सहसा एखाद्याचे वडील पोलीस खात्यात नोकरीला असले कि त्याला जरा वेगळे वळण लागते. ज्यामुळे पोलिसांच्या मुलांना स्वतःच्या आयुष्यात यश मिळवलं थोडं कठीण जातं. पण आज एका अशा मुलाला भेटणार आहोत ज्याचे वडील पोलीस खात्यात असताना देखील स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्याने पंपावर काम केले. पण हा तरुण आज एका फायनान्स कंपनीचा मालक आहे. जाणून घेऊया त्याचा जीवनप्रवास..
या तरुणाचे नाव आहे सागर उर्फ युवराज अहिवळे. सागरचे वडील पोलीस खात्यात नोकरीला असल्याने त्याचा जन्म शिवाजीनगर पुणे येथील पोलीस वसाहतीत झाला. त्याचं बालपण देखील येथेच गेले. पोलीस वसाहतीशेजारी असणाऱ्या मॉडर्न शाळेतच त्याचे शिक्षण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर सागरने नोकरीसाठी प्रयत्न केले. त्याला स्वतःच्या पायावर उभा राहायचं होतं. त्याने सरकारी नोकरीसाठीही प्रयत्न केले. पण नोकरी काही मिळाली नाही.
अखेर त्याने मिळेल ते काम करण्याचा निर्णय घेतला आणि शिवाजीनगर येथीलच सीएनजी पंपावर काम करायला लागला. पंपावर काम करत असतानाच त्याचं लग्न देखील झालं. रितिका विनायक निम्हण हिच्याशी तो विवाहबद्ध झाला. २०१४ मध्ये त्यांना मुलगीही झाली. पण त्याच दरम्यान त्याची पम्पावरची नोकरी गेली.
कुटुंबाची जबाबदारी वाढली असतानाच नोकरी गेल्याने तो संकटात सापडला. त्याच दरम्यान त्याने मोठ्या आयटी कंपन्यांची कम्प्युटर साहित्य त्याने इतर कंपन्यांना वाटण्याचे काम सुरु केले. हे काम कंत्राटदाराकडे तो करत होता. पण हे काम संपलं आणि त्याला घरी बसावं लागलं. २ वर्ष त्याने घरी काढले. आई वडील सर्व घरखर्च चालवत होते. वडील सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पेन्शनवर सर्व चालत होतं. घरी असताना सतत काही ना काही करण्याचे विचार त्याच्या डोक्यात येत होते.
एकेदिवशी आईने १० हजार रुपये देऊन काही तरी करण्याचा सल्ला त्याला दिला. त्याच दरम्यान आईचे निधन झाले. पुन्हा त्याचे काम करण्याचे स्वप्न मागे पडले. अखेर २ वर्षांनी वडिलांनी काही हातभार लावून काम करण्यास सांगितले. याच संधीचा फायदा घेत सागरने मित्रांना आणि अनुभवी सहकार्यांना सोबत घेऊन एक नोंदणीकृत फायनान्स कंपनी सुरु केली. यातून ते गरजूना आर्थिक हातभार लावायला लागले. २०१६ मध्ये १० हजार रुपयात सुरु केलेल्या त्याच्या या कामाची आज उलाढाल कोटींच्या घरात आहे.
त्याची फायनान्स कंपनी आज अनेकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या विवाहासाठी तसेच अचानक उदभवलेल्या वैद्यकीय खर्चासाठी अर्थसहाय्य करते. त्यांनी कोरोना काळात अनेक गरजूना मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि इतर मदत देखील केली. अनेक कुटुंबाना त्याने धान्य किट देखील वाटप केल्या. सागरचे वडील दयानंद अहिवळे त्याला वेळोवेळी महत्वाचे मार्गदर्शन करतात. तर भाऊ भाऊ विशाल अहिवळे, वहिनी शिल्पा अहिवळे हे देखील त्याला व्यवसायात मोठी मदत करतात.