सातारा जिल्ह्यातील एका खेडेगावातील व्यक्ती पुण्यात येऊन रिक्षा चालवू लागला. रिक्षा चालवताना छोटेखानी बांधकाम कंत्राटं घ्यायला लागला. पुढे तो एवढा मोठा बिल्डर बनला कि त्याच्या हॉटेलच्या उदघाटनाला केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री व अनेक दिग्गज नेते यायला लागले. अडचणीत त्याचे हेलिकॉप्टर शरद पवारांच्या कामी आले, त्याच्या फार्महाउस वर बाळासाहेब ठाकरे राहू लागले. पुण्यात शूटिंगला आल्यावर हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली आणि अभिनेता ब्रॅड पिट हे त्याच्या बंगल्यावर राहायला लागले.
हे सर्व वाचून थोडा धक्का बसेल. पण हे आपल्या आयुष्यात साध्य केलं आहे अविनाश भोसले पाटील या पुण्यातील उद्योजकाने. अविनाश भोसले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील तांबवे गावचा. पण अविनाश वडिलांच्या नोकरीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरला स्थायिक झाले. वडील हे जलसंपदा विभागात अभियंता होते.
अविनाश भोसले हे पुण्यात आले. अविनाश हे रोजगाराच्या शोधात पुण्यात आल्यावर सुरुवातीला त्यांनी रिक्षाचालक म्हणून कामाला सुरुवात केली. याच माध्यमातून अविनाश यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्या लोकांशी झाली. त्यानंतर ते रिक्षा भाड्याने चालवण्यासाठी देऊ लागले.
त्यांच्या या ओळखीमुळे ते सुरुवातीला रस्त्यांचे छोटेमोठे काम घ्यायला लागले. पण त्यांचं नशीब खरं बदललं १९९५ मध्ये. ज्यावेळी महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं. युती सरकारनेच भोसलेंना लिफ्ट दिली. १९९५ पूर्वी सर्व जलसंपदाची कामे आंध्र प्रदेशचे कंत्राटदार करत असत. पण भोसले यांच्या रूपाने एक मराठी माणूस या क्षेत्रामध्ये समोर आला. त्याकाळी पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळ हटवण्यासाठी स्थापन केलेल्या कृष्णा खोरे विकास महामंडळाची बहुतांश कामे मिळाली.
त्याच वेळापासून भोसलेंनी आपले सर्व कौशल्य वापरले आणि त्यांची गाडी सुसाट निघाली. त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी कालवे, धरणं बांधली.काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आल्यावर तर त्यांना अधिक फायदा झाला. या सरकारचं मुख्यालय पुणे असल्यानं ते अविनाश भोसले यांच्यासाठी अनेक अर्थांनी सोयीचं ठरलं. त्यांनी १९९९ मध्ये देशभरात काम सुरु केले. त्यांनी जलसंपदा सोबत इतरही क्षेत्रात उडी घेतली.
अविनाश भोसले यांचा राजकीय पुढाऱ्यांसोबत वावर चांगला होता. नेत्यांसोबतच त्यांचे बड्या IAS अधिकाऱ्यांसोबतही चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. राजकारण्यांना जे जे हवं ते ते पुरवणारा पहिला मराठी कंत्राटदार अशी त्यांची ओळख बनली. अगदी मंत्रालयात अनेक अधिकाऱ्यांना ते स्वतः कॉफी देखील घेऊन जात.
अविनाश भोसले यांनी 1979मध्ये ABILग्रुपची (अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्टचर लिमिटेड) स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी बांधकाम क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. अविनाश भोसले यांच्या पुण्यातील हॉटेलच्या उदघाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, पतंगराव कदम आणि त्यावेळेचे देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित होते.
याशिवाय बाळासाहेब ठाकरे हे महाबळेश्वरला गेल्यानंतर ते अविनाश भोसले यांच्या बंगल्यामध्ये मुक्कामी राहत. बाळासाहेब ठाकरे पुण्यात आल्यानंतर अनेकदा त्यांच्या गाडीचं स्वारथ्य अविनाश भोसले यांनीच केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आषाढी वारीची फोटोग्राफी करताना ज्या हेलिकॉप्टरचा उपयोग केला ते हेलिकॉप्टर अविनाश भोसले यांच्या मालकीचं होतं.
अविनाश भोसले यांचं बाणेरमध्ये घर आहे. त्याला व्हाईट हाऊस असं नाव देण्यात आलं आहे. पांढऱ्या रंगाच्या या बंगल्याचा लूक अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सारखा आहे. इथंच भोसले यांची तिन्ही हेलिकॉप्टर्स असतात. २०१३ मध्ये शरद पवार सांगली दौऱ्यावर असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली होती. त्यावेळी भोसले यांच्या हेलिकॉप्टरने त्यांना पुण्यात आणलं गेलं होतं. हे हेलिकॉप्टर बाणेर इथल्या घरावर लँड झालं होतं.
अविनाश भोसले यांच्या मुलीचं लग्न काँग्रेस नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री विश्वजीत कदम यांच्याशी झालं आहे. अविनाश भोसले हे त्यांच्या हेलिकॉप्टर मुळे नेहमी चर्चेत असतात. सर्वच राजकीय नेते त्यांचं हेलिकॉप्टर वापरतात असं म्हंटलं जातं. अगदी राष्ट्रीय राजकारणातील देखील. अनेकदा अविनाश भोसले वादात देखील अडकले आहेत. नुकतंच त्यांची एका व्यवहारामुळे ईडीने देखील चौकशी केली आहे.