सध्या कोरोनामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. देशात मागील वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर अनेकांची उपासमार झाली. तर यावर्षीही कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे हळू हळू लॉकडाऊन लागायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात गरीब लोक उपाशी राहू नयेत म्हणून सरकारने शिवभोजन थाळी मोफत केली आहे. या थाळीच्या माध्यमातून रोज लाखो जणांचा जेवणाचा प्रश्न सुटत आहे. हे सरकारने पाऊल उचलले असले तरी नागरिक देखील मदत करण्यात कुठेही कमी नाहीयेत. मागील वर्षी देखील अनेक दानशूरांनी कोरोनाकाळात गरिबांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती.
यावर्षी देखील त्याची प्रचिती येत असून अनेकजण मोठ्या प्रमाणात गोरगरिबांना मदत करत आहेत. सध्या एका महिलेचे फोटो सोशल मीडियावर अनेक ठिकाणी दिसत आहेत. ती महिला कोरोनाकाळात खायला पैसे नसलेल्या गरिबांना चक्क बिर्याणी मोफत वाटत आहे. तामिळनाडूमधील एका बिर्याणीच्या गाड्यावर हे चित्र दिसत आहे. जिथे हि महिला गोरगरिब आणि ज्यांच्याकडे सध्या पैसे नाहीत अशा लोकांना मोफत बिर्याणी वाटत आहे.
तामिळनाडूमधील रेडिओ जॉकी आणि अभिनेता बालाजी याने आपल्या ट्विटर अकाउंटवर या महिलेचे फोटो शेअर करून तिचं कौतुक करून तिला सलाम ठोकला आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे, फुलियाकुलममध्ये असलेल्या या रोडच्या बाजूच्या बिर्याणी शॉपने काय माणुसकी दाखवली आहे. मानसुकीचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे असं त्याने म्हटलंय. या महिलेने आपल्या बिर्याणी शॉपवर एक बोर्ड लावला आहे. या बोर्डवर लिहिलं आहे तुम्ही उपाशी असाल तर इथे प्रेमाचं जेवण तुम्हाला मिळेल. आतापर्यंत या फोटोला २४ हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून १६० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.
या महिलेचं कोईम्बतूरच्या फुलियाकुलम गावामध्ये दुकान आहे. हि महिला २० रुपये प्लेट ने एरव्ही बिर्याणी विकते. पण गरिबांना मात्र ते २० रुपये न घेता ती मोफत जेवण देऊन त्यांचं पोट भरते. या महिलेचं हे दुकान बघून तिला लोक सलाम ठोकत असून माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं सर्व जण तिचे फोटो शेअर करून म्हणत आहेत. समाजामध्ये अशाच लोकांची गरज असून असे दानशूर पुढे आल्यास देशात कोणीही उपाशी झोपणार नाही.
मागे देखील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका फूड स्टॉलची चर्चा झाली होती. दिल्लीमधील या फूड स्टॉलवर हा व्यक्ती १० रुपयात पोटभर जेवण सर्वाना वाटत होता. आपण सर्वच जाणतो कि सध्या महागाई किती वाढली असून १० रुपयात साधा चहा देखील भेटत नाही तिथे हा व्यक्ती १० रुपयात पोटभर जेवण देत होता. किरण वर्मा नावाच्या या व्यक्तीचं बाबरपूर मेट्रो स्टेशनजवळ भोजनालय आहे.