एका खेडेगावातील ती मुलगी. घरची परिस्थिती बेताचीच. मूळ गाव लातूर तालुक्यातील. पण जन्म आणि बालपण नांदेड जिल्ह्यात गेलं. घरी आईवडिलांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं खरं पण नातेवाईक आणि शेजारी पाजाऱ्यांमुळे शिक्षणात अडथळे यायला लागले. पुण्यात जेव्हा ती अभ्यासासाठी राहायची तेव्हा लोक म्हणत तिला फक्त मजा करायची म्हणून ती खोटं बोलून पुण्यात राहतेय. खूप काही झेलावे लागले. पण तिने हार मानली नाही. येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड दिले. आयुष्यात PSI पदाला गवसणी घालून तिने सर्व टीकाकारांचे तोंड तर बंद केलेच पण आई वडिलांना मान सन्मान देखील मिळवून दिला.
मूळचे रोकडा सावरगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर मधले आणि नांदेडमध्ये स्थायिक झालेले कल्याण काळे. कल्याणरावांनी प्रेमविवाह केल्याने समाजाने नेहमीच त्यांना तुच्छतेची वागणूक दिली. नातेवाईक देखील दुरावा ठेवून राहायचे. कधी कोणत्या गोष्टीत मदत करायचे नाहीत. कल्याणराव सुरुवातीच्या काळात रिक्षा चालवत तर पत्नी देखील वेगवेगळे काम करायची. खूप कष्ट करून त्यांनी संसाराचा गाडा चालवला.
कल्याणरावांची मुलगी वर्षा काळे मात्र त्यांच्या आयुष्यात सुवर्णदिन आणण्यासाठीच आली. वर्षा लहानपणी पासूनच हुशार होती. तिने घरी आईवडिलांचे कष्ट लहानपणीपासून बघितले. त्यामुळे तिला परिस्थितीची चांगली जाणीव होती. आई वडिलांना जे झेलावं लागत होतं ते तिने जवळून बघितल्याने तिच्या मनात लहांपणीपासूनच हे दिवस बदलवायची उर्मी होती. तिने खूप लवकरच मनाशी गाठ बांधली कि मोठं काही तरी बनून यश मिळवायचं. PSI होण्याचे तिने स्वप्न पाहिले. आई वडिलांना अभिमान वाटेल आणि समाजात पुन्हा मान सन्मान इज्जत मिळेल हे तिला वाटले.
खरंतर वर्षाला डॉक्टर व्हायची इच्छा होती. पण वडिलांचं स्वप्न होतं कि तिने पोलीस सारखा चॅलेंजिंग जॉब करावा. वडिलांच्या इच्छे खातीर तिने MPSC कडे वळण्याचा निर्णय घेतला. ती पुण्याला गेली तिथे पूर्व परीक्षा दिली. वापस नांदेडला आल्यावर तिला पुन्हा पुण्याला पाठवू असं भाऊ म्हणाला. पण जवळच्या नातेवाईकांचा आणि घरच्यांचा शिक्षणाला विरोध होता. मुलीला कशाला शिकवायचं असं त्यांचं मत होतं. पुण्याला एवढं दूर मुलगी नजरेपासून दूर जाईल तर धोका आहे असं त्यांना वाटायचं. या विचारांमुळे वडीलही खचले आणि वर्षाला पुण्याला पाठवायला विरोध करू लागले.
वर्षाच्या लग्नाचा विषय घरी जोर धरू लागला. सर्वांचं मत होतं लग्नाचं वय झालाय आता लग्न करून टाका. वडीलही आजूबाजूचे विचार ऐकून शिक्षणाच्या बाबतीत निगेटिव्ह झाले होते. त्यांनी वर्षाच्या लग्नाची तयारी सुरु केली. वर्षाला हे बघून टेन्शन यायचं. एकदा लग्नाचा विषय खूप वाढला असताना ती खूप रडली. तेव्हा तिने विचार केला कि आता काही तरी करून दाखवावंच लागेल. पोस्ट निघाल्यावरच सर्वाना मी काय करत होते हे कळेल.
पूर्व परीक्षानंतर वर्षाला पुन्हा वडिलांनी पुण्याला जायला सपोर्ट केला. ती ३ महिन्यासाठी पुण्यात गेली. वर्षाला मुख्य परीक्षेविषयी काहीही माहिती नव्हती. तिने क्लास जॉईन केले खूप अभ्यास केला. पुण्यात तिला अनेक अडथळे देखील आले. पुण्याचे अनेक रूप तिने पाहिले पण ती कशाला भुलली नाही. ती आपल्या ध्येयावर ठाम राहिली आणि त्याकडे वाटचाल केली. घरच्यांनी एवढ्या दूर पाठवल्यामुळे ती त्यांचा विश्वास तोडू शकत नव्हती.
परीक्षा खूप चांगली गेली. पण निकाल लांबत गेला. वर्षाने ग्राउंडची तयारी सुरु केली. पण ३ महिन्यांनी ग्राऊंडची होणारी परीक्षा देखील लांबत गेली. घरचे देखील तगादा लावायला लागले. घरच्यांना खूप तारखा तिने सांगितल्या. पण परीक्षा काही होत नव्हती. घरचे सपोर्ट करत होते पण समाज मात्र नाव ठेवायला लागला. विविध गोष्टी वर्षाच्या देखील कानावर येत होत्या. ती मुख्य परीक्षा पासच झाली नसेल फक्त पूण्यात राहण्यासाठी खोटं बोलत असेल असं देखील काही जण बोलले. पण वर्षा खचली नाही. वर्षाच्या अभ्यासाचं फळ निकालात दिसलं. पहिल्याच प्रयत्नात ती PSI मुख्य परीक्षेत पास झाली.
ग्राऊंडची तयारी खूप चांगली केल्यामुळे ती सहज पास झाली. मुलाखतीला सर्वात अवघड पॅनल आलं पण तिच्या आत्मविश्वासाने तिने त्यातही यश मिळवलं. मुलाखत दिल्या नंतरही लोक वर्षावर संशय घ्यायचे कि ती पासच झाली नसेल. २०१९ मध्ये महिला दिनीच वर्षाचा निकाल आला आणि तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं. वर्षाने निकाल वडिलांना सांगितल्यावर त्यांचे आनंदाश्रू थांबत नव्हते. कारण तिच्या निकालाने खूप तोंड बंद केले होते. वर्षाला जे नाही ते नंतर फोन करायला लागलं.
नेहमी दूर करणारे नातेवाईक आता जवळ यायला लागले. गावात सर्वत्र वर्षाचा आणि आई वडिलांचा सत्कार झाला. वर्षासाठी सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे आई वडिलांचा गावात जाण्याआधी वर्षासोबतचा एक बॅनर लावलेला होता. ते बघून वर्षा भारावून गेली. वर्षा गावातली पहिली महिला PSI झाली होती. गावात घरोघरी फेटे बांधून सत्कार झाला. समाजात चांगलं वाईट कोणी बोललं तरी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं तर सर्वांची तोंड यशाने बंद करता येतात हे वर्षाने दाखवून दिलं.