Monday , June 5 2023
Breaking News
Home / ट्रेंडिंग / एकेकाळी ट्रॅक्टरने नांगरणी केली, मजुरी केली, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची मुलगी मेहनतीने PSI झाली..

एकेकाळी ट्रॅक्टरने नांगरणी केली, मजुरी केली, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची मुलगी मेहनतीने PSI झाली..

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कष्ट केले तर कोणत्याही परिस्थितीत यश मिळतेच हे दाखवून दिले आहे एका दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीने. अत्यंत नाजूक परिस्थितीतून तिने मिळवलेले हे यश सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे. परिस्थितीच्या नावाने खडे फोडणाऱ्यांसाठी तर तिचा जीवनप्रवास खूपच प्रेरणादायी आहे.

अत्यंत गरीब सामान्य कुटुंबातून येऊन यशाला गवसणी घालणारी हि तरुणी आहे मीना भीमसिंग तुपे. मीना यांचा जन्म बीड जिल्ह्यातील दगडी शहाजानपूर (खामखेडा) येथील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबात झाला. आईवडील भीमसिंग तुपे आणि शशिकला तुपे यांना फक्त ४ एकर कोरडवाहू शेती. त्यात त्यांना ४ मुली आणि एक मुलगा. मीना तुपे या ४ मुलीत सर्वात मोठ्या.

एवढ्या मोठ्या कुटुंबाचा गाडा ४ एकर कोरडवाहू जमिनीवर चालवणे तसे कठीणच काम. मीना या देखील आपल्या आईवडिलांना लहानपणीपासूनच शेतीमध्ये मदत करायच्या. मीनाने ट्रॅक्टरने नांगरणी करण्यापासून ते दुसऱ्याच्या शेतात मजुरी करण्यापर्यंत सर्व कामे केली.

आईवडिलांचे वय सत्तरीत गेल्याने ते थकले होते. त्यामुळे त्यांच्याबरोबरच तीन लहान बहिणी व भावाची जबाबदारीही मीना यांच्यावरच होती. अगदी बालपणीपासून मीनाच्या वाट्याला संघर्ष आला. लहानपणी शाळेत जायला शाळेचे साहित्य देखील तिला मिळायचे नाही. घरची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती.

मुलींनी फार शिकण्याची गरज नाही असे आईचे म्हणणे. त्यामुळे तिच्या एका बहिणीने इयत्ता चौथीत तर अन्य बहिणीने इयत्ता आठवीत असताना शाळा सोडली. परंतु, मिनाचा शिक्षणाचा हट्ट कायम राहिला. मीनाने शेतात मजुरी केली पण आपले शिक्षण पूर्ण केलेच. तिला शिक्षणशास्त्र पदविकेचे शिक्षण घेऊन शिक्षिका व्हायचे होते. पण त्याच दरम्यान २०१० मध्ये बीड जिल्ह्यात पोलीस भरती निघाली आणि ती भरतीत जाऊन पोलीस हवालदार झाली.

तिचे पोलीस हवालदार या पदावर काही मन रमले नाही. तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी सुरू केली. त्यानंतर प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्तीच्या बळावर मीनाची २०१३ मध्ये PSI पदासाठी निवड झाली़.

मिना तुपे ठरली सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी-

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाल्यानंतर मीनाने खंडाळा येथे संपूर्ण राज्यातून उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११३ व्या तुकडीचा नाशिकमध्ये झालेल्या दीक्षान्त समारंभात मीनाला ‘स्वॉर्ड आॅफ आॅनर’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मीना तुपे पोलीस अकादमीच्या इतिहासात ‘सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी’पदाचा मान मिळविणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या.

लहानपणापासून शेतात केलेल्या कामांमुळे पोलीस उपनिरीक्षकासाठीचे प्रशिक्षण तिला खडतर भासले नाही. ७४८ प्रशिक्षणार्थीना मागे टाकून महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या इतिहासात प्रथमच महिलेने सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचा बहुमान प्राप्त केला होता.

About Mamun

Check Also

मोठ्या नेत्यांसोबत पंगा घेणारी महिला IPS अधिकारी, २० वर्षात ४० वेळा झाली बदली..

UPSC परिक्षेत पास होऊन IAS IPS होण्याचं अनेकजण स्वप्न बघतात. यामध्ये काहीजण असतात जे चांगली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *