काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम असल्याचं सांगितलं जात आहे. या मैदानाची प्रेक्षक क्षमता १ लाख १० हजार आहे. भारतात क्रिकेटला खूपच प्रेम मिळतं. आज आपण असा एक किस्सा जाणून घेणार आहोत ज्यामध्ये एका स्टेडियमचा जन्म झाला.
मराठी माणसाच्या अपमानातून झाला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा जन्म-
मुंबईतील वानखेडे स्टेडियम आज जगातील सर्वोत्तम क्रिकेट स्टेडियम पैकी एक आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासाची पाने चाळायची झाली तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा उल्लेख केल्याशिवाय हा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने याच मैदानावर २०११ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना जिंकत २७ वर्षानंतर भारताला वर्ल्डकप मिळवून दिला होता.
१९७०-७२ चा तो काळ होता. त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते विदर्भातील बॅरिस्टर शेषेराव वानखेडे. शेषेराव वानखेडे यांची अत्यंत हुशार राजकारणी अशी त्यावेळी ओळख होती. याशिवाय त्यांचे क्रिकेटप्रेम देखील महाराष्ट्रासह देशाला सर्वश्रुत होतं. शेषेराव वानखेडे हे महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री देखील होते.
क्रिकेटवर शेषेरावांचं प्रचंड प्रेम राहिलं. त्यांनी तत्कालीन बॉंबे क्रिकेट असोसिएशन मध्ये म्हणा किंवा मग BCCI मध्ये म्हणा अध्यक्ष, सेक्रेटरी असे असंख्य पदं भूषवली. त्यांच्या या क्रिकेटप्रेमामुळेच त्यावेळचे काही आमदार त्यांच्याकडे आमदारांचा क्रिकेट सामना ठेवण्याचा प्रस्ताव घेऊन गेले. त्यावेळी मुंबईत ब्रेब्रॉन हे एकमेव स्टेडियम होतं. या स्टेडियमला भारतातलं लॉर्ड्स म्हंटल जायचं.
ब्रेब्रोन हे अत्यंत प्रसिद्ध आणि समुद्राच्या बाजूला असलेलं स्टेडियम होतं. ब्रेब्रोन स्टेडियमची मालकी त्यावेळी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया(सीसीआय)कडे होती. पण त्याकाळी सीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये राखीव तिकिटांच्या संख्येवरून वाद सुरु होता. सीसीआयचे त्यावेळी अध्यक्ष होते भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू विजय मर्चंट.
शेषेराव वानखेडे हे जेव्हा आमदारांना घेऊन सामना खेळवण्यासाठी ब्रेब्रोन स्टेडियमची मागणी करायला विजय मर्चंट यांच्याकडे गेले त्यावेळी विजय मर्चंट यांनी या सामन्याला परवानगी नाकारली. विजय मर्चंट हे गुजराती व्यक्ती होते. त्यांना गुजराती असण्याचा खूप अभिमान होता. त्यामुळे कट्टर गुजराती अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या मनात मराठी माणसांबद्दल राग असायचे असे देखील म्हंटले जाते.
आमदारांच्या सामन्याला परवानगी नाकारल्याने मर्चंट आणि वानखेडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी वानखेडे यांनी मर्चंट यांच्या तोंडावर सांगितले कि तुम्ही स्टेडियम देत नाही तर आम्ही आमचं स्टेडियम उभा करून दाखवू. त्यावेळी विजय मर्चंट यांनी घाटी लोक काय स्टेडियम बांधणार असे शब्द काढले होते. हे शब्द वानखेडे आणि इतर आमदारांच्या प्रचंड जिव्हारी लागले.
शेषेरावजी वानखेडे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांकडे गेले आणि त्यांना घडलेला प्रकार सांगितला. मुख्यमंत्र्यांनीही वानखेडेंची तळमळ पाहून मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमच्या जवळच दुसऱ्या मैदानासाठी जागा दिली.
वानखेडेंनीही गुजराती मर्चन्टच्या नाकावर टिच्चून ब्रेबॉर्न पेक्षा मोठे स्टेडियम उभे केले. हे स्टेडियम उभारण्यासाठी कष्ट घेणाऱ्या शेषराव वानखेडे यांचे नाव या स्टेडिअमला देण्यात आले. जानेवारी १९७५ मध्ये वानखेडे स्टेडियमवर भारत वेस्टइंडीज यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. तेव्हापासून ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणारे सामने बंद होत गेले आणि वानखेडे स्टेडियम प्रसिद्धीला आले.