यूपीएससी ही देशातील एक अशी स्पर्धा परीक्षा आहे ज्यात दरवर्षी लाखो उमेदवार भाग घेतात. परंतु केवळ तेच उमेदवार परीक्षेत यश मिळवतात, ज्यांच्याकडे मेहनत, समर्पणाने तयारी करण्याची क्षमता आहे. तुमच्या जिद्दीवरच सर्वकाही अवलंबून असतं. कारण आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपण एखाद्या चांगल्या पगाराच्या पदावर तर असतो पण जे समाधान आपल्याला हवं असतं ते मिळत नाही. ते मिळवण्यासाठी मग नोकरी सोडून देण्याची तयारी देखील असावी लागते. आज आम्ही तुम्हाला त्या IAS अधिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्यांनी लॉ युनिव्हर्सिटीपासून UPSC पर्यंत सर्वत्र टॉपर्सच्या यादीत आपले स्थान निर्माण केले. पण याच तरुणीने जे यश मिळवले आहे ते एक चांगल्या पगाराची नोकरी सोडल्यानंतर मिळवले आहे.
वैशाली सिंह असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. वैशालीला सुरुवातीला सामान्य उमेदवाराप्रमाणे अपयशाला सामोरे जावे लागले असले, तरी अपार मेहनत आणि समर्पणामुळे तिने यश मिळवले. वैशालीला भविष्यात गरीब मुलांना मदत करण्यासाठी आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे होते. या कठीण परीक्षेत उत्तीर्ण होऊन वैशालीने तिचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न कसे पूर्ण केले ते जाणून घेऊया.
वैशाली मूळची हरियाणा राज्यातील फरीदाबाद जिल्ह्यातील आहे. तिने आपले शालेय शिक्षण फरीदाबादमधूनच पूर्ण केले. यानंतर वैशाली पदवीच्या अभ्यासासाठी दिल्लीला गेली. पदवी पूर्ण केल्यानंतर वैशालीने कायद्याचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. तिने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून कायद्याची पदवी पूर्ण केली. वैशालीचा कायद्याकडे कल असण्याचे एक कारण म्हणजे तिच्या कुटुंबात तिच्या पालकांपासून तिच्या भावापर्यंत सर्व वकील होते. म्हणूनच जास्त विचार न करता वैशालीने वकिलीच्या शिक्षणाला प्रवेश घेतला. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैशाली एका चांगल्या कंपनीत काम करू लागली.
चांगली नोकरी आणि करिअर असूनही वैशालीला तिच्या आयुष्यात काहीतरी उणीव जाणवत होती. तिला तिच्या रिसर्चच्या दरम्यान शेतात जाऊन काम करावे लागले होते. तेव्हा तिने ग्राउंड लेव्हलवर पसरलेल्या समस्यांशी ओळख करून घेतली. त्या वेळी वैशालीला जाणवायचे की तिने या समस्या संपवण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. ही गोष्ट तिच्या मनात सारखी यायची. गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्यात असणाऱ्या समस्यांवर तिने खासकरून लक्ष केंद्रित केलं होतं. त्यामुळे तिचं मन काही नोकरीत रमत नव्हतं.
या समस्यांशी लढण्यासाठी, हातामध्ये अशी पावर असणे आवश्यक होते, जे या समस्यांवर मात करण्यास मदत करेल. यामुळेच वैशालीने आयएएस अधिकारी होण्याचा मार्ग निवडला. तिने बनवलेले करिअर सोडून वैशाली अशा मार्गावर गेली जिथे तिला आणखी संघर्ष करण्याची गरज होती. तिने यूपीएससीची मनापासून तयारी सुरू केली. खूप मेहनत घेतली.
वैशालीला यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात अपयशाला सामोरे जावे लागले. पण परीक्षेत नापास झाल्यामुळे वैशालीचे मनोबल कमी होऊ दिले नाही. उलट, तिने पहिल्या प्रयत्नात झालेल्या तिच्या चुका सुधारल्या आणि पुढच्या प्रयत्नाची तयारी आणखी मेहनतीने सुरू केली. तिने परीक्षेच्या तयारीची रणनीती बदलली. अखेरीस तिच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि तिची UPSC मधून IAS पदासाठी निवड झाली.
2018 च्या UPSC परीक्षेत वैशाली सिंगने 8 वा क्रमांक मिळवला. वैशाली सिंग, जी सुरुवातीपासूनच अभ्यासात अव्वल होती, यूपीएससी परीक्षेत 8 वी रँक मिळवून तिने तिच्या पालकांसह संपूर्ण हरियाणाचे नाव उंचावले. यूपीएससीचा प्रवास सोपा नाही, आपल्या सर्वांना माहित आहे की वैशालीसाठीही ते सोपे नव्हते. प्रीलिम्समध्ये तिच्या पहिल्या अपयशानंतर, वैशालीने नकारात्मक विचारांना तिच्यावर हावी होऊ दिले नाही. तिने अपयशाचा सामना देखील मोठ्या जिद्दीने करून हे यश मिळवलं.
सकारात्मकता आणि नवीन रणनीतीसह वैशालीने दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली आणि यश मिळवून तिचे स्वप्न पूर्ण केले. वैशाली यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगते कि यूपीएससीचा अभ्यासक्रम जरी अवघड असला तरी गोंधळात गोंधळून न जात तयारी करावी. विद्यार्थ्यांनी संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करण्यासाठी नोट्स बनवून यूपीएससीची तयारी करावी. कठोर परिश्रम आणि सकारात्मक विचाराने परीक्षेला बसण्याची तयारी केली पाहिजे. स्मार्ट टेक्निकने केलेली तयारी विद्यार्थ्यांना यश मिळवण्यास मदत करते.