एक सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा ते केंद्रीय मंत्री असा प्रवास करणारे गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा यशस्वीपणे चालवत आहेत त्यांच्या मोठ्या कन्या पंकजा मुंडे-पालवे. पंकजांनी अत्यंत कमी दिवसात राजकारणात लोकप्रियता मिळवली. पंकजा मुंडे – पालवे या महाराष्ट्रातील राजकारणात गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपाचा नवा चेहरा म्हणून समोर आल्या होत्या. त्यांचे नाव अगदी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देखील पोहचले होते.
पंकजा यांचा जन्म २६ जुलै १९७९ ला परळीत झाला. त्यांना यशश्री आणि प्रीतम या २ बहिणी आहेत. वडील मुंडेंचा राजकीय वारसा घेऊनच त्या राजकारणात सक्रिय झाल्या. पंकजा मुंडे यांची राजकीय कारकीर्द तेव्हाच सुरु झाली होती जेव्हा त्यांना भाजपा युवा मोर्चेचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. २००९ मध्ये त्या पहिल्यांदा आमदार म्हणून परळीतून निवडून आल्या.
पंकजा याना राजकारणात सुरुवातीला इंटरेस्ट नव्हता. पण त्यांची बोलण्याची शैली आणि लिखाणाची आवड बघून गोपीनाथरावांनीच राजकारणात यायला सुचवले होते. पंकजा यांनी सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन करून पुढे एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी एक पुण्यात आयटी कंपनी देखील सुरु केली होती.
२००९ मध्ये मुंडे खासदार झाल्याने परळीची विधानसभेची जागा रिक्त झाली. निवडणूक जाहीर झाल्यावर एक दिवस आधी मुंडेंनी पंकजाला उद्या तुझा अर्ज दाखल करायचा असे सांगितले होते. पंकजा या वडिलांच्या सर्व निर्णयात कधीच नाही होय करत नसत. अगदी त्यांच्या लग्नाचा निर्णय देखील गोपीनाथरावांनी परस्पर घेतला होता.
एके दिवशी गोपीनाथराव पंकजाकडे लग्न जमल्याची बातमी घेऊन आले. डॉ. अमित पालवे गोपीनाथरावांना पसंत पडले होते. पण पंकजांनी मात्र त्यांना साधं बघितलं देखील नव्हतं. पण वडिलांना नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. लहानपणीपासून त्यांच्यावर विश्वास टाकून जगण्याची त्यांना सवय होती. अगदी लग्नाची तयारी सुरु झाली, पत्रिका छापल्या गेल्या. त्यानंतर गोपीनाथरावांनी पंकजाला पहिल्यांदा अमित पालवे यांच्याशी भेटवलं.
अमित पालवे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. तसेच ते उद्योजकही आहेत. पंकजा आणि अमित यांना आज आर्यमन नावाचा एक मुलगाही आहे. पुण्यात त्यांची सॉफ्टवेअर कंपनीही आहे. अमित पालवे यांच्या पत्नी पंकजा या कॅबिनेट मंत्री होत्या तरी अमित हे मात्र कधी कुठे कशात पडायचे नाहीत.
ते राजकारणापासून नेहमीच दूर राहिले आहेत. २०१४ आणि २०१९ ला मात्र पंकजांचा प्रचार त्यांनी मैदानात उतरून केला होता. अमित पालवे यांचे एक रहस्य आहे. ते म्हणजे राजकीय वर्तुळात अमित पालवे तर उद्योग व्यवहारात चारुदत्त पालवे या नावाचा वापर ते करतात.
पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे हे रॅडिको डिस्टिलरी कंपनीचे संचालक देखील आहेत. औरंगाबादनजीकच्या शेंद्रा एमआयडीसीत त्यांची हि कंपनी आहे. पंकजा मुंडे या देखील या कंपनीच्या संचालक होत्या. पण त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. अमित यांचे इतरही अनेक उद्योग असून ते प्रसिद्धीपासून मात्र नेहमी दूर राहतात.