शिक्षणाचे महत्व आजकाल नव्याने सांगायची गरज नाही. आज ज्या व्यक्तीचा प्रवास आपण बघणार आहोत जी अशा भागातून आली जिथे मुलींना लग्न करण्यापूर्वी लग्न करायचं का नाही साधं विचारलं देखील जात नाही. मुलगा पसंत आहे का नाही हे विचारणे तर दूरची गोष्ट. या भागातून आलेल्या त्या तरुणीने आपल्यावर बिघडलेली सुशिक्षित मुलगी हा ठपका लागता लागता तो पुसला आणि आयपीएस पदापर्यंत झेप घेतली.
औरंगाबाद नगर सीमेवर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या गावातील हे सातपुते कुटुंब. तसं हे सातपुते कुटुंब मुलंच नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील साके गावचे. पण हे कुटुंब शेवगावला स्थायिक झालेलं. शेवगावचे बाळासाहेब सातपुते हे स्त्री शिक्षणाचे महत्व जाणणारे गृहस्थ. त्यांचे शिक्षण कमी झालेले असताना पत्नीला मात्र उच्च शिक्षण देऊन शिक्षिका बनवलं.
सातपुतेंच्या कुटुंबात सत्तावीस सदस्य होते. बाळासाहेबांची पत्नी कृष्णाबाई तेव्हा सर्वाधिक शिकलेल्या. तर कौटुंबिक अडचणीमुळे बाळासाहेबांना दहावीनंतर आयटीआय करून शिक्षण सोडावे लागले. स्वतःच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून, एलआयसीचे एजंट म्हणून, वीटभट्टी असे कितीतरी व्यवसाय त्यांनी केले. नंतर कृष्णाबाईंशी लग्न झालं.
बाळासाहेबांना एक मुलगी झाली. जिचं नाव तेजस्विनी बाळासाहेब सातपुते. आई शिक्षिका असल्याने तेजिस्विनीला बालपणापासून शिस्त लावायचा आईने प्रयत्न केला. तेजस्विनीला लहानपणी अभ्यासाची आवड नव्हती. आईला मात्र तिने खूप अभ्यास करावा असे वाटत असे. तेजस्विनीने शेवगावमध्येच सुरुवातीचं शिक्षण घेतलं.
तेजस्विनी खूप आळशी होती. ती सकाळी कधी लवकर उठायची नाही. कधी लवकर शाळेत जायची नाही. शिक्षकांचा आणि खासकरून आईचा मार तर खूप वेळा खाल्ला. चौथीत असताना तिच्या व्यवसायमाला कोऱ्या बघून आईने त्या पोत्यात भरल्या आणि शेकोटी करणार म्हणून सांगितले. तेव्हा मात्र तेजस्वीने आईला अभ्यास करण्याचा शब्द दिला आणि व्यवसायमाला ८ दिवसात पूर्ण केल्या. खूप अभ्यास केल्याने ती चौथीला केंद्रात दुसरी आली.
तेव्हा तेजिस्विनीने ठरवलं कि पायलट व्हायचं. पण जेव्हा ती अकरावी मध्ये आली तेव्हा तिला चषमा लागला. तेव्हा सर्वानी सांगितलं कि आता पायलट होता येत नाही. स्वप्नच पूर्ण होऊ शकणार नाही असं वाटायला लागलं. ती खचली होती. पण हार मानली नाही. दहावी आणि बारावीला खूप अभ्यास करून त्या चांगल्या मार्काने पास झाल्या. इंजिनिअर, एमबीबीएस साठी अगदी सहजरीत्या नंबर लागला असता. पण त्यांनी वेगळा मार्ग निवडनला.
शास्त्रज्ञ होण्यासाठी महाराष्ट्रात नवीनच सुरू झालेल्या बीएस्सी (जैवतंत्रज्ञान) या अभ्यासक्रमाला बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेत प्रवेश घेतला. याच कोर्सदरम्यान, बंगळूर येथे जेएनसीएएसआर या संस्थेने संशोधनाच्या अनुषंगाने शास्त्रज्ञ घडवण्यासाठी देशातून दहा विद्यार्थ्यांची निवड केली होती, त्यात महाराष्ट्रातून तेजस्वी सातपुते या एकमेव विद्यार्थिनी. पण या कोर्समध्ये दुसऱ्या वर्षात त्यांना शास्त्रज्ञ होणे आपल्या कामाचे नाही असे वाटले आणि तो विचार सोडून दिला.
बंगळुरू वरून परतून शेवटी एक लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कायद्याचे शिक्षण घेताना मित्र मैत्रिणींमुळे यूपीएससी बाबत कळलं. आपल्यासाठी यूपीएससी हे क्षेत्र अगदी योग्य आहे’ असे वाटू लागले अन् मग ठरले. एलएलबीची चौथी सेमिस्टर चालू असताना तेजस्वी यांनी आयएएस होण्याचे स्वप्न मनी बाळगले व त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला.
तेजस्विनीला आधी पायलट व्हायचं होतं. नंतर एलएलबी करताना न्यायाधीश व्हायचं ठरलं. त्याआधी शास्त्रज्ञ व्हायचं ठरलं होतं. आता तो हि निर्णय बदलून ती कलेक्टर व्हायचं या निर्णयावर आली होती. यूपीएससीची तयारी करण्यासाठी मुंबई गाठली. तेजस्विनीचं हे सर्व बघून लोक नाव ठेवायला लागली होती. किती शिकणार? कधी नोकरी लागणार? आणखी किती दिवस अभ्यास करणार? असे प्रश्न ऐकू येऊ लागले. घरच्यांची मात्र साथ दिली.
तेजस्विनी त्यावेळी गाढवाची गोष्ट ध्यानात आणायची. गाढवाला पाठीवर घेतलं तरी लोक हसणार आणि त्याच्या पाठीवर बसलं तरी लोक हसणारच. तिला पहिल्या प्रयत्नात अपयश आलं होतं. त्यावेळी कमी अभ्यास करून थोडक्यात अपयश आलं होतं. नंतर खूप अभ्यास केला. आणि पुढच्या प्रयत्नात यश मिळालं. मे २०१२ साली झालेल्या यूपीएससीच्या परीक्षेत तेजस्वी बाळासाहेब सातपुते यांची आयपीएसपदी निवड झाली. सामान्य असलेल्या सातपुते कुटुंबाची मुलगी आज गावचे व कुटुंबाचे नाव देशभर गाजवत आहे.