भारताने १९८३ चा वर्ल्डकप जिंकला आणि देशात क्रिकेटचे वारे वाहू लागले. क्रिकेट हा खेळ भारतात इतका लोकप्रिय बनला की त्याच्या आवडीपायी खेड्यापाड्यातली लहान मोठी मुलंही तहानभूक विसरुन उन्हातान्हात क्रिकेटचे डाव मांडताना दिसू लागली. आज भारतीय लोकांमध्ये क्रिकेटची इतकी नशा पहायला मिळते की, भारतात क्रिकेटला एक खेळ नाही तर चक्क धर्म मानले जाते. ज्याला त्याला मोठं होऊन क्रिकेटर बनायचंच स्वप्न असतं.
हेच स्वप्न बाळगून उदय कोटक नावाचा एक तरुण क्रिकेटच्या मैदानावर उतरला होता. पण खेळताना डोक्याला बॉल लागला आणि त्याचं क्रिकेट सुटलं. त्यानंतर तो तरुण व्यवसायात उतरला आणि आज ८७००० कोटींचा मालक बनला आहे. पाहूया हा प्रवास..
उदय कोटक यांचा जन्म मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ६० लोकांचे त्यांचे एकत्र कुटुंब होते. ज्यावेळी सचिन तेंडुलकरचा क्रिकेटच्या मैदानावर उदयही झाला नव्हता, त्यावेळी उदय कोटक यांना रमाकांत आचरेकर सरांकडून क्रिकेटचे धडे मिळाले.
१९७९ मधील घटना. त्यावेळी उदय कोटक हे कांगा लीगमध्ये क्रिकेट खेळात होते. या लीगच्या मॅचेस ह्या मान्सूनच्या प्रतिकूल हवामानात खेळल्या जायच्या. उदय कोटक नॉन-स्ट्रायकर एंडला खेळात होते. स्ट्राईकला असणाऱ्या खेळाडूने शॉट मारला आणि सिंगल रनसाठी धावला. फिल्डरने चेंडू अडवून स्ट्रायकर एंडला थ्रो केला. पण चुकून तो चेंडू उदय कोटक यांच्या डोक्यात लागला. जबर दुखापत झाली. त्यामुळे उदय कोटक मरणाच्या दारात होते. परंतु शस्त्रक्रिया झाली आणि उदय कोटक सहीसलामत बरे झाले. त्यानंतर त्यांनी क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा नाद सोडून दिला..
दुखापतीनंतर उदय कोटक यांना बरच काळ विश्रांती घ्यावी लागली. नंतर त्यांनी मुंबईमध्ये एमबीए शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर काही काळ त्यांनी आपल्या कौटुंबिक कॉटन व्यवसायात काम केले. पण तिथे मन रमले नाही म्हणून त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले.
त्यांना हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये चांगली नोकरीही मिळणार होती, पण त्यांचे मन बदलले आणि त्यांनी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला १९८५ मध्ये मित्रमंडळींकडून उसनवारी करुन ३० लाख रुपये जमवले आणि स्वतःची इन्व्हेस्टमेंट कंपनी सुरु केली.
लवकरच त्यांनी महिंद्रा ग्रुपसोबत करार केला. त्यानंतर त्यांच्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा विस्तार झाला. बँकिंग, विमा, म्युच्युअल फंड आणि लोन देण्याची कामे त्यांच्या कंपनीने केली. २००३ साली त्यांना आरबीआयचे लायसन्स मिळले आणि त्यांनी कोटक महिंद्रा बँकांची स्थापना केली. या बँकेने चांगल्या चांगल्या कंपन्यांना कर्जपुरवठा केला.
आपल्या स्मार्ट पॉलिसीच्या बळावर उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेला भारतातील टॉप टेनमध्ये नेऊन ठेवले. उदय कोटक यांची संपत्ती आज ८७००० कोटींची आहे. कदाचित क्रिकेटच्या मैदानावर खेळताना बॉल लागला नसता तर उदय कोटक क्रिकेटर बनले असते, पण तसं झालं नाही…