भारतीय संघाने काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यात भारताने ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाचा चौथ्या कसोटीत ३ विकेट्सनी पराभव करत बॉर्डर गावसकर ट्रॉफी २-१ ने जिंकली. या दौऱ्याचे वैशिष्ठ्य म्हणजे अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीत नवोदित खेळाडूंनी केलेले प्रदर्शन. शेवटच्या कसोटीत आपल्या मराठमोळ्या खेळाडूने महत्वाची कामगिरी बजावली होती. पालघरचा राजा अशी ओळख मिळालेल्या शार्दूल ठाकूरने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती.
शार्दूल ठाकूर खरंतर कसोटी मालिकेत बॅकअप खेळाडू म्हणून आला होता. त्याने २०१८ मध्ये कसोटीत पदार्पण केलं होतं पण ते दुर्दैवी ठरलं होतं. १० बॉल टाकून तो जखमी होऊन संघाबाहेर गेला होता. पण २ वर्षांनी मेहनतीचं फळ मिळालं आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत भारताच्या कसोटी विजयाचा तो शिल्पकार ठरला. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत देखील शार्दूल ठाकूरने शेवटच्या निर्णायक सामन्यात ४ विकेट घेत आणि वेगवान ३० धावा करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते.
एका नारळ व्यावसायिकाचा मुलगा ते भारतीय संघाचा संकटमोचक खेळाडू अशी ओळख मिळवलेल्या शार्दूल ठाकूरचा क्रिकेटमधील प्रवास हा मोठा संघर्षमय राहिला आहे. १६ ऑक्टोबर १९९१ ला शार्दूल ठाकूरचा जन्म झाला. वडील नरेंद्र ठाकूर हे पालघरचे एक नारळ व्यावसायिक व आई हंसा ठाकूर या गृहिणी. शार्दूल ठाकूरला बालपणापासून क्रिकेटचं वेड होतं. तो आपल्या शाळेकडून मुंबईत विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला जात असे.
शार्दुलने ८ वर्षाचा असतानाच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. आनंद आश्रम कान्वेंट इंग्लिश शाळेत तो शिकायला होता. एकेदिवशी तो तारापुर विद्या मंदिर शाळेकडून सामना खेळायला गेला होता. २००६ मध्ये स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्कूल विरुद्ध त्याच्या संघाचा सामना होता. स्वामी विवेकानंद शाळेचे कोच दिनेश लाड यांनी त्याला बघितले. या सामन्यात शार्दुलने ७८ धावा बनवल्या आणि ५ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे लाड प्रभावित झाले. शार्दुलला त्यांनी आपल्या आईवडिलांशी बोलणं करून द्यायला लावलं.
दिनेश लाड यांनी शार्दुलच्या वडिलांना त्याला त्यांच्या विवेकानंद शाळेत क्रिकेट खेळण्यासाठी पाठवायला सांगितले. पण शार्दुलचे घर पालघरमध्ये होतं जे बोरिवलीपासून ८६ किमी होतं. त्यामुळे २-४ तास प्रवासात गेले असते. अन त्यावेळी शार्दूल दहावीमध्ये होता. बोर्डाच्या परीक्षा समोर होत्या. कोच दिनेश लाड यांचा प्रस्ताव नरेंद्र ठाकूर यांनी फेटाळला. त्यानंतर दिनेश लाड यांनी आपल्या पत्नीला विचारलं कि मी एका मुलाला आपल्या घरी ठेवू का.
शार्दुलला मुंबईत क्रिकेट खेळण्यासाठी घरी ठेवण्यास लाड यांच्या पत्नीने होकार दिला. त्यांच्या घरी शार्दुलच्या वयाची स्वतःची तरुण मुलगी होती. तरी देखील त्यांनी कुठलाही विचार न करता या अनोळखी मुलाला १ वर्षभर आपल्या घरी ठेवून क्रिकेटचे धडे दिले. शालेय क्रिकेटमध्ये शार्दुलने एका ओव्हरमध्ये ६ छक्के मारून आपलं नाव गाजवलं होतं. त्यानंतर त्याची निवड अंडर १५ मुंबई संघात झाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही.
शार्दूल ठाकूर हा पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील माहिम-केळवे या गावचा आहे. क्रिकेटच्या सरावासाठी शार्दूल ठाकूर दररोज पालघर ते चर्चगेट असा जवळपास अडीच तीन तासांचा प्रवास करत असे. अजूनही तो अधूनमधून लोकलने प्रवास करताना दिसतो. शार्दुलच्या वडिलांचे गावात शेती देखील आहे. त्यांच्या शेतात ते नारळ, केळी आणि पानांचे उत्पादन घेतात. ३-४ घंटे पालघर ते मुंबई प्रवास केल्यामुळे त्याची ओळख देखील पालघर एक्सप्रेस अशी पडली आहे.
घरात तरुण मुलगी असतानाही एका अनोळखी तरुणाला आपल्या घरी ठेवून क्रिकेटचे धडे देणाऱ्या दिनेश लाड आणि त्यांच्या पत्नीचे शार्दुलच्या यशात मोठे योगदान आहे असेच म्हणावे लागेल. शार्दुलने मुंबईकडून रणजी खेळताना मैदान अनेकदा गाजवलं आहे. तो प्रकाशझोतात तेव्हा आला होता जेव्हा त्याने रणजी चषकाच्या फायनलमध्ये मुंबईकडून सौराष्ट्र विरुद्ध ८ विकेट घेतल्या होत्या. मुंबई रणजी चषक जिंकली होती.
२०१५ मध्ये त्याला आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाने २० लाखात खरेदी केलं होतं. त्यानंतर पुढे तो पुणे संघात खेळला आणि आता चेन्नई सुपर किंग्स संघात खेळतोय. त्याने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे मध्ये आणि २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध टी २० मध्ये पदार्पण केलं होतं. २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अंतिम सामन्यात शार्दुलने निर्णायक खेळी केली होती.
शार्दूलने अवघ्या ६ चेंडूत १७ धावा ठोकल्याने, अवघड वाटणारा हा सामना भारताने ४ विकेट्स आणि १ ओव्हर राखून सहज जिंकला होता. सोबत सिरीज देखील २-१ अशी जिंकली. यानंतर कर्णधार कोहलीने “तुला मानला रे ठाकूर” असं ट्विट करत त्याचे कौतुक केलं होतं. त्यानंतर शार्दुलची कामगिरी सुधरतंच गेली.