एका कॉलेजमध्ये भाईगिरी करणारा, गावामध्ये दादा म्हणून ओळख असलेला व्यक्ती स्वतःचा झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी एक अधिकारी बनतो हे एक प्रेरणा घेण्यासाठी मोठं उदाहरण आहे. आणि हे चित्रपटातील कथा वाटेल असे काम केले आहे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील विजेंद्र तुळशीराम नाचन यांनी.
विजेंद्र नाचन यांचा जीवनप्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या अपमानाला स्वतःसाठी प्रेरणा बनवले आणि ते आज एक सक्षम अधिकारी बनले आहेत. विजेंद्र यांचं प्राथमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय कन्नड येथे झालं. नंतर ८-१० पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळा कन्नड येथे झालं. त्यांच्या आईची सुरुवातीपासूनच इच्छा होती कि मुलाने एक अधिकारी बनावं.
आईने मुलाला अधिकारी बनवण्यासाठी चांगलं शिक्षण मिळावं म्हणून ११-१२ वीला औरंगाबादला पाठवलं. पण तिथे विजेंद्र हे वेगळ्या मार्गाला लागले. राजकारण आंदोलन याकडे त्यांचा कल वाढला. यामुळे अभ्यासात लक्ष कमी झाले आणि १२ वि मध्ये ते गणितात नापास झाले. नंतर त्यांनी कन्नडला बारावीची पुन्हा परीक्षा दिली.
१२ वी रिपीट करताना विजेंद्र यांनी एमएससीआयटी केली. नंतर तिथेच ते मुलांना कॉम्पुटर शिकवायला लागले. सोबतच हार्डवेअर नेटवर्किंग देखील शिकून घेतलं. पण त्यावेळी थोड्या टवाळखोर मुलांच्या संगतीत ते आले. त्यावेळी त्यांनी एक राजे ग्रुप तयार केला. त्या माध्यमातून समाजसेवा त्यांनी केली. पुढे १२ वी नंतर त्यांना इंजिनिअरिंग करायचं होतं.
पण त्यांनी पुढे शिवाजी कॉलेजला बीएस्सी कॉप्युटरला प्रवेश घेतला. या कॉलेजमध्ये त्यांनी समाजकार्य सुरु ठेवलं. पण राजे ग्रुपमुळे त्यांची एक वेगळी दहशत आणि भाईगिरी निर्माण झाली. त्यानंतर अनेकदा कॉलेजमध्ये भांडण देखील झाले.
त्या एका घटनेने बदललं आयुष्य-
विजेंद्र यांच्या छोट्या बहिणीचा शिवाजी कॉलेजलाच १२ वीच्या पेपरसाठी नंबर आला. बहिणीला पेपरला खराब बेंच मिळाला आणि तो बदलून मिळत नव्हता आणि पॅड देखील वापरून दिला जात नव्हता. त्यावेळी विजेंद्र थेट वर्गात गेले आणि बहिणीला पॅड दिला. त्यावेळी त्याची ओळख सर्वाना असल्याने कोणी त्या अडवले नाही पण दुसऱ्या कॉलेजमधून आलेले पर्यवेक्षक तिथे आले आणि त्यांनी त्याला कॉपी देत असल्याचे म्हंटले आणि पोलिसांना बोलावले.
त्यावेळी तिथे आलेल्या पीएसआयने क्षणाचाही विचार न करता आल्या आल्या विजेंद्रच्या कानशिलात लगावली. त्यामुळे सर्व कॉलेजसमोर भाईगिरी तर उतरलीच पण असलेली इज्जत देखील गेली. याच अपमानाने त्याचे विचार बदलले आणि पीएसआय बनण्याचे ठरवले. औरंगाबादला येऊन मित्रांसोबत ३-४ वर्ष तयारी केली. पण अनेक प्रयत्न करून एकही परीक्षा ते पास झाले नाही. नंतर ते खूप खचले पण त्यांनी हार मानली नाही.
२०१६ ला PSI ची जाहिरात आली. त्यावेळी खूप मेहनत विजेंद्र यांनी घेतली आणि २०१६-१७ मध्ये प्री परीक्षा पास केली. नंतर मेन्सचा खूप अभ्यास केला. नंतर मेन्सची परीक्षा झाल्यावर फिजिकलची चांगली तयारी केली. नंतर विजेंद्र मेन्स काठावर पास झाले. फिजिकल मध्ये मात्र त्यांच्याकडून काही चुका झाल्या आणि मार्क कमी मिळाले. त्यांना मुलाखत दिल्यानंतर निकाल लागेपर्यंत आपण निवडले जाऊ का नाही याबाबत भीती होती. पण पुढे निकाल लागला आणि विजेंद्र नाचन PSI बनले. पुढे ज्या कॉलेजमध्ये भाईगिरी केली त्याच कॉलेजमध्ये अधिकारी झाला म्हणून सत्कार झाला.