एखाद्या गरीब कुटुंबातून आलेली व्यक्ती जेव्हा शिक्षणात असो वा अन्य क्षेत्रात यश संपादन करते तेव्हा तो क्षण खूप सुवर्ण क्षण असतो. कारण या यशात खूप मोठा संघर्ष दडलेला असतो. असाच काहीसा संघर्ष करून यश मिळवलं आहे सीए बनलेल्या कल्पना दाभाडे यांनी. धुणीभांडी करणाऱ्या मोलकरणीची लेक असलेल्या कल्पना फक्त सीए (चार्टर्ड अकाउंटंट) बनल्या नाहीत तर त्यांनी ज्या कंपनीत काम केलं तिथं त्या भागीदार देखील बनल्या. चोराची मुलगी म्हणून हिनवले गेलेल्या या लेकीचा प्रवास खरंच खूप संघर्षमय आहे..
कल्पना दाभाडे यांचा जीवनप्रवास मागे वळून बघताना अंगावर शहारे येतात. कल्पनाने रिमांड होममध्ये राहून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. कल्पनाची आई हि धुणीभांडी करायची तर वडील हे वॉचमन म्हणून काम करायचे. आईच वय पन्नाशीत असताना खूप उशिरा कल्पनाचा जन्म झाला. आई वडील दोघे अशिक्षित. आई जिथं धुणीभांडी करायची तिथंच वडील वाचमनकी करायचे. वडिलांना दारूचं व्यसन होतं.
दारूचं व्यसन खुप जास्त असल्याने कल्पनाचे वडील हे रात्री कामावर असताना नेहमीच दारू प्यायचे. याचा फटका त्यांना बसला आणि ते काम करत असलेल्या बिल्डिंग मध्ये चोरी झाली. त्या घरचा टीव्ही चोरीला गेला. टीव्ही तेव्हा महागडी गोष्ट होती. पोलीस आले. वडिलांना त्यांनी अटक केली. त्यानंतर आईला देखील त्या कामावरून काढून टाकण्यात आलं. तिथं जवळपास कुठे कामाला कोणी ठेवत नव्हतं.
तेव्हा कल्पना अवघी ६-७ वर्षांची होती. शेवटी आईने कल्पनाला घेऊन एका वस्ती नसलेल्या ठिकाणी घेऊन राहायचं ठरवलं. तिथं गेल्यावर आई काम करायला लागली. पहाटे ५ ला कल्पनाला घेऊन ती कामावर जायची. नंतर ७ ला कल्पना शाळेत जात असे. शाळेत जाण्यासाठी तिला १.३० चालत जावा लागायचं. कल्पना आईसोबत लोकांच्या घरी जात असल्याने लोक चिडू लागले. एकदा तर एका बाईच्या घरी आई गेलेली असताना कल्पना पण तिथं मागून गेली. तेव्हा बाईने तिच्यावर थेट कुत्रा सोडला. तिच्या नाकावर तो कुत्रा चावलेल्या खुणा आजही आहेत.
तिची आई लोकांच्या वागण्यामुळे कंटाळून गेली. शेवटी दारूच्या भट्टीवर काम करायला सुरु केलं. तिथून धुण्याभांड्यापेक्षा जास्त पैसे मिळत असत. दारूचं मटेरियल वाहतूक करायचं ते काम होत. कधीकधी पोलीस पकडत. अनेकदा तुरुंगात देखील आईला जावं लागलं. कल्पनाला एकदा तर संडास मधून राहून दिवस काढावे लागले होते. कारण ते जिथं काम करत तिथं त्यांना घर दिल जायचं. एकदा एका बंगल्यात काम करताना संडासमध्ये राहावं लागलं.
पुढे एका बाईने कल्पनाच्या आईला चांगली मदत केली. बोर्डिंग मध्ये ठेवण्यासाठी हातभार लावला. परिस्थितीमुळे कल्पना जेमतेम काठावर पास होत गेली. पाचवीला तर ती नापास पण झाली. दरम्यान वडील पण सोडून गेले. तिच्या आईने बालन्यायालयात अर्ज करून तिला पुण्यात तिथं ठेवलं. शासकीय निरीक्षणगृहात, वेगवेगळ्या आधारगृहांमध्ये कल्पनाने शिक्षण घेतलं. अभ्यासात देखील ती यामुळे पुढे गेली. नंतर नेहमी पहिला नंबर येत गेला. पदवी शिक्षणाच्या व नंतरच्याही काळात छोट्या नोकऱ्या देखील तिने केल्या.
लातूर मध्ये भूकंप झाल्यानंतर तिथं एक नोकरीची संधी मिळाली. शिक्षणाऐवजी तिने ती नोकरी पुढे स्वीकारली. राहणं आणि जेवण तिथं मिळत होतं. ३ वर्ष काम करताना तिथे एमकॉम च शिक्षण पूर्ण केलं. पुढे पुण्यात आल्यावर कळलं कि वडील भीक मागताय. त्यांना शोधलं आणि वृद्ध आश्रमात ठेवलं. लातूरच्या त्या संस्थेत काम करताना एक सीए म्हणाले, ‘तू किती हिशेब ठेवून आम्हाला व्यवस्थित माहिती देतेस? तू सीए व्हायला हवीस.’ त्यानंतर तिने ठरवलं कि सीए व्हायचं.
२००३ मध्ये सीएला ऍडमिशन घेतलं खरं पण खरी सुरुवात २००८ मध्ये झाली. पदवीनंतर तब्बल वीस वर्षांच्या अंतराने हा नवा, अवघड अभ्यास सुरू केला. तीनदा परीक्षा दिल्यावर कल्पना पास झाली आणि २०१३ साली सीए बनली. उमेदवारी केली त्या फर्मनेच भागीदार करून घेतलं. चोराची मुलगी म्हणून हिणवली गेलेली कल्पना पुढे CA कल्पना दाभाडे म्हणून ओळखली जाऊ लागली.