मनात एखादी गोष्ट आली तर ती पूर्ण करण्याची जिद्द असेल तर तुमची परिस्थिती तुम्हाला आडवी येत नाही. मग कितीही संकटं समोर आले तर त्यावर मार्ग निघतो. असंच काहीसं करून दाखवलं आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असलेल्या पांगरी येथील डेंगळे दाम्पत्याने. डेंगळे दाम्पत्याने ज्याप्रकारे आपला व्यवसाय उभारला आहे ते सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. जाणून घेऊया या दाम्पत्याचा प्रवास..
बार्शी पासून २० किमी असलेल्या पांगरी येथील अमोल डेंगळे व पत्नी सरिता डेंगळे हे दाम्पत्य त्यांच्या एक एकर जमिनीवर कसातरी आपला उदरनिर्वाह करत असे. पण त्यातही अनेक संकटं होती. कधीकधी तर उपाशी झोपावं लागायचं. पण या दाम्पत्याने हार न मानता असं काही करून दाखवलं आहे जे सहजासहजी होऊ शकत नाही.
मोठा संघर्ष करून संकटाना तोंड देत चिकाटी व जिद्दीच्या जोरावर डेंगळे दाम्पत्याने आज खवानिर्मिती मध्ये मोठं नाव कमावलं आहे. ते आज या व्यवसायातून लाखो रुपये कमावत आहेत. एकेकाळी खायचे हाल असलेले हे कुटुंब आज रोज ५०० लिटर दूध संकलन करून १०० किलो खवा रोज बनवते. त्यांच्या क्वालिटीमुळे त्यांच्या खव्याला फक्त राज्यातच नाही तर दुसऱ्या राज्यांमध्ये देखील मागणी आहे.
पांगरी गाव एक मोठी बाजारपेठ असलेलं गाव. या गावातील बहुतांश शेतकरी द्राक्ष, कांदा, भाजीपाला, तूर, सोयाबीन ही पिके होतात. दुग्ध व्यवसायही या भागात बऱ्यापैकी आधीच होता. आजूबाजूची ५-१० खेडे पांगरीशी जोडलेली आहेत. त्यामुळे बाजारपेठ मोठी आहे. एक एकर जमीन असलेले अमोल डेंगळे हे आई पत्नी आणि ५ मुलींसह शेतातच वास्तवास आहेत. वडील लहान असतानाच गेल्याने अमोलवर लवकरच जबाबदारीचं ओझं आलं.
आईने कसबसं अमोलला शिकवलं. १९९६ मध्ये बारावी झाल्यावर अमोलवर घरची जबाबदारी आली. एका एकरात घर चालवणं कठीण काम होतं. त्याने शाळा सोडून ड्रायविंग करायला सुरुवात केली. याच ड्रायव्हिंगमुळे त्याच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आला. एकदा मालवाहतुकीच्या निमित्ताने अमोल राजस्थानलमध्ये बिकानेरला गेला होता. तिथं त्याने दुष्काळी भागात संपूर्ण यांत्रिकी पद्धतीने चालणारा एक यशस्वी खवानिर्मिती उद्योग पाहिला. त्याचवेळी त्याला आपल्याकडे असा उद्योग चालू करण्याची आयडिया आली.
२००५ मध्ये अमोलने ड्रायव्हिंग सोडून देऊन थेट व्यवसायात उडी घेतली. आर्थिक अडचणी होत्या. पण त्याने सुरुवातीला १० गायी घेऊन चुलीवरच्या भट्टीवर खवा बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला ३ किलो खवा बनवला. काहीही माहिती नसताना सुरुवात केली होती. पण पुढे अनुभवातून पती पत्नी शिकत गेले आणि त्यांनी २०१८ मध्ये ‘स्टीम बॉयलर’ यंत्र खरेदी केले. प्रत्येकी ४० लिटर दूध साठवण्याची क्षमता असणाऱ्या सहा कढया त्यांनी खरेदी केल्या. त्यातून रोजच्या धुरातून सुटका झाली आणि वेळेतही बचत होऊ लागली. जिल्हा उद्योग केंद्र आणि बँक ऑफ इंडियाकडून त्यांना मोठं अर्थसाह्य झालं.
या व्यवसायात त्यांनी थोडं थोडं करून मोठी कमाई केली. सोबतच व्यवसाय देखील वाढवला. त्यांनी बॉयलर, कढया व अन्य साहित्य मिळून सुमारे २२ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. शेतातच उत्पादन युनिट असल्याने जागेचा खर्च देखील वाचला आहे. ते आज ५०० लिटरपर्यंत दूध संकलन करतात. यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना देखील त्यांनी रोजगार दिला आहे. खव्यापाठोपाठ त्यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार मलई पेढा, बासुंदी आणि तूप उत्पादनही सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी कल्पतरू ब्रॅण्ड तयार केला आहे.