आयुष्यात डेअरिंग केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीत यश मिळत नाही. हे सिद्ध केलं आहे एका पाचवी नापास मुलाने. वडिलांचं अचानक अकाली निधन झालं. घरची जबाबदारी त्याच्यावर आली. पुण्यात जाऊन पोट भरण्याचं ठरवलं. भाड्याने एक हातगाडी आणून त्यावर अंडा भुर्जी विकायला सुरुवात केली. ज्यादिवशी गाडी चालू केली तेव्हा त्याच्याकडे भांडे देखील नव्हते. मित्रांनी अगदी कढई पासून उलथण्यापर्यंत मदत त्याला केली. त्याने हळूहळू यामध्ये प्रगती करत आज पुण्यामध्ये १२ आउटलेट सुरु केले आहेत. जाणून घेऊया त्याच्या या प्रवासाबद्दल..
या तरुणाचे नाव आहे भगवान गिरी. भगवानच्या कुटुंबात आई वडील बहीण भाऊ. शेतकरी कुटुंब. सर्व काही सुरळीत चालू होतं. पण एकदिवस अचानक एका घटनेने त्याच्या आयुष्यात संकट आलं. वडिलांचं अकाली निधन झालं. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तेव्हा भगवानचं वय देखील कमी होतं. कोणी लक्ष देणार नव्हतं. त्यामुळे कुटुंब एकटं पडलं. आईला चौघांचं पोट भरणं जमत नव्हतं. शिकण्यासाठी पैसे देखील नव्हते. पायात चप्पल नसायची. मिळेल ते काम केले.
तशी आधी परिस्थिती ठीकठाक होती. पण वडिलांच्या दवाखान्यासाठी खूप खर्च झाला. त्यामुळे ते कर्जबाजारी देखील झाले. भगवानचं परिस्थितीमुळे पाचवीपर्यंतच शिक्षण झालं. मोठ्या बहिणीच्या लग्नाची चिंता होती. भगवानने गावातल्याच एका व्यक्तीच्या ट्रॅव्हल्सवर ५-६ महिने काम केलं. तिथं फक्त ३ टाइम जेवणाचा प्रश्न मिटायचा म्हणून तो काम करायचा. एकदा त्या ट्रॅव्हल्सच्या मालकाचा मित्र पुण्याहून गावाला आला होता. त्याने भगवानला बघितलं आणि विचारणा केली. त्यानंतर त्याच्या मालकाला विचारलं कि मी याला पुण्याला घेऊन जाऊ का. याचा चांगला सांभाळ करेल. मालक तयार झाला. भगवानला देखील वाटलं तिथं कपडे जेवण चांगलं मिळेल आणि पायात चप्पल मिळेल.
गावाकडे वडील गेल्यामुळे सर्वच बाबतीत हाल होते. भगवान पुण्यात आला आणि बरीच वर्ष त्या मालकाच्या मित्राच्या दुकानावर काम केलं. तिथं त्याला खूप काही शिकायला मिळालं. तो व्यवहार शिकला. त्या मालकाकडे असताना त्याने भाजी विकली. त्यांचं दिवाळीला दुकान असायचं ते सांभाळलं. पुढे आयुष्यात काय करायचं याचे त्याला प्रश्न पडायला लागले होते. तो ७ पर्यंत दुकानात काम करायचा. नंतर रिकामाच असायचा. त्यामुळे त्याने नंतर एक कणसाची गाडी चालू केली. कणसं भाजून तो विकायला लागला.
२-३ महिने त्याने कणसाची गाडी लावली ज्यातून ५-६ हजार रुपये कमावले. त्याला स्वतःवर यातून विश्वास बसला होता कि आपण काही करू शकतो. मित्रांच्या सोबत तो रोज संध्याकाळी बसायचा. तेव्हा गप्पातून विषय निघाला कि आपण अंडा भुर्जीची गाडी सुरु करूया. तेव्हा भगवानला अंड्याचा वास देखील सहन होत नसे. तो गोसावी समाजातील असल्याने त्यांच्यात हा व्यवसाय केला जात नसे. मित्राकडून तो अंडा भुर्जी कशी बनवायची तो शिकला.
त्याने एक हातगाडी भाड्याने घेऊन सुरुवात केली. ४० रुपये रोजने गाडी आणली होती. गाडी कुठं लावावी हा देखील प्रश्न होता. ज्या मालकाने पुण्यात आणलं होतं त्यांना तर तो म्हणू शकत नव्हता. मित्रांनी शेगडी भांड्यापासून सर्व मदत केली. एका शेजारी राहणाऱ्याकडून तो भुर्जी करायचं शिकला. शिवाय कांदा देखील मित्राने कापून दिला. पहिल्या दिवशी त्याचा ७० रुपयाचा व्यवसाय झाला. यातून त्याला कळलं कि आपण यात चांगलं काम करू शकतो.
भगवानने अंडा भुर्जीच्या आपल्या गाड्यावर सुरुवातीला ३ पदार्थ ठेवले होते. हळू हळू त्याने त्यामध्ये विविध पदार्थ स्वतः तयार केले. स्वतःची एक वेगळी चव त्याने तयार केली. लोकांचा प्रतिसाद वाढला. त्याच्या हाताची चव लोकांना खूप आवडायला लागली. त्याने चांगली कमाई करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने आपला ब्रँड बनवायचं ठरवलं. यासाठी त्याने स्वतःच्या चवीला मसाल्याच्या स्वरूपात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्याचे मसाल्याचं पाऊच बनवताना खूप नुकसान देखील झालं. कारण त्याला टेस्टिंग करून बघावं लागलं.
अखेर त्याला त्यात यश आलं. यामुळे तो आता फ्रॅन्चायजी देऊ शकणार होता. तो नसताना त्याची चव आता कोणीही बनवू शकणार होतं. त्याने अंड्याचे ४०-५० पदार्थ तयार केले होते. त्याने आपल्या मसाल्याचं सर्व लीगल नोंदणी करून घेतली. सर्व लागणारे लायसन्स काढले. त्याने एक फूड ट्रक बनवला. ब्रॅण्डिंग केली. स्वतःचे प्रोडक्ट तयार केले. पाचवी पर्यंत या मुलाने आज पुण्यात १२ आउटलेट उभे केले आहेत.
एकेकाळी खायची परिस्थिती नसणाऱ्या कुटुंबातील भगवानने अशिक्षित असताना आज लाखोंचा व्यवसाय पुण्यात उभा केला आहे तो फक्त आपल्या डेअरिंगच्या बळावर. कुठलंही काम मेहनतीने मन लावून केलं तर यश मिळतच हे भगवानने दाखवून दिल आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.