भारतात ओला कंपनीची नवीन “इलेक्ट्रिक स्कुटर” सध्या फारच चर्चेत आहे. ही स्कुटर लाँच व्हायच्या आधीच बुकिंग सुरु झाल्यापासून केवळ एका दिवसातच या स्कुटरला देशभरातून १ लाख प्री-बुकिंग मिळाल्या आहेत. त्यामुळे ओलाच्या आगामी इलेक्ट्रिक स्कुटरला जगातील सर्वात जास्त प्री-बुक्ड स्कुटर ठरण्याचा मान मिळाला आहे. देशभरात पेट्रोलच्या आणि सीएनजीच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्रीनितीन गडकरी यांनीही “आगामी काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत पहिल्या क्रमांकावर असेल” असे सूतोवाच केले होते.
देशात इलेक्ट्रिक स्कुटर्सविषयी निर्माण होत असलेली क्रेझ ट्रेंड लक्षात घेऊन ओलाने केवळ ४९९ रुपयांच्या टोकनवर ग्राहकांना ही स्कुटर बुक करता येईल असे जाहीर केले होते. त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने सध्या ओला कंपनीची दिवाळीच झाल्याचे मानले जात आहे.
ओला हे नाव आपल्या सर्वाना आधीपासूनच एका अर्थाने परिचित आहे, ते म्हणजे कॅब बुकिंग संदर्भात ! भारतातील कुठल्याही शहरात गेल्यानंतर तुम्हाला अगदी तंतोतंत तुम्ही सांगेल त्या पत्त्यावर घेऊन जाणाऱ्या ओला कॅबचा आपणही अनेकदा वापर केला असेल. ओलाच्या केवळ टॅक्सीच नाही, तर ऑटोरिक्षा आणि बाईकही हायर करता येतात. आजच्या घडीला ओला ही भारतातील सर्वात मोठी कॅब सुविधा पुरवणारी कंपनी आहे. केवळ १०-११ वर्षात ओलाने भारतात स्वतःचे एक वेगळे विश्व निर्माण केले आहे.
ओलाच्या निर्मितीची कथाही तितकीच मनोरंजक आहे. लुधियाना (पंजाब) येथील भाविश अग्रवाल हा तरुण मुंबईमध्ये आयआयटी शिक्षण घेऊन मायक्रोसॉफ्ट कंपनीत जॉबला लागला होता. त्याठिकाणीच काम करत असताना भाविशने स्वतःची देसीटेक.इन नावाची तंत्रज्ञानविषयक माहितीची वेबसाईटही सुरु केली होती. त्यावरुन तो भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन स्टार्टअप्सविषयी माहिती द्यायचा. परंतु त्याचा हा प्रयत्न एक दिवस त्याच्या स्वतःच्याच कामी येणार आहे याची त्याला जराही कल्पना नव्हती.
एकदा भाविश आपल्या काही मित्रांसोबत टॅक्सीने बेंगलोरहून बांदीपूरला विकेंड ट्रिपसाठी निघाला होता. अचानक म्हैसूरमध्ये टॅक्सीचालकाने टॅक्सी थांबवली आणि आपल्याला ट्रिप परवडत नाही वगैरे कारण सांगत ज्यादा पैशांची मागणी करु लागला. पण भाविश काय ज्यादा पैसे द्यायला तयार नव्हता. शेवटी त्या सर्वांना तिथेच सोडून टॅक्सीचालक निघून गेला. त्यावेळी २३ वर्षांच्या भाविशच्या डोक्यात विचार आला की आपल्याला असा त्रास असेल तर सर्वसामान्यांना प्रवासाच्या किती अडचणी असतील.
भाविशला तंत्रज्ञानाची आवड होतीच, त्यातूनच त्याला रेंटल कार सर्व्हिसची कल्पना सुचली. त्याने घरी याविषयी सांगितले, तर घरच्यांनी त्यालाच वेड्यात काढले. पण भाविशने कुणाचेही ऐकले नाही. २०१० साली त्याने मायक्रोसॉफ्टची मोठ्या पगाराची नोकरी सोडली आणि अंकित भाटिया या आपल्या मित्रासोबत ओला कंपनीची स्थापना केली.
११ वर्षांनी जेव्हा भाविशच्या निर्णयाबद्दल विचार करायचा झाला, तर आज ओला भारतातील सर्वात मोठी रेंटल कार सर्व्हिस देणारी कंपनी बनली आहे. ज्या भाविशला एका टॅक्सीचालकाने अपमानास्पद वागणूक दिली, तोच भाविश आज ओलाच्या माध्यमातून जवळपास १५ लाखाहून अधिक टॅक्सीचालकांना रोजगार देत आहे.