Friday , January 27 2023
Breaking News
Home / राजकारण / आईसोबत घडलेल्या त्या घटनेमुळे शरद पवारांना मिळाली कॅन्सर विरुद्ध लढण्याची प्रेरणा!

आईसोबत घडलेल्या त्या घटनेमुळे शरद पवारांना मिळाली कॅन्सर विरुद्ध लढण्याची प्रेरणा!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर देशभरातून त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा मिळाल्या. शरद पवार यांच्या या आजारपणाच्या निमित्ताने त्यांच्या कँसरच्या आठवणी ताज्या झाल्या. शरद पवारांनी कँसर सारख्या मोठ्या दुर्धर आजारावर मात केली आहे. शरद पवार यांना २००४ मध्ये जेव्हा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते तेव्हा डॉक्टरांनी त्यांना तुमच्याकडे फक्त ६ महिने आहेत असं सांगितलं होतं. पण शरद पवार यांनी ते खोटं ठरवत कॅन्सरवर मात केली. शरद पवार यांच्या कॅन्सरशी लढण्याच्या प्रेरणेमागे एक आई सोबत घडलेली घटना आहे.

२००४ च्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार नुकताच सुरु झाला होता. शरद पवार प्रचाराला महाराष्ट्रात फिरत होते. एकेदिवशी त्यांना आपल्या गालाच्या आतल्या बाजूला वाढ झालीये असे जाणवले. त्यांनी सोबत असलेल्या जिवलग मित्र डॉ रवी बापट यांना त्यांनी सांगितलं. तातडीनं तपासण्या करण्याचं ठरलं. मुंबईत आले आणि ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन चाचण्या करून घेतल्या. मुखाचा कँसर झाल्याचे समोर आले. सर्वाना धक्का बसला.

शरद पवार पुण्यात आले. कुटुंबियांना याविषयी माहिती दिली. पक्षातील महत्वाच्या नेत्यांना बोलवून घेऊन माहिती दिली. पुढे त्यांच्यावर उपचार सुरु झाले. मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. पवारांच्या चेहऱ्याचा काही भाग अक्षरशः कापण्यात आला होता. तिथे मांडीचा काही भाग लावण्यात आला होता. दात काढण्यात आले होते. हा त्यांच्यासाठी खूप कठीण काळ होता. पाणी देखील पिता येत नसे. अगदी भुलीचं इंजेक्शन घेऊन ते पाणी प्यायचे. त्यांनी न्यूयॉर्क मध्ये देखील उपचार घेतले होते.

कृषी मंत्री असताना शरद पवार यांना तब्बल ३६ वेळा रेडिएशन ट्रीटमेंट घ्यायची होती आणि हे खूपच त्रासदायक देखील होतं. सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत शरद पवार हे मंत्रालयात काम करत असत. त्यानंतर दुपारी अडीच वाजता ते अपोलो हॉस्पिटलमध्ये किमोथेरेपी घ्यायचे. त्यांच्यावर डॉ रवी बापट, डॉ शरदिनी डहाणूकर, डॉ सुलतान प्रधान यांनी त्यांच्यावर त्यावेळी उपचार केले होते.

कॅन्सरवर मात करून पवार आजही राजकारणात एखाद्या तरुणाला लाजवतील अशा उत्साहात काम करत आहेत. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले. शरद पवार यांना कँसर विरुद्ध लढण्यास प्रेरणा एका प्रसंगातून मिळाली होती. शरद पवार हे लहान असताना त्यांच्या आईसोबत काटेवाडीमध्ये एक घटना घडली होती. जाणून घेऊया काय आहे ती घटना.

काटेवाडीमध्ये शरद पवार यांचं बालपण गेलं. आई शारदाबाई पवार या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांच्यापासूनच प्रेरित होऊन पवार राजकारणात आले. शारदाबाई यांना नेहमीच कोणाचीही मदत करण्याची सवय होती. एकदा हि सवय त्यांना महागात पडली होती. काटेवाडीत एक वळू त्याकाळी सोडलेला होता. त्या वळूच्या त्रासामुळे गावातील एका व्यक्तीने त्याला पायात गो ळी मा रून जखमी केले. तो वळू एका शेतात जाऊन पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी शारदाबाईंना तो वळू दिसला. तो जखमी असल्याचे दिसल्याने त्या जवळ गेल्या आणि अंगावर हात फिरवू लागल्या.

पण तो वळू घाबरला आणि त्याने त्यांच्यावर ह ल्ला केला. त्या वळूने १५ मिनिट त्यांना घोळसवलं. गावातील लोक आले पण त्या वळूने लवकर सोडलं नाही. यामध्ये शारदाबाईंच्या पायाला मोठ्या दुखापती झाल्या. पायाच्या हाडाचा अक्षरशः भुगा झाला होता. मांडीच्या हाडाचा तो भाग कापण्यात आला. यामुळे त्यांचा पाय ५-६ इंच छोटा झाला. त्यानंतर त्यांना आयुष्यभर कुबड्यावर राहावे लागले. काठी किंवा कुबड्याचा आधार घेऊनच त्या चालू शकत.

रुग्णालयातून घरी आल्यावर त्या घरी बसतील असं सर्वाना वाटलं. पण त्यांच्यात काहीच बदल झाला नाही. त्या पुन्हा नित्यक्रमाप्रमाणे आपल्या कामाला लागल्या. त्या सामाजिक कार्यात असो किंवा मग इतर काहीही कार्यक्रम असोत त्या त्याच उत्साहाने सहभागी होत. त्यांच्या आयुष्यावर त्या घटनेचा थोडाही प्रभाव त्यांनी दिसू दिला नाही.

त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची खूप आवड होती. त्या इंग्रजीचे क्लास करून इंग्रजी शिकल्या. त्याकाळी त्या घरी पहिली चारचाकी आल्यावर ती शिकल्या होत्या. त्यांचा जीवन जगण्याचा हाच सकारात्मक दृष्टिकोन शरद पवार यांनी अंगीकारला. कितीही मोठं संकट असलं तर त्याच्याशी खंबीरपणे लढायचं हे पवार आईकडून शिकले.

About Mamun

Check Also

नसबंदीच्या बाबतीत हिटलरसुद्धा संजय गांधींचे पाय धुवून पाणी पिला असता

जर्मनीचा हुकूमशहा आणि नाझी पक्षाचा नेता असणाऱ्या एडॉल्फ हिटलरचे नाव जागतिक इतिहासातील क्रूरकर्मा म्हणून घेतले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *