राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील आबा हे प्रचंड लोकप्रिय नेते होते. शरद पवार यांच्यामागे भक्कमपणे राहणाऱ्या आबांना पवारांनी भरभरून दिलं. आर आर पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली होती. तासगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून आबांनी तब्बल २४ वर्षे नेतृत्व केले. शांत आणि सभ्य अशा या लोकनेत्याने राज्याचे गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही भूषवलं.
आबांचा जन्म १६ ऑगस्ट १९५७ रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात झाला. वडील गावचे सरपंच असूनही घरची परिस्थिती अडचणीची होती. त्यामुळे त्यांनी ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत काम करत करत शिक्षण पूर्ण केले होते. सांगलीच्या शांतिनिकेतन कॉलेजमधून आबांनी बी.ए. आणि एलएलबीचे शिक्षण घेलले होते.
आबांची राजकीय कारकीर्द सांगलीच्या जिल्हा परिषद सदस्य पदापासून सुरु झाला. पुढे आबा आबा तासगांव मतदारसंघातून १९९०, १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये सलग विधानसभेवर निवडून गेले. आबांनी ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही कार्यभार सांभाळला. शिवाय पक्षातील अनेक महत्वाचे पद सांभाळली.
आबांची कारकीर्द गाजली खरी गृहमंत्री असताना. आबांनी केलेल्या अनेक धडक कारवाया आजही चर्चिल्या जातात. आबांनी सांगितलेले किस्से आजही गाजलेले आहेत. असाच एक खास किस्सा जाणून घेऊया जो आबांनी एकदा भाषणात सांगितला होता.
जीवनाच्या गरजा किती असतात हे कधी ठरवलं पाहिजे असं आबा नेहमी सांगत. आबा गृहमंत्री असताना एका सेल्स टॅक्स च्या अधिकाऱ्यावर रेड पडली. त्या घरातील बाईने विनंती करून बाथरूमला गेली होती. त्यावेळी बाथरूमच्या खिडकीतून सोसायटीत नोटांचा पाऊस पडला होता. कोट्यवधीच्या नोटा वरून खाली फेकल्या होत्या.
सुनील जोशी नावाच्या इंजिनिअरच्या घरावर धाड पडली होती. ते क्लासवन ऑफिसर होते. पुण्यात ती धाड मुंबईच्या पोलिसांनी टाकली होती. त्यांच्या हद्दीत नसल्याने त्यांनी गृहमंत्री आबांच्या कानावर घातलं. आबा म्हणाले जावा काही मिळत असेल तर पकडा. मुंबईचे पोलीस हद्दीबाहेर ऑर्डर न काढता गेलेत म्हणून आबांनी काही सापडलं का या उत्सुकतेने कॉल केला.
तेव्हा समोरून अधिकाऱ्याने सांगितले साहेब खूप सापडलय, मोजत आहोत. आबांनी सगळं मोजून झाल्यावर फोन करण्यास त्या अधिकाऱ्यास सांगितले. आबा फोनची वाट बघत होते. पण संध्याकाळपर्यंत फोन आला नाही. आबांनीच दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला आणि म्हणाले स्कोर काय आहे? अधिकाऱ्याने गमतीत सांगितलं काउंटिंग अजून सुरु आहे.
आबांनी देखील मिश्किलपणे म्हंटले २ दिवसात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची मत मोजून होतात, तुम्हाला एवढं मोजता येत नाही. त्या अधिकाऱ्याच्या घरात त्यावेळी १७ लाखाचे २ पेन, ९० हजाराचे संडासाचे भांडे आणि कोट्यवधींचा ऐवज त्यावेळी तिथे सापडला होता. आबांनी फोनवर परवानगी यासाठी दिली होती. आबांच्या त्या फोनमुळे एक मोठा अधिकारी मात्र जाळ्यात सापडला होता. आबा हे नेहमीच स्वच्छ प्रतिमा असलेले नेते म्हणून ओळखले जातात.