देशात सध्या कोरोनाने थैमान घातलं असताना अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. तर रेमडेसिविर या इंजेक्शनचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. महाराष्ट्रात तर रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविरसाठी खूप धावपळ करावी लागली. अनेक तास लाईनमध्ये उभा राहून देखील हे औषध मिळत नव्हतं. अजून काही दिवस राज्यात रेमडेसिविरची टंचाई जाणवेल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
रेमडेसिविरच्या निर्यातीला बंदी देखील केंद्र सरकारने घातली आहे. पण सध्या मागणी खूप असल्याने टंचाई जाणवत आहे. रेमडेसिविर हे इंजेक्शन हे सध्या ५०-५० हजारांपर्यंत किमतीत विकले जात आहे. रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून काही काळ जाणार आहे. तर महाराष्ट्राच्या टास्क फोर्सने देखील रेमडेसिविरच्या वापरावर नियंत्रण ठेवा असे सांगितले आहे. तर टास्क फोर्सने हे देखील सांगितलं आहे कि रेमडेसिविर हे जीव वाचावणारं औषध नाहीये.
रेमडेसिविर मुळे शरीरात झालेला विषाणूंचा लोड ज्याला वायरल लोड म्हणतात तो लोड कमी होतो. पण पेशंटचा जीव वाचतोच असे हे औषध नाहीये. अनेक क्लिनिकल ट्रायल मध्ये देखील हे दिसून आलं आहे. दरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी एक व्हीडीओ शेअर करून रेमडेसिविर उपलब्ध न झाल्यास त्याला पर्यायी औषध कोणते हे सांगितले आहे.
रेमडेसिविर डॉक्टरांनी आणायला सांगितलं आणि ते उपलब्ध झालं नाही तर पेशंटला काहीच न देण्यापेक्षा फेव्हीपॅरावीर हे औषध द्यावं असं खासदार अमोल कोल्हे यांनी सुचवलं आहे. कोव्हिड टास्क फोर्सने देखील हे पर्यायी औषध सुचवल्याचं त्यांनी म्हंटल आहे. पेशंट तोंडाने औषध घेऊ शकत असेल पेशंटला हे फेव्हीपॅरावीर औषध द्यावं असं डॉ कोल्हेनी म्हंटल आहे.
रेमडिसिवीरच्या वापराबाबत कोविड टास्क फोर्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचा व्हिडिओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात एक महत्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिलंय पण ते आता मिळत नाही. या परिस्थितीत काय करावे?https://t.co/hbj0LZYQdJ
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 16, 2021
फेव्हीपॅरावीर हे महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याचा वापर हा योग्य प्रकारे केल्यास पेशंटला मदत होऊ शकते. फेव्हीपॅरावीर हे औषध तोंडावाटे घ्यावं लागतं. या औषधाने देखील विषाणूंचा वायरल लोड हा कमी करता येतो. त्यामुळे रेमडेसिविरचा अवाजवी वापर टाळून फेव्हीपॅरावीरचा वापर करा असे कोल्हे आणि कोविड टास्क फोर्सने म्हंटले आहे. दरम्यान रेमडेसिविरचा उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरल्यास गरजू व्यक्तीना ते इंजेक्शन मिळू शकते.