अशोक सराफ म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेले एक वरदानच आहे. नुसत्या भुवया किंवा मिशा उडवून समोरच्या प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची किमया केवळ अशोक सराफच साधू शकतात. अशोक सराफ हे नाव जरी घेतलं तरी आपल्या डोळ्यासमोर आपल्यातीलच एक वाटावा अशा माणसाचा चेहरा समोर येतो, ज्याच्या शर्टाची वरची दोन बटणे उघडी असतात आणि त्यातून छातीवरच्या केसांचे जंगल नजरेला पडते.
परंतु आपल्या अशोक मामांच्या विनोदी भूमिका आणि त्यातील एक से बढकर एक विनोदी डायलॉग्जमुळे प्रेक्षकांना त्या गोष्टीने फारसा काही फरक पडत नाही. आपल्या भूमिकेला न्याय देऊन प्रेक्षकांच्या लक्षात राहतील अशा व्यक्तिरेखा साकारण्यात अशोक मामांचा हात कुणीही धरू शकणार नाही.
अशोक सराफांच्या प्रवास
मुंबईच्या चिखलवाडी भागात ४ जून १९४७ रोजी जन्मलेल्या अशोक सराफ यांनी मराठी नाटकांमधून अभिनयाची सुरुवात केली. त्यावेळी ते बँकेत नोकरी करायचे. परंतु त्यांची उपस्थिती बँकेत कमी आणि नाटकाच्या मंचावरच जास्त असायची.
दादा कोंडकेंच्या पांडू हवालदार” चित्रपटातील इरसाल पोलिसांच्या भूमिकेने अशोक सराफ हे नाव मराठी चित्रपटसृष्टीत गाजायला लागले. १९८० च्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या विनोदी जोडीने मराठी चित्रपटसृष्टी अक्षरशः हसवून हसवून लोळवली. चाहत्यांचे सर्वाधिक प्रेम मिळालेला कलाकार कोण असेल तर ते अशोक सराफ.
अशोक सराफांच्या शर्टाची दोन बटणे उघडी का असतात ?
अशोक सराफांनाच एकदा हा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी याचे रहस्य उलगडून सांगितले होते. अशोक सराफ सांगतात की, “सुरुवातीच्या काळात जेव्हा माझ्या अभिनय करिअरला सुरुवात झाली, त्याकाळी शर्टाची वरची बटणे लावली की अवघडल्यासारखे वाटायचे आणि त्यामुळे अभिनयावर लक्ष केंद्रित करता येत नसायचे. तसेच शर्टची वरची बटणे उघडी ठेवण्याची त्याकाळी फॅशनच होती. वरची बटणे उघडी ठेवल्याने मोकळंढाकळं वाटायचं आणि म्हणूनच माझ्या अनेक चित्रपटात अभिनय करताना तुम्हाला शर्टची वरची बटणे उघडीच असल्याचे दिसून येईल.”