आर आर पाटील हे नाव राज्याच्या राजकारणातील एक लोकनेते होऊन गेले. आर आर पाटील यांना पूर्ण महाराष्ट्र आबा या नावाने ओळखायचा. आबांचं पूर्ण नाव रावसाहेब रामराव पाटील. आबांचा जन्म अजनी,ता.तासगाव जि. सांगलीचा. घरची परिस्थिती बेताची असूनही आबांनी जिद्दीच्या बळावर कमवा आणि शिका योजनेत काम करून आपले शिक्षण पूर्ण केले.
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आबांनी केलेली राजकीय वाटचाल खूपच प्रेरणादायी आहे. आबांची भाषण शैली, प्रश्न सोडवण्याची पद्धत व स्वच्छ प्रतिमा वसंतदादा पाटलांनी हेरली आणि आबांची राजकीय वाटचाल सुरु झाली.
१९७९ ते १९९० सावळज गणातुन जिल्हा परीषद सदस्य होते. त्यानंतर तासगाव मतदारसंघातुन १९९०,१९९५,१९९९,२००४,२००५ व २०१४ सलग ६ वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. पहिल्या २ टर्ममध्ये आबा काँग्रेसमध्ये होते पण पुढे शरद पवार यांच्यासोबत काँग्रेस सोडत ते राष्ट्रवादीत गेले. सुरवातीला ग्रामविकास मंत्रीपदाची जवाबदारी देण्यात आली. या काळात गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियाण यशस्विपणे राबवुन त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा राज्यात निर्माण केला.
१ नोव्हेंबर २००४ ला महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. महाराष्ट्र राज्याचे सर्वाेत्कृष्ट गृहमंत्री म्हनुन आजही त्यांचे नाव घेण्यात येते. आबांचे कुटूंब पत्नि सुमन,मुलगा रोहीत,मुलगी स्मिता व आई भगिरथी हे आजही एकदम साधे आयुष्य जगतात. आबांच्या प्रामाणिकपणाचे देखील अनेक किस्से गाजलेले आहेत.
आज असाच एक आबांच्या प्रामाणिकपणाचा किस्सा बघूया. जे मनात आहे तेच आबांच्या ओठात असायचं. हि शैली लोकांना खूप भावायची. आर आर आबांनी त्यावेळी नुकतीच आपल्या राजकीय आयुष्याला सुरुवात केली होती. त्यावेळी घडलेली हि घटना आहे. त्यावेळी आबा हे जिल्हा परिषद सदस्य होते. तो काळ होता १९७९ सालचा.
यशवंतराव चव्हाण त्यावेळी उतार वयात होते. नुकत्याच निवडणुका झाल्या होत्या. यशवंतराव चव्हाण कराडला आलेत म्हणून जिल्ह्यातील काही नेतेमंडळी त्यांना भेटायला गेली होती. कराडच्या विरंगुळा या बंगल्यावर हे मंडळी गेले. या कार्यकर्त्यांमध्ये जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नेतेमंडळी होती. अनेक दिग्गज नेते होते. यामध्ये नवखे आर आर आबा देखील होते.
यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत त्यावेळी ते सर्व गप्पा मारत बसले होते. त्यावेळी यशवंतराव यांचा जेवायचं वेळ झाल्याने कर्मचारी त्यांना बोलवायला आला. पण ते गप्पात रमले होते. २ वेळा कर्मचारी आल्यावर कार्यकर्त्यांनी साहेबाना जेवून घेण्याचं सांगितलं. यशवंतराव जेवायला निघाले. पण त्यांना कार्यकर्त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करण्याची सवयच होती. त्यांनी तेथील सर्व कार्यकर्त्यांना जेवण झालं का विचारलं. त्यावेळी सर्व जण जेवण झालं म्हणले. फक्त आर आर आबा जेवण नाही झालं म्हणाले.
आबांनी जेवण झालं नाही सांगितल्याने तेथील सर्वच नेतेमंडळींना थोडा धक्का बसला. कारण मोठ्या नेत्याने जेवण झालं का विचारलं तर हो हो म्हणतात. यशवंतराव मध्ये गेल्यावर २-३ नेतेमंडळींनी आबांना चांगलेच खडे बोल सुनावले. मोठे नेते जेव्हा जेवायला विचारतात तेव्हा हो सांगायचं असतं असं त्या नेत्यांनी सांगितले. पण आबा म्हणाले यशवंतराव एवढे मोठे नेते आहेत अन त्यांना आपण खोटं कसं बोलायचं. हे मला काही पटलं नाही म्हणून मी खरं ते सांगितले.
माझं जेवण खरंच झालं नाही म्हणून मी सांगितलं जेवण नाही झालं म्हणून असं आबा म्हणाले. नेतेमंडळींनी कपाळावर हाथ मारलाच तितक्यात आतून तो कर्मचारी परत आला आणि आबांकडे बोट दाखवून म्हणाला तुम्हाला साहेबानी आत जेवायला बोलावलं. सगळ्या मंडळींना आश्चर्य वाटलं. आर आर आबा आत गेले. यशवंतरावांसोबत त्यांनी निवांत जेवण करत गप्पा मारल्या. त्यांच्यासाठी हा मोठा योग होता.
जिल्ह्यातील सगळी जेष्ठमंडळी बाहेर बसली होती आणि राजकारणात नुकतेच प्रवेश केलेला एक तरुण यशवंतराव चव्हाणांसोबत बसून जेवण करत आहे. हे बघून सर्वानाच आश्चर्य वाटलं. आबा जेवून बाहेर आले. चेहऱ्यावर नेहमीचं मिश्किल हास्य होतं. त्यावेळी ते जेष्ठ नेत्यांना म्हणाले बघितले का खरे बोलण्याचे आयुष्यात किती फायदे असतात. सगळे नेतेमंडळींना देखील त्यावेळी हसू आलं.