पेहरावात पाहून आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना. तर, गावकऱ्यांनाही भूमिपुत्राचा अभिमान वाटला, मित्रपरिवारानेही थाटामाटात स्वागत केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमिमुळे आई-वडिलांना ट्रेंनिगच्याठिकाणी ऑर्डर स्विकारतानाच्या कार्यक्रमाला नेता आलं नाही. पीएसआय पदी रुजू झाल्यानंतर आईच्या पहिल्या भेटीचा ‘कष्टाचं चीज झालं’, असं कॅप्शन देऊन शेअर केला. हा फोटो महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल झाला. एका शेतकरी आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या पीएसआय सचिनकुमार तरडे याना पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा.