Sunday , May 28 2023
Breaking News
Home / ट्रेंडिंग / कधीच कुठल्या विवादात नसणारा हा व्यक्ती आपल्या कामाने सर्वाना अक्षरशः वेड लावतोय!

कधीच कुठल्या विवादात नसणारा हा व्यक्ती आपल्या कामाने सर्वाना अक्षरशः वेड लावतोय!

देशात राजकारण म्हंटलं कि विरोध आलाच. पण काही नेते असे असतात ज्यांना विरोधक देखील टोकाचा विरोध करत नाहीत. स्वतःच्या पक्षातील असो किंवा मग विरोधी पक्षातील सर्वच कार्यकर्ते त्यांच्या कामाचे कौतुकच करत असतात. त्यांना होणारा विरोध हा नगण्य असतो. हे नेते देखील ना कधी वादात अडकतात ना कधी कुणावर टोकाची टीका करतात. असेच एक मोठे नेते देशाला लाभले. ते म्हणजे नितीन जयराम गडकरी. नागपूरच्या एका सामान्य घरातून सुरु झालेला त्यांचा प्रवास आज देशाच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारापर्यंत पोहचला आहे.

सध्या राष्ट्रीय राजकारणात त्यांच्यारूपाने एक मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो अशी सर्वसामान्यांना आशा आहे. अगदी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवार यांच्यापर्यंत पंतप्रधान पदासाठी चर्चा झाली. पण मराठी माणूस काही आजपर्यंत पंतप्रधान झाला नाही. आता नितीन गडकरी यांच्यारूपाने ते मराठी माणसाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते अशी महाराष्ट्रातील जनता अपेक्षा ठेवू शकते.

मराठी माणूस म्हणून गडकरी पंतप्रधान व्हावेत ही एक अशीच इच्छा नसून त्यामागे त्यांचे कर्तृत्व देखील आहे. एक उद्योजक असलेले नितीन गडकरी हे अत्यंत संयमी आणि अर्थखात्याचा असो किंवा इतर महत्वाच्या खात्याचा मोठा अभ्यास असणारे नेते आहेत. अभ्यास, कार्य, वक्तृत्व, सर्वसमावेशक नेतृत्व, विकासाभिमुख राजकारण या गोष्टींच्या बळावर त्यांना हे पद एकदा मिळायलाच हवं. बघूया त्यांच्या नागपूरच्या वाड्यामधून सुरु झालेला प्रवास.

२७ मे १९५७ रोजी नागपूरच्या महाल भागातल्या वाड्यात नितीन गडकरींचा जन्म झाला. या महालाशी नितीनजींचे आजही भावनिक ऋणानुबंध आहेत. नागपूरमध्ये महालचे २ भाग आहेत. पुलाच्या अलीकडे आणि पुलाच्या पलीकडे. पुलाच्या पलीकडे शासकीय कार्यालये, सुशिक्षित लोक वगैरे राहतात. पुलाच्या अलीकडे हा सामान्यांचा भाग. म्हणजे एकप्रकारे जुनं नागपूर. नागपूरचे राजे भोसले यांच्या वाड्याचा बाजूला नितीन गडकरींच्या आजोबांचा गडकरी वाडा. गर्दी आणि अतिक्रमण असलेल्या त्या वाड्याच्या भागात नितीनजींना आजही राहायला आवडतं. मातीचा असलेला हा वाडा सध्या पाडला आहे.

नितीन गडकरी हे आईच्या संस्कारात घडले. त्यांना वडिलांचा सहवास थोडा कमी लाभला. नितीनजींना २ मोठ्या बहिणी आहेत. बहिणी देखील खूप मोठ्या असल्याने धाक ठेवायच्या. बहिणी १२ आणि १४ वर्षांनी मोठ्या होत्या. त्यांनी अगदी मुलासारखं त्यांना वागवलं. नितीन यांच्या आई या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यामुळे त्यांचे गुण त्यांच्यात आले. गडकरी हे नाव मोठं असलं तरी ते जन्मले त्यावेळी त्यांची परिस्थिती थोडी खालावली होती. आईने दिलेले संस्कार आज त्यांची पुंजी आहेत.

आईच्या संस्कारांमुळेच नितीन गडकरींची आज केंद्रीय मंत्री असताना देखील आपल्या सोबत असलेल्या सेक्युरिटी पासून पीएस असलेल्या लोकांना देखील सोबत एका टेबलवर घेऊन जेवतात. आपल्या कर्मचाऱ्यांना ते कुटुंबियांसारखे वागवतात. नितीन गडकरी ६-७ वर्षाचे असताना त्यांच्या आईने मॅट्रिकची परीक्षा दिली होती. त्या जनसंघाचं काम सक्रियपणे करायच्या.

नितीन गडकरी लहानपणीपासून संघाशी जोडले गेले. पण त्यावेळी लोक संघाचा तिरस्कार करायचे, हेटाळणी करायचे. अनेकदा अपमान सहन केला. पण पुढे नितीन यांचं काम वाढत गेलं. हेच त्यांचा अपमान करणारे मंडळी त्यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये आली. त्यांनी सुरुवातीला नगरसेवक असलेल्या राजांना पाडलं. मुस्लिम बहुल असलेला आणि घराघरातून जिथं त्यांना विरोध व्हायचा अशा भागात पुढे भाजपशिवाय दुसरं कोणी निवडून आलं नाही. आजही भाजपचे कृष्णा हेगडे आमदार आहेत.

नितीन गडकरींनी लॉ च शिक्षण घेतलं. त्यावेळी त्यांची विद्यार्थी नेते म्हणून राजकारणाची सुरुवात झाली होती. त्यावेळी त्यांचा एका हॉटेलमध्ये अड्डा होता. म्हणजे तिथे सर्व मित्रमंडळ एकत्र जमायचं. गडकरी यांच्यासह पाच पन्नास मित्र तिथे जमायचे. पण या सर्वांमुळे ते हॉटेलच डुबलं. चारण्याचा अर्धा कप चहा पिणारे हे पोरं तिथं बसायचे. त्यामुळे दुसरं कोणी यायचंच नाही. त्या हॉटेलवाल्याला त्यांनी उधार फर्निचर आणून दुकान टाकून दिलं.

नितीन यांच्या बहिणींना वाटायचं त्यांनी नोकरी करावी. तर आईला वाटायचं नोकरी नाही तर कमीत कमी वकिलीची पाटी तरी लाव. त्यावेळी त्यांच्या ब्राम्हण समाजात उद्योग धंद्याला जास्त महत्व दिलं जायचं नाही. नितीनजींना आई आणि बहिणीने लग्नासाठी हट्ट धरला होता. पण आईची तब्येत पण चांगली नव्हती. त्यानंतर त्यांनी कांचन यांच्याशी लग्न केलं. कांचन यांचे वडील एमबीबीएस डॉक्टर होते. नितीन गडकरी यांच्या पत्नी असून त्या कधी राजकारणात पुढे आल्या नाही किंवा कुठेच त्यांनी किंवा मुलांनी नितीन गडकरी यांच्या वजनाचा वापर आजपर्यंत केला नाही.

नितीन गडकरी हे एक चांगले उद्योजक देखील आहेत. त्यांचे आज ३ साखर कारखाने आहेत. ४ पॉवर प्रोजेक्ट आहेत. तर ३ डिस्टलरी असून चौथीचं काम सुरु आहे. नितीन यांचे मुलं सर्व सांभाळतात. त्यांच्यावर ८-९०० कोटींचं कर्ज देखील आहे पण ते खूप चांगल्या पद्धतीने सर्व उद्योग चालवतात. अगदी विदेशातही आज काम सुरु आहे. दुबईत ऑफिस आहे. रशियात फॅक्टरीचं काम सुरु आहे. मुलांनी आज खूप मोठं काम उभं केलं आहे.

एलएलबी एमकॉम झालेल्या नितीन यांनी नागपूरच्या गल्लीतून सुरु केलेला प्रवास भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, विधान परिषदेचे सदस्य, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, विरोधी पक्ष नेता असा होत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री पदापर्यंत पोहचला आहे. एवढ्या मोठ्या राजकीय कारकिर्दीत नितीन गडकरी नेहमीच वादापासून दूर राहिले.

About Mamun

Check Also

मोठ्या नेत्यांसोबत पंगा घेणारी महिला IPS अधिकारी, २० वर्षात ४० वेळा झाली बदली..

UPSC परिक्षेत पास होऊन IAS IPS होण्याचं अनेकजण स्वप्न बघतात. यामध्ये काहीजण असतात जे चांगली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *