आपल्या नशिबात काय लिहिलंय हे जाणून घेण्यासाठी अनेकजण ज्योतिषीकडे जातात. ज्योतिषी जे भविष्य सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या आयुष्यात वाटचाल करतात. पण असे देखील काही जण असतात जे ज्योतिषाने सांगितलेले भविष्य खोटे ठरवून आपली वाटचाल स्वतःच्या जिद्दीने करत असतात. ज्योतिषाने सांगितलेल्या भविष्यावर विश्वास न ठेवता आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवून आयसीयू मध्ये अभ्यास करून कलेक्टर झालेल्या या नाशिक जिल्ह्याच्या सुपुत्राचे नाव आहे नवजीवन विजय पवार.
नवजीवन पवारची यशोगाथा हि सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. नवजीवन हा नाशिक जिल्ह्यातील नवीबेज गावचा रहिवाशी आहे. नवजीवनचे वडील विजय पवार हे एक शेतकरी आहेत. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या नवजीवनने लहांपणीपासूनच मोठे स्वप्न बघितले. नवजीवनने आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सायंन्समधन अकरावी बारावीचे शिक्षण घेतले. बारावीनंतर त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला.
यूपीएससीच्या तयारीसाठी जून २०१७ मध्ये नवजीवन मित्रांसोबत दिल्लीला गेला. दिल्लीत त्याने आपला अभ्यास सुरु केला. जून २०१८ मध्ये पूर्व परीक्षा होणार होती. नवजीवनने त्यादृष्टीने खूप मेहनत घेतली. याचे फळ त्याला पहिल्याच पूर्व परीक्षेत मिळाले आणि तो पास झाला. आता यूपीएससी मुख्य परीक्षेचे आव्हान त्याच्या समोर होते. मुख्य परीक्षा सप्टेंबर २०१८ मध्ये होती. तयारी करण्यासाठी त्याच्याकडे ४ महिने वेळ होता. त्याने तयारी सुरु केली.
पण मुख्य परीक्षेच्या २८ दिवस आधीच त्याच्या आयुष्यात संकट आलं. ३१ऑगस्ट ला त्याला डेंग्यूची लागण झाली. त्याची तब्येत एवढी खालावली कि त्याला मित्र रवी व योगेशने स्पेशियालिटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. तब्येत खूप बिघडली होती. समोर मुख्य परीक्षेचे टेन्शन होते. पण तब्येत अधिकच खालावत गेली. दिल्लीत फरक पडत नसल्याने त्याला नाशिकला आणण्याचं कुटुंबाने ठरवलं. कुटुंबीयांनी त्याला गंगापूर रोडवरील कासलीवाल रुग्णालयात ऍडमिट केले. तब्येत नाजूक असल्याने त्याला आयसीयू मध्ये भरती करण्यात आले.
मुख्य परीक्षेला आता फक्त २६ दिवस बाकी राहिले होते. नवजीवनच्या वडिलांनी त्याला सांगितले कि आता तुझ्यासमोर दोनच पर्याय आहेत. रडायचं का लढायचं. नवजीवनने लढायचं ठरवलं. त्याने सुरुवात केली नर्सपासून. नर्स उजव्या हातात त्याला रोज अनेक इंजेक्शन द्यायच्या. त्याने त्यांना विनंती केली कि मला उजव्या हाताने परीक्षा लिहायची आहे. तुम्हाला जे इंजेक्शन द्यायचे ते डाव्या हातात द्या.
त्याने डॉक्टरांना देखील आपली जिद्द दाखवली. आयसीयूमध्ये त्याला एका बाजूला सलाईन लावलेली असायची तर बाजूच्या बेडवर त्याचे यूपीएससीच्या तयारीचे पुस्तके ठेवलेली असायची. डॉक्टर त्याचे पुस्तक बघून म्हणाले परीक्षा कधीही देता येईल पण आयुष्य हे खूप महत्वाचे आहे. त्याने डॉक्टरांचं देखील न ऐकता आयसीयू मधेच आपली परीक्षेची तयारी सुरु ठेवली.
नवजीवनला आयसीयू मध्ये अभ्यासासाठी त्याच्या बहीण, मित्र व बहिणीच्या मुलीने खूप मदत केली. त्याच्या बहिणीने व १२ वि मध्ये शिकणाऱ्या बहिणीच्या मुलीने त्याच्या नोट्स तयार केल्या. याशिवाय दिल्लीत तयारी करणारा एक मित्र व्हिडीओ कॉल करून त्याची तयारी करून घ्यायचा. नवजीवनची तब्येत हळू हळू सुधरत होती. परीक्षेला अवघे १३ दिवस बाकी होते. तो नाशिकवरून दिल्लीला परतला. रूमवर गेल्यावर मित्रांनी त्याची मानसिक तयारी केली. त्याला हिम्मत दिली.
पण नवजीवनचा पिच्छा संकट काही सोडत नव्हते. त्याला आधी डेंगू आणि डायरिया झाला. तर पुन्हा नंतर कुत्रा चावला. याशिवाय फोन देखील हरवला. एवढे सारे संकट येत असल्याने मित्रांच्या सल्याने तो एका ज्योतिषीकडे गेला. एका ज्योतिषीला हाथ दाखवल्यानंतर तो म्हणाला कि तू २७ व्या वर्षी IAS बनू शकत नाहीस. नवजीवनने मात्र त्याचे भविष्य सोडून आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवत मुख्य परीक्षा दिली. मुख्य परीक्षेचे निकाल आले. २०१८ मध्ये देशात ३६० वि रँक मिळवत नवजीवन IAS झाला. आजारासमोर हार न मानता आयसीयू मध्ये अभ्यास करून कलेक्टर बनलेल्या नवजीवनचा हा प्रवास सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहे.