यावर्षीच्या सुरुवातीला इंग्लंड आणि भारतीय संघात सध्या टी२० मालिका झाली. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला होता. पण दुसऱ्या सामन्यात मात्र भारताने जबरदस्त पुनरागमन करत विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली होती. दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने २ नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली.
मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या पहिल्याच सामन्यात ईशान किशनने दणकेबाज फलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याच्या ३२ चेंडूत ५६ धावांच्या खेळीसाठी त्याला करिअरच्या पहिल्याच सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील मिळाला. अवघ्या २२ वर्षीय ईशान किशनने क्रिकेट विश्व गाजवायला आपण तयार असल्याचे पहिल्याच सामन्यात दाखवून दिले होते.
या सामन्याचा मानकरी ठरलेला ईशान किशन रातोरात भारतीयांसाठी हिरो बनला. पण याच हिरोला एकेकाळी अभ्यासात लक्ष नाही म्हणून शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. ईशान किशनने मुंबई इंडियन्स संघाकडून केलेल्या धडाकेबाज कामगिरीनंतर त्याचे नाव चर्चेत आले होते. त्याच्या क्रिकेट मधील आजपर्यंतचा प्रवास खूप संघर्षमय राहिला आहे. जाणून घेऊया याबद्दल..
ईशान किशनचा जन्म १८ जुलै १९९८ रोजी बिहारच्या पटना मध्ये झाला. वडील प्रणव पांडेय आणि आई सुचित्रा सिंह हे एक मध्यमवर्गीय कुटुंब. ईशानचे वडील प्रणव हे रिअल इस्टेटच्या व्यवसायात आहेत. ईशानला एक भाऊ देखील आहे ज्याचे नाव आहे राज किशन. ईशानला घडवण्यात त्याच्या भावाचा देखील मोठा वाटा आहे.
ईशानच्या कुटुंबात क्रिकेटशी कोणाचाच काही संबंध नव्हता. पण ईशानची लहानपणीपासून क्रिकेटमध्ये असलेली आवड आणि त्याची क्षमता वडिलांनी ओळखली आणि त्याला क्रिकेटचे धडे देण्याचे ठरवले. भावाच्या आणि वडिलांच्या विचाराने ईशानला एका क्रिकेट क्लब मध्ये पाठवले. तिथूनच त्याच्या क्रिकेट करिअरची सुरुवात झाली.
ईशानचे त्या क्लब मधील कोच संतोष कुमार यांनी देखील ईशानची प्रतिभा ओळखली. त्यांनी त्यावेळी सांगितले होते कि ईशान हा धोनी आणि गिलख्रिस्टच्या लेव्हलचा विकेटकिपर फलंदाज आहे. ईशानच्या यशात कोच संतोष कुमार यांचा मोठा वाटा आहे. कारण त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे आज ईशान आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसतोय.
झाले असे कि त्यावेळी बिहार क्रिकेट असोसिएशन ची मान्यता BCCI ने रद्द केली होती. त्यामुळे ईशानला संतोष कुमार यांनी दुसऱ्या राज्यात जाऊन क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ईशान रांची मध्ये शिफ्ट झाला. तिथे गेल्यावर ईशानची निवड झारखंडच्या रणजी टीममध्ये झाली. सर्वप्रथम ईशान तेव्हा चर्चेत आला जेव्हा त्याने रणजी सामन्यात दिल्लीविरुद्ध २७३ धावांची खेळी खेळली.
पुढे त्याच्या प्रदर्शनाच्या बळावर त्याला U१९ संघात संधी मिळाली. तिथे देखील त्याने संधीचे सोने केले. नंतर २० व्या वर्षीच आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघाने त्याला खरेदी केले. आयपीएल मध्ये त्याने जबरदस्त प्रदर्शन केले. ज्याचे फळ म्हणून त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. २०१८ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला ६.२ कोटींमध्ये खरेदी केलं होतं.
पण आज हिरो बनलेल्या याच ईशानला एकेकाळी शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. अभ्यासाकडे लक्ष नाही म्हणून ईशानला शाळेने काढून टाकलं होतं. तो शाळेत असताना पुस्तकांवर क्रिकेट संबंधी चित्र काढत बसायचा. सातव्या वर्षी त्याने शाळेत क्रिकेट टीमचे नेतृत्व देखील केले आहे. ईशान किशनच्या नेतृत्वात भारतीय संघ अंडर १९ च्या फायनलमध्ये देखील पोहचला होता.
ईशानने मागील आयपीएल आपल्या आतिषबाजी छक्क्यांनी गाजवले. ईशान किशनला वेगाने गाडी चालवायचा शौक आहे. यासाठी त्याने जेलची हवा देखील खाल्ली आहे. याशिवाय तो पाटण्यात रिजर्व बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून जॉब देखील करायचा.