भारतात असे असंख्य IAS, IPS अधिकारी आहेत ज्यांना त्यांच्या कार्यकाळापुरतं ओळखलं जातं. पण काही असे अधिकारी आहेत ज्यांना आपल्या कामाच्या बळावर जिल्हा राज्यच नाही तर अक्खा देश ओळखतो. प्रामाणिकपणे काम करणे, धडाकेबाज कामगिरी करून ते अधिकारी एवढे ध्येयवेडे बनलेले असतात कि त्यांना कुठल्याच राजकीय नेत्याचा द बाव देखील काम करण्यापासून रोखू शकत नाही. असेच एक अधिकारी आपल्या महाराष्ट्राच्या मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात एका शेतकऱ्याच्या पोटी जन्मले. ज्यांच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात १५ पेक्षा जास्त वेळा बदल्या झाल्या. जाणून घेऊया या ध्येयवेड्या कलेक्टरचा जीवनप्रवास..
बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पासून जवळच असलेल्या ताडसोन्ना हे गाव. गावाची लोकसंख्या जवळपास ५००० च्या घरात. बीड जिल्हा म्हंटलं कि दुष्काळ आलाच. मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे हे दुष्काळग्रस्त आहेत. ताडसोन्ना गावातील सर्वच लोकं देखील शेती आणि मजुरी करून आपली उपजीविका चालवायचे. गावातील सर्वच शेती हि कोरडवाहू. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतीत राबल्यावर त्यांच्या संसाराचा गाडा चालायचा. गावातील बहुतांश शेतकऱ्यांचं हे हातावरच पोट होतं. याच गावातील हरिभाऊ मुंढे या शेतकऱ्यावर तर साव काराच्या क र्जाचा डोंगर होता. आसराबाई आणि हरिभाऊंना २ मुलं झाली. मोठा अशोक तर छोटा तुकाराम.
अगदी प्रतिकूल परिस्थिती असूनही आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं अशी त्यांची इच्छा होती. गावात चांगली शाळा नव्हती. दुसरीकडे कुठे मुलाला शाळेत टाकणे शक्य नव्हतं. परिस्थितीमुळे ते अशक्य होतं. १९८०-९० चा तो काळ होता. तेव्हा इंग्लिश, विज्ञान आणि गणिताला शिक्षकच नव्हते अशा शाळेत दहावीपर्यंत मुलाचं शिक्षण झालं. या मुलाचं नाव तुकाराम. आईवडील कर्जबाजारी असल्याने तुकाराम आईवडिलांना शेतातील कामात हातभार लावत असे. चौथीमध्येच असताना शेतात काम करायला सुरु केलं.
आईवडिलांना आर्थिक हातभार लावावा म्हणून चौथीत शिकणाऱ्या तुकारामाला एवढी समज आली होती कि तो उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर शेतात काम करायला नाही म्हणत नसे. तुकारामाच्या मोठ्या भावाला मात्र हरिभाऊंनी बीडला शाळेत टाकलं होतं. महिन्याचा १००-२०० च खर्च होता पण तो देखील देण्यासाठी त्यांना खूप कसरत करावी लागायची. ८-९ वर्षाचा असताना शेती करायला लागलेल्या तुकारामाने १० वी होईपर्यंत शेती केली. परिस्थितीच अशी होती कि त्याशिवाय दुसरा मार्गच त्याच्याकडे नव्हता. सध्या शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा जो त्रास आहे तो तेव्हा देखील होता. तुकाराम अन वडील हरिभाऊला अनेकदा रात्री शेतात जाऊन दारे धरावे लागायचे. थंडीच्या दिवसात देखील त्यांनी रात्री शेतात पाणी दिलं. थोडंच पाणी असायचं पण ते देखील द्यायला रात्री जागावं लागायचं.
शेतात रात्री अपरात्री काम करण्याच्या सवयीमुळेच आयुष्याला कलाटणी मिळाली. परिस्थितीचे भान ते जाणून होते. तुकारामचं दहावीपर्यंतचं शिक्षण गावात झालं. मोठ्या भावाने नंतरच्या शिक्षणासाठी औरंगाबादला नेलं. शहराशी पहिल्यांदाच संपर्क आला होता. खूप अडचणी होत्या. मोठ्या भावाला देखील IAS व्हायचं होतं. पण परिस्थितीमुळे बंधूना ते शक्य झालं नाही. त्यांनी तुकारामला कलेक्टर करायचं ठरवलं. मोठ्या भावाने जेव्हा तुकारामला तुला कलेक्टर व्हायचं असं सांगितलं तेव्हा हे कलेक्टर काय असत हे देखील तुकारामला माहिती नव्हतं. भावाने सांगितलं म्हणून व्हायचं एवढच डोक्यात ठेवलं.
११ वी १२ वी ला सायन्सला प्रवेश घेतला. मोठे भाऊ औरंगाबाद मध्ये क्लास घेत होते. त्यातून ते दोघांच्या राहण्याचा खर्च करायचे. ते सुरुवातीला औरंगाबादला आले तेव्हा २ वेळच्या जेवणाचे देखील त्यांचे प्रश्न असायचे. अनेकदा जेवण कमी असेल तर मोठ्या भावाने उपाशी राहून तुकारामला जेवू घातलं. याच परिस्थितीमध्ये बारावी झाली. अनेक गोष्टी त्या २ वर्षात शिकल्या. भावाचे तहसीलदार म्हणून निवड झाली. ते जे क्लास घ्यायचे ते क्लासेस २ वर्ष तुकाराम ने चालवले. अभ्यास खूप करावा लागला. यातून फायदा झाला. बी ए ला प्रवेश घेतल्यावर अभ्यास सुरूच ठेवला. परिस्थितीची जाण असल्याने खूप अभ्यास करून बीए आणि एमए पूर्ण केलं.
ग्रॅज्युएशन होईपर्यंत UPSC काय असत हे माहिती नव्हतं. अभ्यास सुरु केल्यावर कळलं कि हि परीक्षा काही सोपी नाही. परिस्थिती बिकट होत गेली. पण ते खचले नाहीत. अभ्यास सुरूच ठेवला. पुढे मुंबईला अभ्यासासाठी आले. मुंबईत पहिली परीक्षा दिली. UPSC च्या पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा पास झाले. पण मुख्य परीक्षेत मात्र ते नापास झाले. पुन्हा दुसर्या प्रयत्नात देखील पूर्व परीक्षेत यश आणि मुख्य परीक्षेत अपयश आलं. ध्येय गाठायचंचं हे मनाशी ठरवलेलं होतं. प्रयत्न करणे सोडले नाही. UPSC च्या प्रयत्नात पूर्व आणि मुख्य परीक्षा पास झाले पण मुलाखतीत अंतिम निवड झाली नाही. त्यामुळे आता UPSC ऐवजी MPSC करावं असं त्यांना वाटलं.
मग २००० साली MPSC परीक्षा दिली. हि परीक्षा दिल्यानंतर अंतिम निकाल यायला ३ वर्ष लागले. ३ वर्षात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. पीएचडी चं देखील शिक्षण सुरु ठेवलं. २००३ मध्ये MPSC चा निकाल आला ज्यात क्लास २ पदासाठी निवड झाली. पण UPSC चा शेवटचा राहिलेला प्रयत्न एकदा करावा असं ठरवलं. खूप चांगली तयारी केली. २००४ मध्ये दिलेल्या परीक्षेत पूर्व, मुख्य परीक्षेत यश मिळालं. एप्रिल २००५ मध्ये मुलाखत झाली. ११ मे २००५ रोजी निकाल आला. ज्यात ते देशात विसावे आले होते. एका खेडेगावातून सुरु झालेला तुकारामचा प्रवास कलेक्टर पदापर्यंत पोहचला. या प्रवासामधून प्रयत्न करत राहणे किती महत्वाचे आहे हेच आपल्याला शिकायला मिळालं. त्यांचे मोठे बंधू अशोक मुंढे हे देखील IAS आहेत.