कालपासून सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हि पोस्ट आहे तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांची. त्यांनी केलेली भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. त्यांनी आपल्या खुर्चीवर वडिलांना बसवून त्यांच्यासोबत फोटो घेतला आणि त्यावर काही शब्द लिहून ते आपल्या फेसबुकवर टाकले.
समाधान यांनी लिहिलंय “आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सुवर्ण दिवस, ज्या माणसाला आयुष्यभर तहसील कार्यालयाचे खेटे मारत असताना तेथील शिपाई सुद्धा नीट बोलला नाही. त्या माणसाच्या कष्टाने मी तहसीलदार, उपजिल्हाधिकारी झालो व त्या माणसाला आज तहसीलदार कार्यालयात दिव्याच्या गाडीतून घेऊन जाणं व तहसीलदारच्या खुर्चीवर बसवणं हे माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण होता. तो माणूस म्हणजे माझे वडील,”अण्णा” त्यांचं खुर्चीवर बसताना भावुक होताना आलेले आनंदाश्रू मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. माझ्या वडिलांचा प्रवास:-एक सालगडी ते उपजिल्हाधिकाऱ्याचा बाप..…अण्णा तुम्ही आहात म्हणून मी आहे… जिंकलंय आपण अण्णा”
समाधान यांच्या या पोस्टला नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. समाधान गायकवाड हे अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन आज उपजिल्हाधिकारी म्हणून सेवा करत आहेत. एका सलगाड्याचा मुलगा ते उपजिल्हाधिकारी हा प्रवास खूप खडतर होता. जाणून घेऊया समाधानचा हा संपूर्ण प्रवास..
समाधान हा मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील अरणगाव ग्रुप ग्रामपंचात मध्ये असलेल्या लाकीबुकी या गावचा. वडील भास्करराव गायकवाड हे शेती करतात. गावची लोकसंख्या खूप कमी आहे. गाव हे अतिशय दुर्गम असून गावात जायला साधा डांबरी रस्ता देखील नाही. गाव एवढे मागास आहे कि समाधान हा गावातील पहिला ग्रॅज्युएट आहे. शिवाय तो पहिला इंजिनिअर देखील आहे. गावातील पहिला सरकारी अधिकारी देखील तोच बनला.
परांडा तालुका हा दुष्काळी भाग आहे. १२ एकर शेती असूनही त्यांची परिस्थिती खूप बेताचीच होती. आई वडील दोघेही शेतात काम करतात. वडील शिकलेले नव्हते पण त्यांना शिक्षणाचे महत्व माहिती होते. ते समाधानला शिक्षणासाठी नेहमी आग्रही राहिले. समाधानची देखील शिक्षणाकडे ओढ होती. घरची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती. गाव हे दुर्गम असल्याने गावात कधी बस येत नव्हती. गावात साधं किरणा दुकान देखील नव्हतं. गावात शाळा देखील फक्त ३ री पर्यंत होती.
समाधानने गावातच तिसरीपर्यंत शिक्षण घेतलं. पुढे त्याला दुसऱ्या गावात जाऊन शिक्षण घ्यावा लागलं. मामाच्या गावात त्याने चौथी पाचवीचं शिक्षण घेतलं. त्याला दहावीपर्यंत ३ वेळा वेगवेगळ्या गावात शिक्षणासाठी जावं लागलं. त्याला शिक्षक चांगले मिळाले त्यामुळे अभ्यासाची गोडी तयार झाली आणि मार्गदर्शनही चांगलं मिळालं. समाधान स्वतः अभ्यास करत असे. दहावीपर्यंत घरी लाईट नव्हती. दिव्याच्या प्रकाशात त्याने अभ्यास केला. वडिलांनी दहावीला त्याला सांगितले कि ८० च्या वर मार्क नाही मिळाले तर तुझी शाळा बंद होऊ शकते. त्यामुळे त्याने अधिक नेटाने अभ्यास केला आणि दहावीत ८७ टक्के मिळवले.
वडील चौथी पास तर आई तिसरी पास असल्याने त्यांनी पूर्ण निर्णय समाधानाच्या मनावर सोपवला. पुढे तो अकरावीला बार्शीला गेला. तिथं सायन्सला प्रवेश घेतला. १० वि पर्यंत मराठी मेडीयम असल्याने पुढे अडचणी येत होत्या. पण त्यावर त्याने मात केली. बारावीत खूप अभ्यास केला आणि ८२ टक्के मिळवले. त्याच्या कॉलेजमध्ये तो सीईटी मध्ये देखील पहिला आला. पुढे पुण्यात मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. कॉलेजची फी ७२ हजार रुपये होती. ती झेपणार नव्हती. घरची परिस्थिती नव्हती. शैक्षणिक लोन साठी अर्ज केला होता. बँकांनी सुरुवातीला देण्यास टाळाटाळ केली पण नंतर ते मिळालं आणि इंजिनिअरिंग पूर्ण केली.
स्पर्धा परीक्षा द्यायचं हे इंजिनिअरिंग मधेच ठरवलं होतं. २०१५ मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली. पुस्तकं शोधायला सुरु केलं. प्रत्येक विषयाचे ठराविक बुक घेतले. सुरुवातीला समाधानला यूपीएससी करायची होती. त्याने १६ मध्ये यूपीएससी दिली. पूर्व परीक्षेत त्याचा थोडक्यात कट ऑफ हुकला. पुढे MPSC ची जाहिरात आली. नंतर त्याने एमपीएससी करण्याचं ठरवलं. जानेवारी २०१७ मध्ये त्याने एमपीएससी चा खरा अभ्यास सुरु केला. जॉब करत नसल्याने घरी परिस्थिती आणखीनच बिकट होत होती. दुष्काळ होता.
त्यामुळे त्याच्यावर दबाव जास्त होता. पीककर्ज घेण्याचा प्रयत्न केला पण ते भेटलं नाही. १७ च्या पूर्व परीक्षेत १८९ मार्क घेऊन काठावर यशस्वी झाला. पण मेन्सला मात्र त्याला अपयश आले. तो पीएसआय साठी देखील प्रयत्न करत होता. त्याला मुख्य परीक्षेत यश देखील मिळालं होतं. पण तो फिजिकलला काही गेला नाही. कारण त्याला राज्य सेवाच पास करायची होती. राज्यसेवा २०१८ ची तयारी त्याने सुरु केली. जागा खूप कमी होत्या. अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. समाधान हा कुठल्याही क्लासला जात नव्हता. तो स्वतः अभ्यास करत होता.
एप्रिल १८ मध्ये २७२ स्कोर घेत तो पास झाला. मेन्सची तयारी केली. ऑगस्ट १८ मध्ये मुख्य परीक्षा झाली. त्यात चांगले मार्क मिळाले. जानेवारी १९ मध्ये औरंगाबादला मुलाखत झाली. निकाल हाती आला. समाधान तहसीलदार झाला होता. वडिलांना कॉल केला तर ते नुकतंच शेतातून आले होते. त्यांना तहसीलदार झालो म्हणून सांगितलं ते निशब्द झाले. समाधानचं उपजिल्हाधिकारी पद थोडक्यात हुकलं होतं. त्यामुळे त्याने तहसीलदार झाल्यानंतरही राज्य सेवा परीक्षा दिली आणि २०१९ च्या परीक्षेत तो उपजिल्हाधिकारी झाला.