सध्या कोरोनामुळे आपण लॉकडाऊन या नवीन परिस्थितीचा सामना करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना येण्यापूर्वी लॉकडाऊन हा शब्दही आपण कधी ऐकला नसेल. पण कोरोनामुळे देशातच नाही तर जगात लॉकडाऊन लागला. कोरोनाचा सामना करण्यासाठी घराबाहेर मुक्त संचार करण्यावर बंधन आले. लॉकडाऊन हा विषय आपल्यासाठी नवीन असला तरी कोल्हापूर जिल्ह्यात एक असं गाव आहे जिथे दर ३ वर्षांनी लॉकडाऊन होतो. दाजीपूर अभयारण्याच्या बाजूचा भाग आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा हा भाग असून दुर्गम घाटमाथावर हे गाव आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील मानबेट, चौके असे या २ गावांची नावे आहेत. या दोन्ही गावात आश्चर्यकारक वाटणारी गोष्ट घडते. गावातील एक न एक व्यक्ती गाव घर सोडून पळून जातो. गाव एवढं सूनं सूनं होतं कि गावात आपल्याला कुत्र देखील बघायला भेटणार नाही. गावात असणारी सर्व दुकानं घरं हि बंद असतात. यामागे काही कारणं आहेत जी आपण जाणून घेऊया.
या गावातील लोक गाव सोडून पळून जाण्यामागे त्यांची एक पारंपरिक प्रथा आहे. आजच्या आधुनिक आणि तांत्रिक युगात या २ गावांनी आपल्या पूर्वजांनी सुरु केलेली हि प्रथा टिकून ठेवली आहे. गावातील लोक सांगतात कि त्यांचे पूर्वज हे जुन्या काळात दर ३ वर्षांनी गाव सोडून वेशीच्या पलीकडे कुठेही जाऊन राहत असत. यामुळे गावातील रोगराई नष्ट होते. या प्रथेला गावपळण म्हणून ओळखलं जातं. या परंपरेला ऐतिहासिक महत्व आहे. हि गोष्ट थोडी वेगळी जरी वाटत असली तरी गाव मात्र आपल्या रूढी परंपरा काटेकोरपणे पाळते.
गावाला शांतता सुख समाधान हवं असेल तर हि प्रथा आपल्याला पाळावीच लागते. गावपळण मुळे गावात रोगराई येत नाही. सुख समाधान आणि शांतता गावात नांदते. गावातील लोक ३ वर्ष पूर्ण झाली कि चौथ्या वर्षी गावकरी बाहेर पडतात. हे गावकरी कमीत कमी ७ दिवस गावाच्या बाहेर राहतात. मग त्यात काही जण ९ दिवस तर काही जण २१ दिवसही गावाबाहेर राहतात. देवाने जेव्हा कौल दिला तेव्हाच हे गावकरी गावात परत येतात.
गावपळण प्रथा म्हणजे गावातून वेशीच्या बाहेर पळून जाणे. या प्रथेला पाळण्यासाठी हे गावकरी आपलं घरदार सोडून वेशीच्या बाहेर राहायला जातात. गावातील गुरव, पाटील आणि २ गावची माणसं गाव सोडल्यानंतर देवाला कौल लावण्यास जातात. देवाने जेव्हा कौल दिला तेव्हाच गावकरी गावात परत येतात. या गावात जवळपास १५० कुटुंब आज राहतात. या प्रथेचा विशेषतः म्हणजे फक्त माणसंच गाव सोडून जातात असे नाही. तर गावातील कुत्रे मांजरं, जनावरं देखील गावकरी सोबत घेऊन वेशीबाहेर पडतात.
या प्रथेला देवाचा आशिर्वात असल्याचं गावकरी मानतात. कारण गाव सोडून गेल्यावर गावात चोरी नावाला देखील होत नाही. गावातील साधं पाण देखील हालत नसल्याचं गावकरी सांगतात. अभयारण्य बाजूला असल्याने गावकरी वस्तीवर राहायला गेल्यावर तिथं त्यांना इतर जनावरांचा देखील कधी काही त्रास होत नाही. या गावाची रासाई देवी हि ग्रामदैवत आहे. या देवीलाच ग्रामस्थ कौल लावतात.
या गावातील लोक जेव्हा गावाबाहेर पडतात तेव्हा ते ७ दिवस पुरेल एवढं धान्य पैसे घेऊन बाहेर पडतात. सोबत जनावरं देखील असतात. निसर्गाच्या कुशीत हे ग्रामस्थ साधी तात्पुरही घरे तयार करून त्या झोपड्यात रहातात. लाईट नसली तरी हे ग्रामस्थ दिव्याच्या प्रकाशात आपले ते दिवस काढतात. आता चार्जिंगचे लाईट देखील ते वापरायला लागली आहेत. शेजारीच असलेल्या नदीमुळे पाण्याची कसलीही अडचण गाव सोडल्यावर येत नाही.
गाव सोडल्यावर पहिले ३ दिवस कुणीच गावच्या वेशीत प्रवेश करत नाही. चौथ्या दिवशी गावातील मानकरी कौल लावणासाठी मंदिरात येतात. देवीचा कौल अनुकूल आल्यानंतर गावातील वेशीत प्रवेश होतो. कौल लागल्यावर वाजत गाजत हे ग्रामस्थ गावात प्रवेश करतात. गावभरणी असे याला म्हंटले जाते. हि परंपरा शेकडो वर्षांपासून चालू असून आजही ती कुठल्याही अडथळ्याशिवाय चालू आहे. या प्रथेमुळे गावात कुठलीच रोगराई येत नाही. सर्व गाव निरोगी असून सुख समाधानात आयुष्य जगत असल्याचं गावकरी सांगतात.शिवाय गावात कधीच भांडण होत नाहीत. ना कुणाला या परंपरेची खंत वाटते.