घरची परिस्थिती हलाखीची.. वडील हे खूप दारू प्यायचे. ड्रॉयव्हरकी करून घर धकवायचे. लोकांचं मोठं देणं होतं. पण घराचे दिवस बदलले ते याच घरच्या मुलाने. वडिलांची दारू या मुलामुळे सुटली. एवढी प्रगती केली कि जे वडील आयुष्यभर ड्रायव्हर होते ते ड्रायव्हर घेऊन स्वतःच्या स्कॉर्पिओ मध्ये बसून फिरायला लागले. जाणून घेऊया या तरुणाचा जीवनप्रवास..
हि गोष्ट आहे नगरच्या प्राध्यापक रवींद्र काळे यांची. रवींद्र यांनी मोठा संघर्ष करून आज स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. रवींद्रचे आजोबा तारुण्यातच गेल्याने वडिलांवर लवकरच कुटुंबाची जबाबदारी आली. कर्जाच ओझं वाढत गेलं. ड्रायव्हरची नोकरी करून त्यांनी कुटुंबाचा गाडा हाकायला सुरु केलं. ड्रायव्हरकीमुळे साहजिकच त्यांना दारूचे व्यसन देखील लागले. रवींद्रचं बालपण वडिलांच्या दारूमुळे दडपलं गेलं.
वडिलांनी काकांना चांगलं शिकवलं शिवाय घराला देखील चांगलं सांभाळलं. आत्यांची लग्न चांगली केली. पण मुलं जशी वाढत गेली तसं त्यांचं व्यसन वाढत गेलं. मुलांना चांगल्या शाळेत घातलं. पुढे दारूमुळे नोकरी गेली. दारूचे दुकानदार उधारी मागायला घरी येत. रवींद्र अन त्याचा भाऊ अक्षरशः त्यांच्या मागे द गड घेऊन लागत असत.
रवींद्रला लहानपणी पासून हे सर्व बघावं लागल्याने तो काही तरी करून दाखवण्याची स्वप्न बघू लागला. आईची तब्येत ढासळत होती. काका शिक्षक झाल्याने त्यांचा थोडा हातभार लागू लागला. भावाला देखील एका नेत्याच्या शाळेवर काम मिळालं. रवींद्रला चुलत्यामुळे वाचनाची आवड लागली. आईचे होणारे हाल रवींद्रला बघवले जायचे नाहीत. आईला दुसऱ्याच्या शेतात कामाला जावं लागायचं. जंगलातून सरपण आणणं, कंबरेवर ३ ३ हंड्यानी पाणी आणणं हे त्याला सहन व्हायचं नाही.
कर्जाचा डोंगर देखील होता. त्यामुळे शिक्षणाची आवड वाढली. दहावी झाली. खूप अभ्यास केल्यामुळे पहिला आला. अनेक बक्षिस मिळाली. त्याकाळी रवींद्रला एक ३५५ रुपयांचं बक्षीस मिळणार होतं. ज्यातून तो कपडे आणि शूज घेणार होता. ट्युशनची फीस देणार होता. पण ते पैसे देणेदाराना द्यावे लागले. दहावीच्या सुट्ट्यांमध्ये काकांसोबत कामाला गेला. त्यावेळी घर बांधकामावर विटा वाळू उचलण्याचं काम रवींद्रने केलं. ज्या घरी रवींद्र कामाला गेला होता ते काम वर्गातल्याच मुलीचं होतं. मुलीने वर्गात टॉपर असलेल्या रवींद्रकडे बघितलं आणि फिदीफिदी हसली. रवींद्रला हे खूप वाईट वाटलं.
आईला झालेली गोष्ट सांगितली. आई म्हणाली परिस्थितीची लाज नसते. तू कामच करतोय ना चोरी थोडी करतोय. रवींद्र सावरला. पुढे अकरावीला प्रवेश घेतला. कॉलेजला पायी जावा लागायचं. कारण पास काढायला पैसे नसायचे. कोण्या तरी दुधवाल्याला हाथ करून तो कॉलेजला जायचा. एकच ड्रेस आणि एकच शूज घालून कॉलेज चालू झाल. खर्च असल्याने डॉक्टरकडे नोकरी केली. त्याकाळी २-२५० रुपये मिळायचे. त्यातून शिक्षण झालं. बारावी बऱ्या मार्काने पास झाला.
पुढे बीएस्सी केली. बीएस्सी करताना देखील अनंत अडचणी आल्या. कंदिलावर अभ्यास करून बीएस्सी पास केली. बीएस्सीला युनिव्हर्सिटी मध्ये २० वा क्रमांक आला. भावाची नोकरीही तोपर्यंत गेली. जमीन गहाण पडली होती. एमएस्सीला ऍडमिशन घ्यायला पैसे नव्हते. पण मावशीने स्वतःच मंगळसूत्र गहाण ठेवून ९ हजार दिले आणि त्यात एमएस्सी केली. एमएस्सी झाल्यावर लगेच प्राध्यापकाची नोकरी मिळाली.
पगार रोज १०० रुपये रोज होता खरा पण पगार ६-७ महिन्यांनी मिळणार होता. त्यामुळे खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला असता. हे सर्व विचार करून ५०० रुपये महिन्याने क्लासेस घ्यायला सुरुवात केली. नंतर बीएड केलं. मोठ्या कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. अनेक क्लास वाल्यानी पैसे बुडवले. आईच ऑपरेशन त्यादरम्यान रवींद्र करू शकला.
स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचं ठरवलं. स्वतःचे क्लास चालू केले. आईने तेलाच्या डब्याचे पत्रे दिले. त्यावर पेंटर मित्राकडून अम्बिशन बायोलॉजी क्लासेस नाव लिहून घेतलं आणि एका मोठ्या प्रसिद्ध क्लासच्या शेजारी हि पाटी लावून क्लासला सुरुवात केली. २ चेष्ठा करण्यासाठी आलेली मुले कधी सिरीयस झाली त्यांनाच कळलं नाही. नंतर विद्यार्थी वाढत गेले. नंतर क्लास समोर रांगा लागायला लागल्या. घरची परिस्थिती सुधारत गेली.
रवींद्रने शेती घेतली. सर्व कर्ज फेडलं. आईचा दवाखाना केला. चुलत्यांची ऑपरेशन केली. वडिलांचं कौन्सलिंग करून त्यांची दारू सोडवली. ज्या वडिलांनी आयुष्यभर ड्रॉयव्हरची नोकरी केली त्यांना एक स्कॉर्पिओ घेऊन दिली. त्यावर ड्रायवर लावून दिला. आईला दागदागिने घेतले. गावात सामाजिक कामं करून भावाला गावचं सरपंच केलं. गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं. रवींद्रने आजपर्यंत अनेक सर्वसामान्यांची मुलं डॉक्टर बनवली आहेत. आज रवींद्र काळे हे नगरमध्ये डॉक्टर बनवणारा प्राध्यापक म्हणून ओळखले जातात.