गोपीनाथ मुंडे हे नाव महाराष्ट्राला सुपरिचित आहे. युतीच्या शासनकाळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर ते बीडचे खासदारही होते. शरद पवारांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जायचे. भाजपसारख्या शेटजी भटजींच्या पक्षाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रुजवून त्याला बहुजन चेहरा देणारा नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे असे त्यांच्याबद्दल अनेकजण सांगतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून केवळ संघर्षाच्या जोरावर त्यांनी आपले गोपीनाथ मुंडे हे नाव अनेकांच्या काळजावर कोरले.
गोपीनाथ मुंडेंना मात्र लहानपणी आपले नाव गोपीनाथ ठेवले म्हणून फार राग यायचा. खुद्द गोपीनाथ मुंडेंच्या आईंनीच एका मुलाखतीत गोपीनाथ मुंडेंबद्दल ही गोष्ट सांगितली आहे. पाहूया गोपीनाथ मुंडेंच्या आईंनी सांगितलेल्या काही खास गोष्टी…
गोपीनाथ मुंडेंना आवडत नव्हते आपले नाव
गोपीनाथ मुंडेंच्या आई म्हणजेच लिंबाबाई पांडुरंग मुंडे यांनी एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की, “गोपीनाथ लहान असताना फार खोडकर आणि हट्टी होते. आपलं नाव “गोपीनाथ” का ठेवले ? असा प्रश्न विचारुन ते रडत बसायचे. मला ते नाव आवडत नाही म्हणून आईवडिलांकडे तक्रार करायचे. परंतु त्यांचे वडील पांडुरंग मुंडे मात्र गोपीनाथ यांचा फार लाड करत असत.”
लहानपणीचे खोडकर गोपीनाथराव
गोपीनाथ मुंडेंच्या आईंनी अजून एक किस्सा सांगितला, त्या म्हणतात की, “एके दिवशी मी दुपारच्या वेळी घरची कामे आटोपून आराम करत होते. आंब्याचा रस बनवून माठाखाली झाकून स्वयंपाकखोलीच्या दाराला बाहेरून कडी लावली होती. पाचसहा वर्षांचा चिमुकला गोपीनाथ आला. मी झोपलेलं त्याला आवडलं नाही, तो रागावला. गोठ्यात गेला आणि गाय सोडून आणली.
स्वयंपाकघराची कडी उघडली आणि मठांखालचा आमरस गाईला खाऊ घातला. तसाच गाईला सोडून पळत वडिलांकडे गेला आणि त्यांना बोलावून आणले. वडिलांना म्हणाला, बघा आई झोपली आहे आणि तिकडे गाई रस पिऊन गेली. मी घाबरुन जागी झाली आणि गोपीनाथला म्हणाले, गाई रस पित आहे ते दिसतंय, पण गाई खोलीची कडी काढून आत कशी गेली रे ? आणि माठाखाली झाकून ठेवलेला रस काय हाताने काढला का रे ?” असा खोडकरपणा गोपीनाथराव करायचे.
लहानपणी जरी गोपीनाथरावांना आपले नाव आवडत नसले तरी मात्र कुणाशी फोनवर बोलताना मात्र आवडीने “हॅलो, मी गोपीनाथ बोलतोय” असा उच्चार करायचे. सही करताना देखील अनेकदा ते गोपीनाथ असे लिहून मराठीत सही करायचे.