Friday , January 27 2023
Breaking News
Home / जीवनशैली / चपला बुटाच्या दुकानात काम करून अभ्यास करणारा शुभम देशात सहावा येत कलेक्टर झाला!

चपला बुटाच्या दुकानात काम करून अभ्यास करणारा शुभम देशात सहावा येत कलेक्टर झाला!

आयुष्यात काही ठरवलं तर ते करून दाखवणं कठीण नसतं. फक्त त्यासाठी आपली तेवढी प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी हवी. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य वाटायला लागतात. आज आपण अशा एका तरुणाची यशोगाथा बघणार आहोत ज्या तरुणाची एक वेळ अशी होती कि तो चपला बुटाच्या दुकानात काम करून अभ्यास करत असे, आयुष्यात अनेकदा तो फेल देखील झाला पण त्याने हार न मानता आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली आणि कलेक्टर होऊन दाखवलं. अन त्याने असं तसं काठावरचं यश नाही मिळवलं तर तो देशात सहावा येऊन IAS झाला.

या तरुणाचे नाव आहे शुभम गुप्ता. शुभमने जे यश मिळवलं आहे त्याला शब्दात सांगणे कठीण आहे. कारण आपल्या आयुष्यात अनेकदा फेल होऊनही त्याने हार मानली नाही. शुभमच्या जन्म राजस्थानमधील जयपूर शहरात एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. घरी आई वडील आणि भाऊ बहीण असा छोटासा परिवार. तर वडील एक छोटा व्यवसाय करायचे. त्यांच्या व्यवसायामुळे त्यांच्या नेहमी अनेक अधिकाऱ्यांसोबत भेटीगाठी होत असत. वडिलांनीच शुभमला तू कलेक्टर का होत नाहीस असं म्हंटले. वडिलांनी त्यांची इच्छा बोलून दाखवली कि तू मोठं होऊन कलेक्टर व्हावं.

शुभमला त्यावेळी हे देखील माहिती नव्हतं कि कलेक्टर नेमकं असतं काय आणि कलेक्टर बनतात कसे. पण त्याच्या मनात देखील ती गोष्ट बसली होती. वडिलांनी सल्ला दिला त्याच दिवशीपासून शुभमचा UPSC चा प्रवास सुरु झाला. त्याच देखील ते स्वप्न बनलं. त्यावेळी त्याचं कुटुंब आर्थिक अडचणीतून जात होतं. आर्थिक परिस्थितीमुळे गुप्ता परिवाराला जयपूर सोडून महाराष्ट्रात डहाणू रोडला राहायला यावं लागलं. शुभम त्यावेळी ८ वी मध्ये होता. तिथं त्याला मराठी येत नसल्यामुळे मराठी शाळेत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे डहाणूपासून ८० किमी असलेल्या गुजरातच्या वापी जवळच्या एका शाळेत त्याने प्रवेश घेतला. शुभमने ८ ते १२ वी पर्यंतच शिक्षण तिथं घेतलं.

रोज रेल्वेने शुभम शाळेत जात असे. बहिणीने पण त्याच शाळेत प्रवेश घेतला होता. दोघे सोबत शाळेत जायचे. त्यांचा रोज २-३ तास वेळ प्रवासात जात असे. त्यावेळी शुभमच्या वडिलांनी डहाणू रोडला एक छोटं चपला बुटांचं दुकान टाकलं होतं. पण आर्थिक परिस्थिती नाजूकच होती. एका दुकानात त्यांचा घरखर्च देखील भागात नव्हता. त्यामुळे वडिलांनी आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून वापी मध्ये अजून एक दुकान उघडलं. वडिलांना दोन्ही दुकानं सांभाळणं कठीण होतं. म्हणून शुभमने डहाणूच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. तिथेच दुकानात बसून तो अभ्यास करायचा आणि दुकान सांभाळायचा.

शुभमने आपल्या अभ्यासाची झलक १० वि मधेच दाखवून दिली. तो वलसाड जिल्ह्यात पहिला आला. चांगले मार्क मिळाल्याने शुभमने सायन्स घ्यावा हा सर्वांचा आग्रह होता. पण शुभमला मात्र कॉमर्स घेऊन इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा होता. शुभमने बारावी झाल्यानंतर पुढे दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला. तिथं त्याला इकॉनॉमिक ओनर्सचं शिक्षण घ्यायचं होतं पण मार्क्स चांगले नसल्याने बीकॉम ओनर्सला प्रवेश मिळाला. पण त्याने २ आठवडे प्रयत्न करून HOD कडून आपलं ऍडमिशन ट्रान्सफर करून घेतलं. तेव्हापासूनच शुभममध्ये कधी हार मानायची नाही हा आत्मविश्वास आला.

शुभमने २०१५ मध्ये UPSC ची परीक्षा पहिल्यांदा दिली. पण त्याला पहिल्या प्रयत्नात अपयश आले. पूर्व परीक्षेतच अपयश आलं होतं. त्याच्या चुका त्यावेळी त्याच्या लक्षात आल्या. तो पाहिजे तेवढं सिरीयस नव्हता व कॉलेजमध्ये पण जास्त वेळ देत होता. अपयशातून शुभम शिकत गेला. पुढे २०१६ मध्ये त्याने भारतात ३६६ वी रँक मिळवली. पण या निकालाने तो खुश नव्हता. स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजून खूप मेहनत करावी लागणार हे त्याने ओळखलं. मग तिसऱ्यांदा परीक्षा दिली. त्यावेळी देखील त्याला पुन्हा अपयश आले. त्यानंतर त्याने ठरवले कि आता चौथा आणि शेवटचा प्रयत्न करायचा. जेवढी जास्त मेहनत करता येईल ती करायची असं मनाशी ठरवलं.

त्याच दरम्यान शुभमची दुसऱ्या प्रयत्नात मिळालेल्या यशातून इंडियन ऑडिट एंड अकाउंट सर्विस मध्ये निवड झाली होती. त्याची ट्रेनिंग शिमला मध्ये चालू होती. या ट्रेनिंगमुळे अभ्यासाला कमी वेळ मिळत असे. पण २०१८ मध्ये त्याने शेवटचा प्रयत्न खूप मेहनत घेऊन दिला आणि त्यात तो देशात सहावा येत IAS झाला. शुभमच्या मते यश मिळवण्यासाठी मेहनत जिद्द यासोबत इमानदारी देखील महत्वाची आहे. मेहनत आणि जिद्दीला इमानदारीची साथ मिळाली तर तुम्ही UPSC ची पायरी आरामात चढू शकता.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *