मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपावर मुंबई हायकोर्टाने आज मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करून १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या आधारावर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मुख्यामंत्र्यांना पत्र लिहून आपला राजीनामा सादर केला.
दरम्यान अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या पत्रामध्ये जयश्री पाटील यांचा उल्लेख आहे. या जयश्री पाटील नेमक्या कोण आहेत हे जाणून घेऊया. जयश्री पाटील या एक वकील असून त्यांनीच या प्रकरणात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवरच सुनावणी करताना न्यायालयाने सीबीआय मार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात देखील याचिका दाखल केलेली आहे.
ऍड जयश्री पाटील या ऍड गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अॅड. जयश्री पाटील यांच्याकरवी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली होती. त्यांच्याच आज हायकोर्टासह सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिका दाखल आहेत. ऍड जयश्री या जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल के पाटील यांची कन्या आहेत.
कोर्टाने आज जयश्री पाटील यांचे याचिका दाखल केल्यामुळे कौतुकही केले आहे. कोणीतरी एक शूर आहे ज्याने हिंमत दाखवली अशा शब्दात हायकोर्टाने त्यांचे कौतुक केले. एवढ्या १०० कोटींच्या प्रकरणात एक तरी शूर आहे जे समोर आले आहेत, असे मत कोर्टाने यावेळी व्यक्त केले. जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या मानव हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून सात वर्षे काम केलं आहे.
जयश्री पाटील या गेल्या २२ वर्षांपासून उच्च न्यायालयात वकिली करतात. त्यांनी कायदा विषयात पीएच.डी केली आहे. मानवाधिकाऱ्याच्या मुद्द्यावर लढणाऱ्या वकील म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी मानवाधिकारांबाबत अनेक पुस्तकं लिहिली आहेत. २०१४ च्या मराठा आरक्षण कायद्यास ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं. नेहमीच मराठा समाजाविरोधात भूमिका घेतात म्हणून त्यांच्यावर आरोप होतात.
जयश्री पाटील यांच्यावर भारीप-बहुजन महासंघाशी संबंध असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. पण त्या म्हणतात माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. जयश्री पाटील यांचे पती गुणरत्न सदावर्ते यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएच.डी केली आहे. सुप्रीम कोर्टात ५० लाख कर्मचाऱ्यांची केस, डॉक्टरांना काम बंद आंदोलन करू न देण्याची केस, अंगणवाडी सेविकांमुळे मुलांची होणारी आबाळ, रोहित वेमुला केस, अशा असंख्य केसेस सदावर्ते यांनी लढवल्या आहेत.
जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते हे पती पत्नी मूळचे नांदेडचे आहेत. काही वर्षांपूर्वी ते नांदेडहून मुंबईला स्थायिक झाले आणि इथेच ते वकिली करतात. चर्चेत असलेल्या अनेक प्रकरणांच्या याचिकांचं कामही त्यांनी पाहिलं आहे. वकिलीपूर्वी ते वैद्यकीय डॉक्टरही आहेत. सदावर्ते यांचे वडील ‘भारिप बहुजन महासंघा’कडून नांदेड महापालिकेवर निवडून गेले होते. औरंगाबादेत त्यांचं शिक्षण झालं आहे.