गेले दोन तीन दिवस झाले पेगाससची सगळ्याच माध्यमांवर चर्चा आहे. इस्राईलच्या NSO ग्रुपने तयार केलेल्या या स्पायवेअरद्वारे भारतातील ३०० हून अधिक लोकांचे फोन टॅप करण्यात आल्याचे आरोप मोदी सरकारवर करण्यात आले आहेत. ज्यांचे फोन टॅप केले गेले, त्या लोकांमध्ये राहुल गांधी, केंद्रातील दोन मंत्री, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा, अनेक पत्रकार, उद्योगपती इत्यादि लोकांचा समावेश आहे.
एकूणच हे गंभीर प्रकरण दिसत आहे. हे झालं आताच, पण काही वर्षांपूर्वी थेट अजित पवार यांचाच फोनहॅक करुन त्यावरुन लोकांना पैशांची मागणी करण्यात आल्याची घटना घडली होती. काय होतं ते प्रकरण जाणून घेऊया…
किस्सा आहे २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा ! निवडणुका म्हणलं की त्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पैशांचे व्यवहार होत असतात, त्यामुळे पोलीस प्रशासन अशा व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेऊन असते. उमेदवारीसाठी, प्रचारासाठी किंवा मतदारांना आमिष दाखवण्यासाठी अशा काळ्या पैशांचा वापर केला जातो. त्यामुळे अशा व्यवहारांमध्ये फसवणुकीच्याही अनेक घटना घडत असतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मात्र वेगळाच अनुभव आला.
मुंबईत नरेंद्र राणे नावाचे सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी विश्वस्त आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचेही पदाधिकारी आहेत. २९ सप्टेंबर २०१९ रोजी नरेंद्र राणे यांना अजित पवार यांच्या फोन नंबरवरुन कॉल आला. फोनवर कुणाल नावाचा व्यक्ती बोलत होता. त्याने आपण अजितदादांच्या वतीने बोलत असल्याचे सांगितले. “दादा आता पुण्यामध्ये आहेत, त्यांना मुंबईतील एका व्यक्तीला ताबडतोब मोठी रक्कम द्यायची आहे. मी दिलेल्या बँक अकाउंटवर १० मिनिटात व्यवस्था करुन तुम्ही ती रक्कम जमा करा.”
थेट अजित पवारांच्या फोन नंबरवरुन फोन आल्याने राणे यांनी फोनवर “हो” म्हणून फोन ठेवला. पण थेट अजितदादांच्या फोनवरुन मला पैसे मागण्यासाठी फोन कसा येईल अशी राणेंना शंका आली आणि त्यांनी अजित पवारांच्या पीएला फोन केला. अजितदादा पुण्यात आहेत का ते कन्फर्म केले. नंतर खुद्द अजितदादांना फोन करुन त्यांनी मी अर्ध्या तासात पैशांची व्यवस्था करतो असे सांगितले.
त्यावर अजित पवारांनी “कसले पैसे” असा प्रश्न विचारला. त्यावर राणेंनी त्यांना घडलेला किस्सा सांगितला. हे ऐकून अजित पवार म्हणाले, “तुम्ही कोणत्या पैशासंदर्भात बोलत आहात ? मी तुम्हाला फोनच केला नाही.” हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर राणेंनी सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार केली.