राजकारणात मोठं पद मिळालं कि तो राजकारणी एकदम बदलूनच जातो. त्याचे राहणीमान बदलते. सोबतचे लोक बदलतात, सोबतीला येतो मोठ्या गाड्यांचा ताफा आणि एक वेगळाच थाट. पण देशात एक अशी महिला राजकारणी आहे जी परिस्थितीमुळे एकेकाळी दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची ती महिला पुढे देशाची २ वेळा रेल्वे मंत्री बनली, मोठ्या राज्याची मुख्यमंत्री बनली. पण तिचं साधं राहणीमान काही बदललं नाही. एक पांढरी सुती साडी, एक साधी हवाई चप्पल. ना कधी कुठला साज शृंगार.
हि महिला दुसरी तिसरी कोणी नसून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी आहेत. ममता बॅनर्जी काँग्रेसच्या मुख्यमंत्री असून त्या तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक आहेत. दीदी नावाने परिचित असलेल्या ममता यांचा जन्म ५ जानेवारी १९५५ रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता मध्ये झाला. ममता दीदींनी २ वेळा देशाचे केंद्रीय रेल्वे मंत्रिपद भूषवलं आहे. त्या देशाच्या पहिल्या महिला रेल्वे मंत्री बनल्या होत्या.
ममता बॅनर्जी यांनी केंद्रात मानव संसाधन विकास राज्यमंत्री, युवक आणि क्रीडा सोबत महिला आणि बालविकास राज्यमंत्री पद देखील भूषवलं आहे. २०११ मध्ये ममतांनी बंगालमध्ये ३४ वर्षांपासून असलेली डाव्यांची सत्ता घालवली. २०१२ मध्ये त्यांचं नाव टाइम मॅगझिनच्या जगातील सर्वात प्रभावशाली १०० लोकांच्या यादीत देखील आलं होतं.
ममता बॅनर्जी यांचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबातच झाला. त्यांना शालेय जीवनापासूनच राजकारणाची आवड होती. ममताचे वडील हे एक स्वातंत्र्य सेनानी होते. पण ती खूप छोटी असतानाच वडिलांचं निधन झालं. एकट्या आईवर ममता सह तिच्या बहीण भावांची जबाबदारी येऊन पडली. त्यामुळे त्यांचं पालन पोषण करण्यासाठी आईला मदत म्हणून दूध विकायला सुरुवात केली. दूध विकून आईला हातभार ममताने लावला.
सत्तरच्या दशकात ममताचं कॉलेज सुरु होतं. दक्षिण कोलकाता मधील जोगमाया देवी कॉलेजमधून ममताने इतिहासात डिग्री घेतली. नंतर कोलकाता विश्वविद्यालयातून इस्लामिक इतिहास विषयात मास्टरची डिग्री घेतली. श्रीशिक्षायतन कॉलेजमधून बीएडची डिग्री घेतली. तर जोगेश चंद्र चौधरी लॉ कॉलेजमधून लॉ ची डिग्री घेतली. १९७० मधेच ममता सक्रिय राजकारणात आल्या. काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली.
ममताचे शिक्षण सुरु असतानाच त्यांना राज्य महिला काँग्रेसचे महासचिव पद मिळाले होते. १९८४ मध्ये लोकसभा लढवली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सोमनाथ चॅटर्जी या वरिष्ठ नेत्याचा पराभव करून पहिल्यांदा खासदार बनल्या. देशातील सर्वात युवा खासदार अशी ओळख बनली. पुढे १९८९ मध्ये काँग्रेस विरोधी वातावरणात लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. पण १९९१ ला कोलकाता दक्षिण मधून पुन्हा खासदार बनल्या. ममता त्यानंतर १९९६, १९९८, १९९९, २००४ आणि २००५ ला येथूनच खासदार बनल्या.
१९९१ मध्ये ममतांना पहिल्यांदा नरसिम्हा राव यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपद मिळाले. ममता यांनी केंद्रीय मंत्री बनल्यानंतर देखील आपली साधी जीवनशैली काही सोडली नाही. ममता या आयुष्यभर अविवाहित आहेत. त्यांच्या अंगावर कधीच कुठले मौल्यवान दागिने दिसले नाहीत. १९९६-९७ मध्ये काँग्रेसला सीपीएमची बाहुली म्हणत त्यांनी काँग्रेस सोडली. १ जानेवारी १९९८ ला भारतीय तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. १९९८ मध्ये टीएमसीचे ८ खासदार निवडून आले.
१९९९ साली एनडीए सरकार मध्ये ममता सामील झाल्या होत्या. त्यांचे अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत खूप चांगले संबंध होते. १९९९ मध्ये त्यांना रेल्वे मंत्रिपद मिळालं होतं. २००२ मध्ये पहिलं रेल्वे बजेट घोषित करताना बंगालला जास्त सुविधा दिल्याने टीका झाली होती. २००१ मध्ये काही खुलाशांमुळे त्यांची पार्टी एनडीएमधून बाहेर पडली. २००४ ला पुन्हा त्या सत्तेत आल्या. २००५-०६ मध्ये तृणमूलचं मोठं राजकीय नुकसान झालं होतं. २००९ मध्ये ममता पहिल्यांदा यूपीए सोबत गेल्या. आघाडीला २६ जागा मिळाल्या आणि ममता पुन्हा केंद्रीय मंत्री बनल्या. पुन्हा रेल्वे मंत्रिपद मिळालं.
२०११ साली विधानसभेत मोठी झुंबड तृणमूलने मारली. सीपीएमचा सफाया करून ममता पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री बनल्या. त्यांचे २९४ पैकी १८४ आमदार निवडून आले होते. पुढे २०१२ मध्ये त्यांनी राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे सत्तेत आल्यानंतर यूपीएचे समर्थन काढले आणि त्या बाहेर पडल्या. २०११ पासून ममता बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. यावेळेस त्यांच्यासमोर भाजपने आव्हान उभे केले आहे.