Sunday , May 28 2023
Breaking News
Home / जीवनशैली / इंजिनिअरिंग फेल झालेल्या तरुणाने २५ व्या वर्षी शून्यातून उभारला करोडोंचा बिजनेस!

इंजिनिअरिंग फेल झालेल्या तरुणाने २५ व्या वर्षी शून्यातून उभारला करोडोंचा बिजनेस!

आपल्या महाराष्ट्रात एखादा व्यवसाय करायचं म्हंटलं कि तो आपल्या माणसांना जमत नाही तो या लोकांनीच करावा असा खूप चुकीचा समज आहे. जसं कि कपड्याच्या व्यवसाय करायचा म्हणलं कि तो मारवाडी लोकांनीच करावा असं म्हंटलं जातं. पण खरंतर असं काहीही नसतं. आपण जर पूर्ण क्षमतेने आणि जिद्दीने एखाद्या क्षेत्रात पाऊल टाकलं तर त्यात आपल्याला यश मिळवता येऊ शकतं. एका तरुणाने असाच कपड्याच्या व्यवसायात उतरण्याचा संकल्प घरच्यांना सांगितला. पण घरापासूनच त्याचे पाय ओढायला सुरुवात झाली. मराठी माणसाचं हेच चुकतं. आपण काही करून बघायच्या आधीच पाय ओढायला सुरुवात करतो. पण या तरुणाने हार न मानता २५ व्या वर्षीच शून्यातून आज करोडोंचा बिजनेस उभा केला आहे. चला तर जाणून घेऊया कसं मिळवलं त्याने हे यश..

एकेकाळी १०-२० रुपयांसाठी भांडणारा मुलगा आज वर्षाला २ कोटींचा टर्नओव्हर करतोय. हा तरुण आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी या छोट्याशा गावातील धनंजय नरवडे. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धनंजयचं बालपण हे गरिबीतच गेलं. धनंजयला शिक्षणाची आवड तर होती पण त्याचं अभ्यासात मन रमायचं नाही. त्याला खेळायला जास्त आवडायचं. दहावीला चांगले मार्क घेऊन तो पास झाला. पुढे आईवडिलांनी त्याला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून शिरूरमध्ये भाड्याने खोली करून तिथं ते राहायला गेले. तिथं कसाबसा धनंजय हा बारावी पास झाला. पुढे सीईटी मध्ये त्याला पुढच्या सीटवर आलेल्या विद्यार्थ्याने पेपर दाखवला अन तो सीईटी मध्ये १७२ मार्क घेऊन पास झाला. पुढे पुण्यात इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं.

वडील हे अवघ्या ८-१० हजाराची नोकरी करायचे. मामानी पहिल्या वर्षी १ लाख फीस भरून मदत केली. पुढे काकांनी देखील त्याला मदत केली. वडील महिन्याला ४-५ हजार पाठवायचे. त्यात खोलीभाडं आणि जेवणाचा खर्च तो धकवायचा. त्याला कॉलेजमध्ये काही समजत नव्हतं. पहिल्या वर्षी त्याचे ६ पैकी ५ विषय गेले. नंतर सेकण्ड सेमिस्टरला तर त्याचे पूर्णच विषय गेले. पुढे ६ महिने घालवले आणि तो गावाकडे परतला. तिथं त्याला चुलत्यांनी त्यांच्या व्यवसायात काम करण्यास सांगितलं. पण धनंजयला पुण्याच्या लाईफची सवय लागली होती. चुलते कॉन्ट्रॅक्टर असल्याने त्याला ५-६ महिने बांधकामावर पाणी मार, लेबर ची ने आन कर असे काम करावे लागले.

असे कामं केल्यामुळे धनंजयला शिक्षणाची किंमत कळली. त्याने पुन्हा पुण्याला जायचं ठरवलं. मित्रामुळे तो प्लॉटिंगच्या व्यवसायात घुसला. तिथंही अपयश आलं. सर्वाना वाटायला लागलं हा काहीही करू शकत नाही. नातेवाईक देखील काहीही बोलायला लागले. तेव्हा त्याच्या मनाला ते खूप लागलं. धनंजयची कपड्याची चॉईस खूप चांगली होती. त्याला मित्र कपडे घ्यायला सोबत न्यायचे. त्याने यातूनच स्वतःचं दुकान टाकण्याचं ठरवलं. बाबांनी त्याला दीड लाखाची मदत केली. ते पैसे त्याने व्याजाने घेतले होते.

१०बाय १२ चा गाळा घेऊन त्याने सुरुवात केली. आई वडिलांनी विरोध केला. ते म्हणाले शिरूरमध्ये मारवाड्यांची ३-३ मोठी दुकानं आहेत तुझ्या या छोट्या दुकानात कोण येणार आहे. कशाला पैसे वाया घालतोय. वडिलांनी थोडीही मदत देणार नाही सांगितलं. मित्राच्या मदतीने त्याने दुकानाची सुरुवात केली. त्यांना खूप कमी रिस्पॉन्स मिळायला लागला. पार्टनर परवडत नाही म्हणून बाहेर पडला. धनंजयने सुरु ठेवण्याचं ठरवलं.

त्याने मार्केटचा अभ्यास केला. इतर व्यावसायिक ३०० चा शर्ट ९०० ला विकताय हे त्याच्या लक्षात आलं. त्याने लोकांना हि लूट ध्यानात आणून दिली आणि तोच शर्ट ५०० मध्ये द्यायला सुरुवात केली. लोक त्याच्याकडे यायला लागले. सोशल मीडियाची त्याला खूप मदत झाली. त्याने हळूहळू कस्टमर जमवायला सुरुवात केली. त्याने हळूहळू यामध्ये जम बसवला. त्याला मार्केटमध्ये कुठं कपडे स्वस्त मिळतात याचा अंदाज आला. स्टॉक जास्त घेतलं तर दिल्लीहून देखील माल आणायला पुरतं हे त्याला कळलं. त्याने शिक्रापूरमध्ये मावस भावासोबत दुसरी ब्रँच उघडली. तिथंही खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला.

असं करत त्याने पुढे वाघोलीमध्ये दुकान उघडलं. शिरूरमध्ये दुकान मोठं केलं. डिजाईन भारी बनवली. नंतर फ्रॅन्चायजी मागायला मागणी झाली. एका छोट्या दुकानापासून केलेली सुरुवात आज जवळपास २० दुकानावर पोहचली आहे. त्याने १७ फ्रॅन्चायजी लोकांना दिल्या असून सध्या ३ दुकानाचं काम पुण्यात सुरु आहे. त्याने हळू हळू स्वतः कपडे बनवण्याकडे वळण्याचं ठरवलं. त्याने स्वतः कपडे बनवण्यास सुरुवात केल्याने फायदा अधिक झाला. धनंजयने स्वतः ५-६ हजार शर्ट आतापर्यंत डिजाईन केले आहेत.

त्याच्या साई ब्रॅण्डच्या माध्यमातून आज त्याने ५० ते ६० जणांना नोकऱ्या दिल्या आहेत. ४ वर्षात त्याने एक इंजिनिअरिंग फेल झालेला मुलगा ते २५ व्या वर्षी करोडोंची उलाढाल करणारा मुलगा अशी वाटचाल केली आहे. एकेकाळी गाडीमध्ये पेट्रोल टाकायला पैसे नसायचे. कपडे घ्यायला पैसे नसायचे अशा धनंजयने आज स्वतःचा कपड्यांचा ब्रँड बनवला आहे.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *