मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हे पद नेमकं कोणाकडे येणार असा प्रश्न होता. या पदावर आता शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे आंबेगावचे दिलीप वळसे पाटील यांची निवड झाली आहे. दिलीप वळसे हे एकेकाळी शरद पवारांचे पीए होते. तेच दिलीपराव आज राज्याचे गृहमंत्री झाले आहेत. त्यांचा एका खेडेगावातून सुरु झालेला प्रवास हा खूप खडतर आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात निरगुडसर या गावात ३० ऑक्टोबर १९५६ रोजी दत्तात्रय गोविंदराव वळसे-पाटलांना मुलगा झाला. हा मुलगा म्हणजे दिलीप वळसे पाटील. त्यावेळी तरुण असलेले आणि देशाच्या राजकारणात दबदबा तयार केलेले शरद पवार दत्तात्रय यांचे मित्र होते. दत्तात्रय हे आंबेगावचे काँग्रेसचे आमदार देखील होते. दिलीप याना देखील वडिलांकडून समाजसेवेचा आणि राजकारणाचा वारसा मिळाला. ते विद्यार्थी असतानाच चळवळीशी जोडले गेले.
दिलीप वळसे पाटलांनी १२ वी नंतर बीए चं शिक्षण घेतलं. बीए झाल्यानंतर दिलीपरावांना पुढे शिक्षण घ्यायचं होतं पण वडिलांनी नोकरीचा हट्ट धरला. ते थेट शरद पवारांना भेटायला घेऊन गेले. पवारांनी दिलीपची विचारपूस केल्यावर ते हुशार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पवारांनी थेट फोन घुमवले आणि नोकरी मिळवून दिली. राज्य सहकारी बँकेत दिलीपला नोकरी मिळाली होती. पण हि नोकरी काही त्यांनी जॉईन केली नाही. वडिलांच्या आग्रहाखातर ते फक्त पवारांकडे आले होते. पण नोकरीत त्यांना रस नव्हता.
दिलीपरावांनी पुढे वकिलीचे शिक्षण घेतले. त्यातच मास्टर मिळवली. हळू हळू वडिलांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाकडे वळले. पुढे शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि पुलोदचं सरकार राज्यात आलं. शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. पण हे सरकार थोड्याच दिवसात रद्द झालं. नंतर पुन्हा काँग्रेसची सत्ता आली. ए.आर.अंतुले राज्याचे मुख्यमंत्री बनले तर शरद पवार हे विरोधी पक्षनेते बनले. तेव्हा शरद पवारांना पीए ची आवश्यकता होती. त्यांनी दिलीपरावांना विचारणा केली आणि ते तयारही झाले.
१९८१ पासून आठ वर्ष ते पवारांचे पीए होते. त्याच दरम्यान त्यांनी राजकारणाचे धडे देखील घेतले होते. आंबेगाव तालुक्यात त्यांची ओळख निर्माण होऊ लागली. पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर वळसे पाटील देखील राजकारणात आले. १९९० मध्ये त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि निवडूनही आले. तेव्हापासून ते सलग ७ वेळा आंबेगाव मधून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
१९९९ मध्ये त्यांनी शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात ते मंत्री होते. त्यावेळी त्यांच्याकडे उर्जा आणि वैद्यकीय शिक्षण खातं होतं. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष म्हणूनही सेवा दिली आहे.
त्यांनी १९९९ ते २००९ या काळात अर्थ आणि योजना खातं, उर्जा मंत्रालय, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ऊर्जा क्षेत्रात राज्याला योग्य दिशा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन करून सूत्रधारी कंपनी, महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या चार कंपन्यांची स्थापना त्यांच्याच कार्यकाळात झाली होती.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गृहमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीप वळसे-पाटील यांचेच नाव सूचवले होते. पण, प्रकृतीच्या कारणास्तव दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला होता. सध्या त्यांच्याकडे उत्पादन शुल्क आणि कामगार खातं होतं. आता त्यांच्याकडे पुन्हा एकदा हे पद आलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलं आहे.