कोणतंच काम छोटं किंवा मोठं नसतं हे आपण अनेकदा ऐकलं असेल. अनेकदा मोठे व्यक्ती सांगत असतात कि कोणत्याच कामाची माणसाला लाज असू नये. कोणत्याच कामाला कधी नाही म्हणू नये. दूध विकण्यापासून ते मजुरी करण्यापर्यंत सर्व कामांची कदर करा. घरातल्या जेष्ठांच्या तोंडी हे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात. आज आपण एका अशा व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत ज्याने जेष्टांच्या या सल्ल्याप्रमाणे आपले आयुष्य जगून ते आज यशस्वी केले आहे. फक्त यशच नाही तर यशाच्या शिखरावर हा व्यक्ती पोहचला आहे.
या व्यक्तीचं नाव आहे चंद्रशेखर घोष. एकेकाळी पैशाची तंगीमुळे परेशान असलेला हा व्यक्ती आज अरबो चा व्यापार करणाऱ्या बँकेचा मालक आहे. त्याचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. कधी काळी मिठाई विकून तर कधी दूध विकून आपला कुटुंबाचा गाडा हाकणारा हा व्यक्ती कसा बनला ५० हजार कोटीच्या बँकेचा मालक जाणून घेऊया थोडक्यात..
चंद्रशेखर यांचा जन्म त्रिपुरा राज्यातील अगरताला मध्ये झाला. त्यांचे वडील एक छोटी मिठाईची दुकान चालवायचे. कुटुंबाची आर्थिक स्थिती काही खूप चांगली नव्हती. ती जेमतेमच होती. मिठाईच्या दुकानातून जी काही कमाई व्हायची ती सर्वच घरखर्चात संपून जायची. त्यावर फक्त घर चालायचं. पण त्यांचे वडील मुलांना शिक्षण देऊ इच्छित होते. त्यामुळे ते स्वतःचे काही महत्वाचे खर्च कमी करून मुलांना शिक्षणासाठी ते खर्च करत असत.
चंद्रशेखर याना कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगल्याप्रकारे माहिती होती. यामुळेच त्यांनी लहानपणीच दूध विकायला सुरुवात केली. ते सकाळीच उठायचे आणि गावात घरोघरी जाऊन दूध वाटून यायचे. त्यानंतर ते शाळेत जायचे. शाळेतून आल्यावर देखील चंद्रशेखर रिकामे बसत नव्हते. ते लहान मुलांच ट्युशन शाळेतून आल्यावर घ्यायचे. त्यानंतर पुन्हा वडिलांच्या मिठाईच्या दुकानात ते काम करायचे. रात्रीच्या वेळी ते स्वतःचा अभ्यास करायचे. चंद्रशेखर यांना चांगलं माहिती होतं की त्यांची गरिबी हि फक्त जिद्द आणि मेहनतीच्या बळावरच कमी होऊ शकते. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
आपले शिक्षण झाल्यावर चंद्रशेखर यांनी बराच काळ ५००० रुपये प्रति महिना पगारावर जॉब केला. ज्यामधून ते आपल्या कुटुंबाच्या खर्चात मदत करायचे. पण त्यामधूनही त्यांच्या कुटुंबाचा खर्च पूर्ण होत नव्हता. १९९० मध्ये त्यांनी काही तरी वेगळं करायचं असं मनात ठरवलं. त्यांनी बांग्लादेशात महिला सशक्तीकरणवर काम करणाऱ्या एका खासगी संस्थेसोबत काम चालू केलं. त्या संस्थेने प्रोग्रॅम हेड म्हणून त्यांना निवडलं. हि संस्था होती विलेज वेल्फेयर सोसाइटी. या संस्थेमुळे त्यांनी खेड्यातील महिलांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी खूप जवळून बघितल्या.
त्यांनी ओळखलं कि गावातील महिला या खूप कमी अर्थसाहाय्यात काम करून जीवन सुधारू शकतात. त्याचवेळी त्यांच्या डोक्यात एक मायक्रोफायनान्स कंपनी सुरु करण्याचा विचार आला. त्यांनी विचार केला कि या महिलांना लोन देऊन त्यांना स्वावलंबी बनवून त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी. त्यांनी हा विचार लोकांसमोर ठेवला. याप्रकारे २००१ मध्ये बंधन बँकेची सुरुवात झाली. असे अनेक लोक असतात जे स्वप्न तर बघतात पण ते पूर्ण कसे करायचे हे त्यांना माहिती नसते. चंद्रशेखर मात्र असे व्यक्ती आहेत ज्यांनी स्वप्न फक्त बघिलतच नाही तर ते मेहनतीने पूर्ण देखील केलं.
आज बंधन बँकेच्या देशभरात जवळपास २००० शाखा कार्यरत आहेत. हि बँक १०० टक्के रिकव्हरी रेट सोबत काम करते. एक NGO म्हणून सुरु झालेली हि बँक आज आंतरराष्ट्रीय फायनान्शिअल संस्थांच्या नजरेत देखील आली आहे. २०१८ मध्ये या बँकेत १३५ कोटींची आंतरराष्ट्रीय गुंतवणूक झाली. बंधन बँकेची आज मार्केट व्हॅल्यू ५० हजार कोटी रुपये आहे. चंद्रशेखर त्यांच्या या यशाचे श्रेय आई वडिलांना देतात. दुसऱ्यासाठी नेहमी चांगले विचार करणे हे त्यांनी आईकडून शिकले. तर दुसर्यांना स्वतःपेक्षा पुढे ठेवण्यात वडिलांनी शिकवलं.