माणसाने जर ठरवले तर त्याला आयुष्यात जे हवे ते मिळू शकते, त्यासाठी अट मात्र एकच आहे की त्याचा हेतू स्वच्छ आणि ध्येय निश्चित असले पाहिजे. ती गोष्ट मिळवण्यासाठी माणसाने स्वतःला सक्षम बनवले पाहिजे. अशा दृढनिश्चयी व्यक्तीच्या वाटेत ना गरिबी आडवी येते ना कुठला अडथळा त्याचा मार्ग रोखू शकतो. ही केवळ आदर्शवादी मांडणी नाही, तर भारतातील एका व्यक्तीने या ओळी खऱ्या करुन दाखवल्या आहेत. मिहीर सेन त्या व्यक्तीचे नाव…
बिजू पटनायकांनी मिहीरला इंग्लंडला जाण्यासाठी केली मदत
कटकच्या एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या मिहीरला लहानपणापासूनच कोर्टकचेरी आणि कायद्याच्या अभ्यासात रस होता. त्याकाळी वकिली क्षेत्रातील लोकांमध्ये इंग्लंडच्या जगप्रसिद्ध “लिंकन इन बार क्लब”मध्ये शिकायला मिळणे म्हणजे प्रतिष्ठेचे मानले जायचे. मिहीरला तिथे जायचे होते पण त्यांच्याकडे तितके पैसे नव्हते. तत्कालीन उद्योजक आणि स्वातंत्र्योत्तर काळात ओरिसाचे मुख्यमंत्री झालेल्या बिजू पटनाईक यांनी मिहीरला १० ब्रिटिश पौंडांची मदत आणि इंग्लंडला जाण्यासाठी तिकीटाची व्यवस्था केली. त्या मदतीने मिहीर इंग्लंडला गेले.
इंग्लंडच्या रेल्वे स्टेशनवर कुलीचे काम करावे लागले
इंग्लंडमध्ये गेल्यानंतर मिहीरकडे पैसे नव्हते. त्यांनी रेल्वे स्टेशनवर कुलीचे काम करुन पैसे जमवायला सुरुवात केली. ही गोष्ट भारतात समजल्यावर तत्कालीन सरकारने इंग्लंडमधील भारतीय उच्चायुक्तालयात मिहिर यांची नेमणूक केली. मिहीरची आर्थिक अडचण सुटली. त्यानंतर त्यांनी लिंकन इन बारमध्ये वकिलीच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. मिहीरचे वकिली शिक्षण व्यवस्थित सुरु असताना फ्लोरेन्स चॅडविक या जलतरणपटूचा इंग्लिश खाडी पोहून विश्वविक्रम केल्याबाबतचा एक लेख त्यांच्या वाचनात आला आणि त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली.
मिहीरने भारताचे नाव गिनीज बुकात नोंदवले
फ्लोरेन्स चॅडविकचा लेख वाचल्यानंतर मिहीरने भारताच्या नावावर असा विक्रम असला पाहिजे हे उद्दिष्ट बाळगून पोहण्याची कला शिकून घेतली. २७ डिसेंबर १९५८ रोजी ते १४ तास ४५ मिनिटात इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिले भारतीय आणि आशियाई व्यक्ती बनले. या यशाबद्दल पुढच्याच वर्षी नेहरुंनी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर मिहीरने मागे वळून बघितले नाही.
१९६६ साली पाल्कची सामुद्रधुनी आणि जिब्राल्टर खाडी पोहून आपल्या साहसाची झलक दाखवली. त्याच वर्षी सात समुद्र पोहून जाण्याची स्पर्धा होती. मिहीरने त्यात भाग घेतला. त्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी इंदिरा गांधींनीही मिहीरला सहकार्य केले. मिहीर पाच खंडातील सात समुद्र यशस्वीरीत्या पार करणारा जगातील पहिला व्यक्ती बनला आणि त्याबरोबर बहराचे नाव गिनीज बुकात नोंद झाले. ११ जून १९९७ रोजी मिहीर सेन यांचे निधन झाले. जगातील कोणत्याही क्षेत्रात भारत कुणापेक्षा कमी नाही हे दाखवणाऱ्या महान व्यक्तिमत्वाला सलाम…