अभिनेते राज कपूर यांचा मुलगा आणि ऋषी कपूर रणधीर कपूर यांचा छोटा भाऊ असलेले जेष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झालं आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. चेंबूरच्या इलॅक्स रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
राजीव यांना मोठे भाऊ रणधीर यांनीच तातडीने रुग्णालयात भरती केले होते. पण उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. रणधीर यांनी स्वतः राजीव यांचं निधन झाल्याचं सांगितलं.
भावाच्या निधनाबद्दल रणधीर म्हणाले की, ‘आज मी माझ्या छोट्या भावाला राजीवला गमावलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे प्राण वाचवू शकले नाही. पुढील सर्व कामांसाठी आता मी इस्पितळातच आहे.’
राजीव कपूर हे विशेषतः ‘राम तेरी गंगा मैली’ (१९८५) आणि ‘एक जान हैं हम’ (१९८३) मधील अभिनयासाठी प्रसिध्द आहेत. ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘प्रेमग्रंथ’ सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. नितू कपूर यांनी राजीव कपूर यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं.
मागच्याच वर्षी अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. त्यांनतर आजचा मंगळवार पुन्हा एकदा कपूर कुटुंबासाठी दुःखाचा डोंगर घेऊन आला. सकाळी सर्व काही सुरळीत होतं. पण नास्ता झाल्यानंतर राजीव यांना थोडं अश्वस्थ जाणवत होतं. त्यानंतर काही कळण्याच्या आतच त्यांना अटॅक आला. रणधीर यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांचे प्राण ते वाचवू शकले नाहीत.