सध्या आयपीएलचा चौदावा सीजन चालू आहे. देशात सध्या कोरोनाने थैमान घातल्यामुळे आयपीएल खेळवावं का नाही असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला. सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये आयपीएल खेळवणे योग्य नसल्याचं काहींचं म्हणणं होतं तर काहींच्या मते आयपीएल सर्व नियम पाळून पार पडत आहे आणि आयपीएलमुळे घरी असलेल्या लोकांना मनोरंजनाचा डोस मिळतो. नुकतंच आयपीएलमधील KKR चा खेळाडू पॅट कमिन्सने ३७ लाखांची मदत PM केअरला दिली होती. कोरोनाविरुद्ध लढ्यात ऑक्सिजन आणि इतर काही साहित्य खरेदी करण्यासाठी त्याने हि मदत घोषित केली होती.
त्याने हि मदत घोषित करताना इतर खेळाडूंना देखील मदत करण्याचे आवाहन केले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली याने देखील ४३ लाखांची मदत जाहीर केली. दरम्यान आता आयपीएल मधील टीम देखील कोरोना संकटात मदतीसाठी पुढे आल्या आहेत. आयपीएल च्या यंदाच्या सिजनमध्ये राजस्थान रॉयल्सने चांगली कामगिरी केलेली नाहीये. पण त्यांनी कोरोना लढ्यात मोठी मदत घोषित करून सर्वांचं हृदय जिंकलं आहे.
राजस्थान रॉयल्सने भारतीयांच्या कोरोना लढ्यात मदत म्हणून तब्बल ७.५ कोटींची मदत दिली आहे. खेळाडू आणि टीमचे मालक, टीम मॅनेजमेंट यांनी मिळून हि रक्कम जमा करून कोरोना लढ्यासाठी दान केली आहे. रॉयल राजस्थान फाउंडेशन आणि ब्रिटिश एशियन ट्रस्ट मिळून फंड जमा करण्याचं काम करत आहे. राजस्थान रॉयल्सने मदतीची घोषणा करताना म्हंटले आहे,’आम्हाला हि घोषणा करताना खूप आनंद होत आहे कि कोविड मुळे प्रभावित भारतीयांना मदत करण्यासाठी आम्ही ७.५ कोटींचं योगदान देऊ शकलो’.
कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून रेकॉर्डब्रेक वाढ होत आहे. तर मृतांचा आकडा देखील खूप वाढला आहे. जगभरातून भारतासाठी मदतीचे हात पुढे येत असून भारतीय देखील जमेल तशी मदत या संकटात करताना दिसत आहेत. राजस्थान रॉयल्स संघ यंदा नवा कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वात आयपीएल खेळत आहे. या टीममधून बेन स्टोक्स आणि जाफ्रा आर्चर सारखे दिग्गज खेळाडू जखमी होऊन बाहेर गेले आहेत. तर काही खेळाडू कोरोनामुळे बाहेर पडले आहेत.
काल कोरोना रुग्णांचा एकदा रेकॉर्डब्रेक वाढला होता. काल दिवसभरात भारतात ३ लाख ७९ हजार २५७ नवीन रुग्ण आढळून आले होते. याशिवाय ३६४६ रुग्णांनी आपले प्राण गमावले होते. राजस्थान रॉयल्सच्या मदतीसोबत दिल्ली कॅपिटल्स संघाने देखील १.५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. दिल्ली कपिटल्सचं आयपीएल मधील प्रदर्शन खूप चांगलं असून त्यांनी कोरोना लढ्यात योगदान पुन्हा एकदा मन जिंकलं आहे.
दिल्ली कपिटल्सने दिलेल्या १.५ कोटी रुपयांमध्ये आरोग्य सुविधा, ऑक्सिजन सिलेंडर आणि कोविड किटची खरेदी केली जाणार आहे. दिल्ली कपिटल्सकडून मदतीविषयी सांगताना म्हंटले आहे, ‘टीम, जेएसडब्ल्यू फाउंडेशन आणि जीएमआर वरालक्ष्मी फाउंडेशन यांनी दिल्लीतील NGO हेमकुंट फाउंडेशन आणि उदय फाऊंडेशनला हि १.५ कोटी रुपयांची मदत दिली आहे. दिल्ली कपिटल्सचे सीईओ विनोद बिस्ट म्हणाले या संकटात टीम दिल्लीतील नागरिकांसोबत आहे. दिल्लीकर या संकटात एकदुसऱ्यांना मदत करत असून आम्हाला मदत करून अभिमान वाटत आहे.