सध्या पेट्रोलच्या किमतीत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. पेट्रोलने नुकतीच शंभरी देखील गाठली आहे. या वाढणाऱ्या किमती बघून एखादा नवीन शोध कोणी तरी लावावा आणि गाडी कमी पेट्रोल मध्ये जास्त चालावी असं आपल्याला कधी तरी वाटलंच असेल.
तुमची इच्छा पूर्ण करणारा शोध लावला आहे एका कोल्हापूरच्या मराठी माणसाने. कोल्हापूरच्या या व्यक्तीने असा मॅकेनिकल व्हॉल्व तयार केला आहे ज्यामुळे पेट्रोलची ३० टक्के बचत केली जाऊ शकते. आणि हे संशोधन करणारा व्यक्ती एक कपड्याचा व्यावसायिक आहे. या व्यक्तीचे नाव आहे अरविंद खांडके.
अरविंद यांचा कपड्याचा व्यवसाय असल्याने त्यांना आजूबाजूच्या खेडेगावात गाडीवर फिरावं लागायचं. जास्त फिरणं होत असल्याने त्यांना नेहमीच पेट्रोलची चिंता लागून राहायची. कारण त्यांना खूप जास्त पेट्रोल लागायचं.
पेट्रोलमुळे त्यांचा जास्त खर्च व्हायचा. प्रत्येकालाच कमी पेट्रोलमध्ये जास्त चालणारी गाडी त्यामुळे हवी असते. गाडीने चांगलं एव्हरेज द्यावं असं वाटत असतं. असाच काहीसा विचार अरविंद खांडके यांच्या मनात आला. त्यांनी विचार केला कि पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तर कमी करणं सामान्यांच्या हातात नसतं. पण गाडीच्या इंजिन मध्ये बदल करून तर इंधन वाचवले जाऊ शकते.
अरविंद यांचं फक्त दहावी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यांचा कपड्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या कल्पनेला सतत्येत उतरवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांनी गाडीमध्ये पेट्रोल कमी लागावं यासाठी व्हॉल्व्हवर प्रयोग सुरूच ठेवले.
७१ वर्षीय खांडके यांनी बेटर इंडियाशी बोलताना म्हंटल आहे कि, ‘पेट्रोलवर चालणाऱ्या सर्व जुन्या गाड्यांमध्ये इंजिनला कार्बोरेटर जोडलेले असते. मी एक व्हॉल्व्ह या कार्बोरेटरला बसवला. या व्हॉल्व्हमुळे कार्बोरेटरद्वारे इंजिन चालण्यासाठी पेट्रोल बरोबरच पाणी आणि हवेचा वापर होतो.’
कार्बोरेटर हा गाडीचा महत्वाचा पार्ट आहे हे सर्वानाच माहिती आहे. मोटरसायकल बरोबर इतर छोट्या गाड्यांमध्ये कार्बोरेटरद्वारे पेट्रोल आणि हवा यांचं योग्य मिश्रण झाल्यामुळे इंजिन सुरु होते. या प्रक्रियेत काही बाधा आल्यास गाडी बंद पडते किंवा इंजिनमध्ये बाधा निर्माण होते. यावरून कळत कि कार्बोरेटरची गाडीमध्ये कि महत्वाची भूमिका आहे. हेच ध्यानात ठेवूनच अरविंद यांनी आपलं संशोधन सुरु ठेवलं.
२००५ मध्ये त्यांना नेशनल इनोव्हेशन फाउंडेशनकडून या पर्यावरणपूरक संशोधनासाठी पुरस्कार देखील मिळाला आहे. १९८३ मध्ये त्यांनी हा व्हॉल्व्ह बनवला होता ज्यात काही त्रुटी होत्या. २०१८ मध्ये त्यांनी यात काही बदल करून वॉटर प्रेशर किट बसवली. या नवीन व्हॉल्व्ह मुळे हवा आणि पेट्रोलच्या मिश्रणात पाणी सुद्धा मिसळले जाऊन पेट्रोलची ३०% बचत होत आहे. पाणी गरम होऊन त्याचे रूपांतर वाफेत होऊन ती वाफ शक्तीचा स्रोत /इंधन म्हणून वापरले जाईल आणि त्याने इंजिनची क्षमता वाढण्यास मदत होईल.
जेव्हा त्यांना विचारण्यात आलं कि तुम्ही हा व्हॉल्व्ह विकणार का तर ते म्हणाले “मी एक सामान्य व्यावसायिक आहे आणि हा व्हॉल्व मोठ्या प्रमाणावर तयार करण्यासाठी माझी इतकी मोठी आर्थिक तयारी नाही. मला गाड्यांच्या निर्मितीची आणि त्या तंत्रज्ञानाची आवड आहे तसेच कमी पेट्रोलवर चालणारी गाडी ही माझी गरज होती म्हणून मी हा प्रयोग केला. जर इतर कुणाला हे यंत्र तयार करून वापरायचे असेल, विक्री करायची असेल तर मी आनंदाने त्या व्यक्तीला माझ्याकडे असलेली सगळी माहिती व ज्ञान देण्यास तयार आहे.”
अरविंद खांडके याना तुम्ही [email protected] या मेल आयडीवर संपर्क करू शकता.