आज भारतीय क्रिकेट संघाचा देशभरात दबदबा बघायला मिळतो. भारतीय क्रिकेट संघात एक से बढकर एक असे अनेक दिग्गज खेळाडू नेहमीच देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवत राहिले आहेत. क्रिकेटविश्वाला भारताने अनेक सर्वोत्तम खेळाडू दिले आहेत. मग ते कपिल देव असोत किंवा आताचे विराट कोहली. आज आपण अशा एका खेळाडूची गोष्ट जाणून घेणार आहोत जो आज भारतीय क्रिकेटची शान आहे.
या क्रिकेटपटूचं नाव आहे रोहित गुरुनाथ शर्मा. रोहित शर्मा हा मुंबईकर म्हणून ओळखला जातो. पण प्रत्येक्षात मात्र तो नागपूरचा पोट्टा आहे. कारण रोहितचा जन्म हा नागपूरचा. ३० एप्रिल १९८७ रोजी नागपूरच्या बनसोड मध्ये रोहितचा जन्म झाला. रोहितचे वडील गुरुनाथ हे मूळचे नागपूरचे. पण रोहितची आई पौर्णिमा मात्र मूळची विशाखापट्टणमची आहे. रोहितला त्यामुळे मराठी हिंदी इंग्रजी सह तेलगू भाषाही चांगली बोलता येते.
रोहितचे कुटुंब हे खूप सर्वसामान्य होते. वडील गुरुनाथ हे नोकरी करायचे. पण त्यांची नोकरी सुटली आणि कुटुंबाची जबाबदारी लहानपणीच रोहितवर आली. रोहितसमोर मोठे आव्हान होते. त्याला क्रिकेटची लहांपणीपासूनच खुप आवड होती. त्याने घर तर संभाळलंच पण त्यासोबत क्रिकेटचे धडे घेणे देखील सुरु ठेवले. रोहित शाळेतही हुशार होता. त्याला शाळेतून स्कॉलरशिप मिळत असे. रोहितवर अशी देखील वेळ यायची कि त्याच्याकडे क्रिकेटच्या क्लासचे फीस भरायला पैसेच नसायचे. तो आपल्या शाळेच्या स्कॉलरशिप मधून क्लासची फी भरायचा.
रोहित हा लहांपणीपासूनच भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा खूप मोठा फॅन होता. रोहित जेव्हा शाळेत जायचा तेव्हा एकेदिवशी त्याला समजलं कि त्याच्या परिसरात वीरेंद्र सेहवाग येणार आहे. त्याने सेहवागला बघण्यातही आपल्या शाळेला चक्क दांडी मारली होती. रोहित सेहवागचा चाहता असला तरी त्याने क्रिकेटची कारकीर्द एक ऑफस्पिनर म्हणून सुरु केली होती.
रोहित हा सुरुवातीच्या काळात गोलंदाजीच करत असे. पण एकेदिवशी रोहितची फलंदाजी बघून त्याचे कोच दिनेश लाड यांनी त्याला फलंदाजीवर लक्ष देण्यास सांगितले. रोहित हा आपल्या शिक्षणासाठी बोरिवली मध्ये आजोबांकडे राहायला होता. तिथंच त्याने दिनेश लाड यांच्याकडे बॅटिंगने धडे घेतले. विवेकानंद शाळेकडून नेहमी ८ नंबरला खेळणारा रोहित एकेदिवशी ओपनिंगला आला आणि शतक झळकावलं. तेव्हापासून त्याची कारकीर्द खरी फलंदाज म्हणून सुरु झाली.
डोमेस्टिक क्रिकेट करिअरची २००५ मध्ये सुरुवात करणाऱ्या रोहितने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात २००७ मध्ये केली. त्याने आयर्लंडविरुद्ध वनडे संघात तर त्याच वर्षी इंग्लंडविरोधात टी २० मध्ये पदार्पण केलं. रोहित शर्माने सुरुवातीच्या काळातच आपली छाप भारतीय संघात सोडली. त्याची कारकीर्द खरी बहरली मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदापासून. २०१३ मध्ये मुंबई इनियन्स संघाच्या कर्णधारपदी त्याची निवड झाली आणि त्याने आयपीएल ट्रॉफी देखील जिंकली. तेव्हापासून त्याची कारकीर्द बहरतच गेली.
रोहितने २०१३ मध्ये सचिन तेंडुलकरची अंतिम सिरीज असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्व कसोटी सामन्यात पदार्पण केले. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी त्याने आपल्या कसोटीच्या पदार्पणाच्या सामन्यातच १७७ धावांची खेळी खेळून आपली झलक आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखवून दिली. रोहित हा काही वर्ष फॉर्म मध्ये नव्हता. पण त्याने जेव्हा ओपनर म्हणून खेळायला सुरुवात केली तेव्हापासून त्याने धावांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.
वनडे सामन्यात जिथे काही संघाना २०० धावा देखील करायला कठीण जातं तिथं रोहितने एकट्याने ३ द्विशतकं झळकावले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर वनडेमधील २६४ हि सर्वोत्तम खेळी देखील आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स हा आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ देखील बनला आहे. मुंबई इंडियन्सने सर्वाधिक ५ आयपीएल ट्रॉफी रोहितच्या नेतृत्वात जिंकल्या आहेत.
रोहितने २०१५ मध्ये मैत्रीण रितिका सचदेह सोबत लग्नगाठ बांधली. डिसेम्बर २०१८ मध्ये त्यांना मुलगीही झाली. रोहितच्या मुलीचं नाव समायरा आहे. तो कुटुंबियांसोबत वेळ नेहमी घालवतो. शिवाय त्याला क्रिकेटर मित्रांसोबत वेळ घालवायला देखील आवडतं. रोहित हा क्रिकेट क्षेत्रात आज एक दिग्गज फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या पुढील कारकीर्दीस शुभेच्छा.