आजकाल आपल्या आजूबाजूला असे असंख्य लोक असतात जे आपल्या परिस्थितीशी झगडत असतात. त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या समस्यांसोबत ते झगडत असतात. पण हे लोक आपल्या परिस्थितीसाठी आपल्या नशिबाला आणि देवाला दोष देताना दिसतात. पण ते आपली क्षमता कधीच समजू शकत नाहीत. आज अशा एका तरुणाला भेटणार आहोत ज्याने परिस्थितीच्या नावाने खडे न फोडता तिचा सामना केला आणि आपल्या कष्टांच्या जीवावर दिवस रात्र मेहनत करून तब्बल २ हजार कोटींची कंपनी आज उभी केली आहे.
या तरुणाचं नाव आहे मुस्तफा पीसी. अन या तरुणाचा प्रोडक्ट तुमच्या पाहण्यात मागील काही दिवसात नक्कीच आला असेल. मुस्तफा पीसीचा जन्म केरळमध्ये सुदूर नावाच्या एका खेडेगावात झाला. त्याचे वडील हे एक कष्टकरी मजूर होते. त्यांचं शिक्षणही झालेलं नव्हतं. घरची परिस्थिती देखील खूपच बेताची होती. वडिलांना कामात मदत करण्यासाठी मुस्तफाने ६ वि मध्ये नापास झाल्यानंतर शिक्षण सोडून दिलं. ते तेव्हा दिवसाला जास्तीत जास्त १० रुपये तेव्हा कमवत होते. दिवसात ३ वेळा जेवणाचा तर ते विचारही करू शकत नव्हते. मुस्तफाला देखील वाटायचं कि आपलं जेवण हे शिक्षणापेक्षा महत्वाचं आहे.
पुढे एका शिक्षकाने मुस्तफाला शाळेत पुन्हा येण्यासाठी मदत केली आणि त्याला पुन्हा शिक्षण सुरु करण्यास सांगितलं. त्याला शिक्षणाचं महत्व त्या शिक्षकाने पटवून दिलं. शिक्षकाने सांगितलं कि तू शिकून नोकरी केली तर तुझ्या मजुरी करणाऱ्या वडिलांना थोडे चांगले दिवस बघायला भेटतील. मुस्तफाचे शिक्षण सुरु झाले. एकेकाळी खायला महाग असलेल्या मुस्तफाची आज देशातील एक टॉपची खाद्य पदार्थ बनवणारी कंपनी आहे.
त्या शिक्षकाने फक्त शाळेत वापस नाही नेलं तर त्याला मोफत शिक्षण देखील दिलं. मुस्तफा गणित विषयात वर्गात टॉप आला. त्यामुळे त्याचा उत्साह अजून वाढला आणि जोमाने अभ्यास करून तो शाळेत देखील टॉपर आला. कॉलेजला जायला देखील त्याच शिक्षकांनी त्याला मोठी मदत केली. शिक्षकानीच त्याची कॉलेजची फीस भरली. पुढे मुस्तफाने आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्याला १४ हजार पगाराची पहिली नोकरी मिळाली. त्याने पूर्ण पैसे आपल्या वडिलाना दिले. वडील रडून म्हणाले तू माझ्या आयुष्यात कमावलेल्या सर्व पैशांपेक्षा जास्त कमावलं आहेस.
पुढे चालून त्यांचं आयुष्य अधिक सुधरत गेलं. मुस्तफाला विदेशात नोकरी मिळाली. त्याच्या वडिलांकडे २ लाखाचे कर्ज होते. ते मुस्तफाने २ महिन्यातच फेडले. त्याला चांगल्या पगाराची नोकरी असून त्याच मन रमत नव्हतं. त्याला स्वतःच काही तरी सुरु करायचं होतं. तेव्हा त्याच्या डोक्यात फ्रेश खाद्य पदार्थ बनवण्याची आयडिया आली. त्याचा एक भाऊ साध्या पॅकिंगमध्ये इडली डोसाचे आयत्या पिठाचे पाऊच विकायचा. त्याच्या क्वालिटी बद्दल तक्रारी मुस्तफाला माहिती होत्या.
त्या भावाने मुस्तफाला चांगल्या गुणवत्तेची हे आयतं पिठाची कंपनी चालू करण्याविषयी विचारणा केली आणि तिथंच जन्म झाला आई डी फ्रेश फूड कंपनीचा. मुस्तफाने सुरुवातीला कंपनीमध्ये ५० हजार गुंतवणूक केली. आणि त्याच्या भावाला त्याने पूर्ण काम सांभाळू दिलं. त्यांनी ५० फूट जागेत किचनमध्ये ग्राइंडर, मिक्सर आणि एक वजन काट्यासोबत सुरुवात केली. त्यांना सुरुवातीला खूप कमी प्रतिसाद मिळाला. पण ९ महिन्यांनी त्यांचे एका दिवसात १०० पॅकेट विकले गेले. त्या दरम्यान त्यांनी अनेक चुका केल्या आणि त्या सुधारल्या देखील.
३ वर्ष असच सुरु राहीलं आणि नंतर मुस्तफाने आपली परदेशातील नोकरी सोडून देऊन कंपनीला पूर्ण वेळ द्यायचं ठरवलं. त्याने आपली पूर्ण सेविंग कंपनीमध्ये लावून सुरुवात केली. आईवडिलांचा नोकरी सोडायला विरोध होता. पण त्यांना समजावलं. त्यानंतर त्याने भावासोबत ८ वर्ष आपल्या कंपनीमध्ये संघर्ष केला. पुढे त्यांच्या कंपनीला एका मोठा गुंतवणूकदार मिळाल्याने कंपनीचं नशीबच बदललं. आज iD फ्रेश फूड कंपनी २ हजार कोटींची कंपनी बनली आहे. कंपनीमध्ये काम करणाऱ्या अनेकांना मुस्तफाने आज करोडपती बनवलं आहे.
२०११ मध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल होती २९४ कोटी. मुस्तफाला त्या शिक्षकाची पुन्हा भेट मिळाली नाही ज्याने त्याच आयुष्य बदललं होतं. एका मजुराच्या मुलाचा हा एवढी मोठी कंपनी स्थापन करण्यापर्यंतचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. मुस्तफाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.