आयुष्यात आपल्याला काय करायचं हे आपल्या आवडीवर छंदावर अवलंबून असतं. आपण आपल्याला असणाऱ्या छंदाप्रमाणे जर आयुष्यात पुढे जायचं ठरवलं तर यश नक्कीच मिळतं. कोणतीही गोष्ट करायची म्हंटलं तर ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन करण्याची तयारी असायला हवी. स्वतःच्या कमजोरी आणि शक्ती आधी ओळखता देखील आल्या पाहिजेत. आज अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्याने आपल्या स्वतःच्या नावाने आज महाराष्ट्रातच नवे तर परराज्यात देखील हॉटेलचे मोठे साम्राज्य उभे केले आहे. अन विशेष बाब म्हणजे या व्यक्तीचा वडील हा एका हॉटेलमध्ये वेटर होता. बघूया या व्यक्तीची यशोगाथा..
मुंबईतल्या ग्रॅण्ट रोड भागात राहणारे इंदिरा आणि वेंकटराव कामत. वेंकटरावांनी आयुष्यात एवढा संघर्ष केला कि त्याच फळ त्यांना मिळणारच होतं. वेंकटरावांनी ८ वर्षाचे असताना काम करण्यासाठी मुंबई गाठली होती. ते एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करायला लागले. अनेक दिवस काम केल्यानांतर एकेदिवशी त्यांच्या मालकाला त्यांच्या गावी अर्जंट जायचं होतं. ते ८-१० दिवसासाठी जाणार असल्याने त्यांनी हॉटेलवर वेटर असणाऱ्या वेंकटला हॉटेलचं काम बघण्यास सांगितलं. त्यांनी हॉटेलच्या चाव्या आणि गल्ला वेंकटला दिला आणि ते गावाला गेले.
पण झालं असं कि थोड्या दिवसासाठी गेलेले ते मालक दीड वर्ष काही कारणाने येऊ शकले नाही. थेट दीड वर्षांनी ते आले तेव्हा ते वेंकट याना भेटले. आता एवढे दिवस वेटरच्या हाती हॉटेल दिल्यावर काही उरेल अशी अपेक्षाच त्यांना नव्हती. पण ते आल्यानंतर वेंकट यांनी त्याकाळी ३६ हजार रुपये त्यांच्या हातात दिले आणि सांगितलं कि हा दीड वर्षाचा नफा. मालक खूपच खुश झाले आणि त्यांनी वेंकटचं कर्तृत्व, इमानदारी ओळखली. हा नक्कीच काही करून दाखवेल या अपेक्षेने त्यांनी थेट आपली मुलगी व्यंकटला देऊ केली.
मालक स्वतः म्हणाले माझ्या मुलीशी लग्न कर पण व्यंकट म्हणाले मी जेव्हा माझं स्वतःच हॉटेल काढेल तेव्हा तुमच्या मुलीचा विचार करेल. वेंकटरावांनी स्वतःचं हॉटेल सुरु केलंच आणि मालकाच्या मुलीशी लग्न देखील केलं. याच व्यंकटरावांना पुढे मुलगा झाला ज्याचं नाव म्हणजे विठ्ठल कामत. होय तेच विठ्ठल काम ज्यांच्या नावाच्या हॉटेल तुम्हाला महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात फिरताना हायवेला नक्कीच दिसल्या असतील. विठ्ठल यांना आपल्या वडिलांकडूनच हॉटेल व्यवसायाची प्रेरणा मिळाली. पण त्यांनी त्यासाठी जो काही संघर्ष केला आहे तो देखील आपल्याला खूप काही शिकवून जातो.
विठ्ठल यांचं पहिलं हॉटेल होतं सत्कार नावाचं. जे त्यांच्या वडिलांनी आईचे दागिने गहाण ठेवून सुरु करून दिलं होतं. त्यामुळे त्यांना हॉटेल सुरु करायला तर कष्ट करावे लागले नाही. पण त्यांचं बालपण मात्र खूप चांगलं झाल्यामुळे त्यांच्यात अनेक विशेष गुण होते. वडील खूप कडक शिस्तीचे असल्याने त्यांच्यावर खूप चांगले संस्कार झाले होते.
त्यांना आवडीचे काम करण्याची शिकवण त्यांच्या आईवडिलांकडूनच मिळाली होती. आईनेच त्यांना सल्ला दिला होता कि तुझं नाव वडिलांपेक्षा मोठं होईल असं काही तरी कर. झालंही असच, वडिलांनीच एकेदिवशी त्यांना सांगितलं कि आज मला तुझे वडील म्हणून लोक ओळखायला लागलेत. पण हे नाव कमावणासाठी त्यांनी खूप कष्ट केले.
विठ्ठल यांच्या वडिलांचं साधं हॉटेल असल्याने लोक त्यांच्याकडे हॉटेलवाले म्हणून तुच्छतेने बघायचे. तेव्हा विठ्ठल याना खूप वाईट वाटायचं. विठ्ठल कामत यांच्या बिजनेस वाढीची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा त्यांनी गुजरातमध्ये असलेलं मित्राचं हॉटेल चालवायला घेतलं. ते हॉटेल चालत नसल्याने मित्राने त्यांना विचारणा केली. हायवेवर हॉटेल असल्याने विठ्ठल तिथे पोहचले आणि हॉटेल चालू शकतं हे ओळखलं. त्यांनी आपल्या हॉटेलला आकर्षक पंचलाईन देऊन लोकांना आकर्षित केलं. त्या गुजरातच्या हॉटेलला त्यांनी पंचलाईन दिली रमत गमत विठ्ठल कामत. त्यांच्या बाकी हॉटेलला पण अशाच पंचलाईन आपल्याला आज बघायला मिळतात. जसं कि फोर्ट जाधवगढला लढ झगड आगे बढ, विठ्ठल कामत हॉटेलला सच्चा है अच्छा है. या पंचलाईन मुले लोक आकर्षित झाली.
पण त्यांनी पहिल्या हॉटेलमध्ये लोकांना खेचण्यासाठी एक आयडिया केली होती. ती म्हणजे त्यांनी हायवेवर लोकांना हॉटेलच्या समोर मित्रांच्या १०-१२ गाड्या आणून लावल्या. लोकांना हि गर्दी बघून त्यांच्या हॉटेलमध्ये जावं वाटायचं. आतमध्ये रिकामं जरी असलं तरी त्यांनी चांगली सर्व्हिस आणि चव देऊन कस्टमर पक्के केले. त्यांनी ग्राहकांच्या गाड्यांच्या काचा पुसण्यापासून सर्व गोष्टी केल्या. जर्मनीवरून खास वायपर आणले होते त्याने ते लोकांच्या गाड्या साफ करायचे. यामुळे लोक जोडले गेले.
त्यांनी जगावेगळं हॉटेल करण्याचं ठरवून ऑर्किड हॉटेल हे झिरो गार्बेज हॉटेल बनवलं. दुसरं हॉटेल केलं पर्यावरणपूरक. त्यांच्या हॉटेलला ३७४ अवॉर्ड्स भेटले आहेत. विठ्ठल यांनी एकदा तर जीव द्यायचं पण ठरवलं होतं. त्यांचं ऑर्किड हॉटेल नातेवाईकांनी चाल करून विकायला काढलं तेव्हा त्यांनी असा मनात विचार आणला होता. पण जेव्हा ते एका मित्राकडे गेले तेव्हा त्यांना एक बिल्डिंगला रंग देणारा पेंटर दिसला जो काहीही सुरक्षा न घेता २३ व्या मजल्याला रंग देत होता. विठ्ठल यांनी विचार केला कि हा माणूस ७००० रुपयांसाठी आपल्या प्राणाची चिंता न करता काम करतोय तर आपण जीव का द्यायचा. त्यांनी तेव्हाच हार न मानायचं ठरवलं. ते आज असंख्य हॉटेलचे मालक असून आज ते करोडोंची उलाढाल करतात.