आजकाल असे अनेकजण असतात जे कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त असतात. पण कॅन्सर हा एक जीवघेणा आजार मानला जातो. कॅन्सर हा सुरुवातीच्या काळातच कळला तर त्याच्यावर उपचार केले जाऊ शकतात. जसं जसं याच्या स्टेज वाढत जातात तसा हा आजार त्रासदायक ठरतो.
कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराचा सामना करणे आजही देशातील अनेकांना शक्य नाही. असे अनेक कॅन्सरपीडित आहेत जे आपला कॅन्सरवर उपचार करण्यास सक्षम नाहीयेत. पण असे नाही कि या लोकांची मदत करण्यास कोणी समोर येत नाही. आज अशा एका महिलेविषयी जाणून घेऊया जी महिला कँसर पीडित चिमुकल्यांसाठी दिवसरात्र सेवा करणारी आई बनली आहे.
ज्या महिलेविषयी आपण बोलत आहोत त्या महिलेचं नाव आहे गीता श्रीधर. गीताने आपले आयुष्य कॅन्सरपीडित चिमुकल्यांसाठी सर्वस्वी अर्पण केलं आहे. मुंबईत राहणारी गीता लहान मुलांना शिकवायची. पण त्याच दरम्यान त्यांच्या वडिलांची तब्येत बिघडली. जेव्हा गीताला वडिलांची तब्येत बिघडल्याचे समजले तेव्हा ती तात्काळ घरी गेली.
ती आपल्या तामिळनाडूमधील गावात गेली. तिथे गेल्यानंतर तिला जे दिवस जगावे लागले ते तिच्या आयुष्यातील खूप निराशाजनक दिवस होते. गीताने आपल्या वडिलांना डोळ्यांनी कॅन्सरची लढाई हरताना बघितले. फक्त २० दिवसात सर्वकाही झाल्याचे गीता सांगते. त्यांच्या कॅन्सरचे निदान व्हायला आणि ते आम्हाला सोडून जायला २० दिवसच लागल्याचे त्या म्हणतात.
गीताचे वडील देखील खूप चांगले व्यक्ती होते. त्यांनी कधीच कोणाला काही दुःख दिले नाही. गीता वडिलांच्या निधनानंतर मुंबईला परतली. ती मुंबईत येऊन लोकांच्या सेवेला लागली. तिने निर्धारच केला कि आता लोकांची सेवा करायची. त्यानंतर ती एका डॉक्टरसोबत पुण्याच्या एका अनाथ आश्रमात गेली. तेव्हाच तिने कॅन्सरपीडित मुलांची सेवा करायचे मनाशी ठरवले.
तिने बघितले कि २-५ वर्षांचे चिमुकले कॅन्सरशी लढत आहेत. त्या मुलांना आर्थिक मदतीपेक्षा एका आधाराची गरज असल्याचे गीताने हेरले. त्यामुळे या मुलांचा सांभाळ करण्याचे तिने ठरवले. आणि आपल्या सोबत पुण्यातून २८ मुलं मुंबईला घेऊन गेली. त्या सर्वाना घेऊन तिने एका फ्लॅटमध्ये राहायला सुरुवात केली.
गीताने आपले आयुष्य या मुलांच्या सेवेसाठी अर्पण केले आहे. गीता या चिमुकल्यांची दिवसरात्र आईसारखी सेवा करते. या मुलांच्या उपचारासाठी तिने आपले सर्व पैसे खर्च केले आहेत. या तिच्या चांगल्या कार्यात अनेक मित्रांनी आतापर्यंत आर्थिक मदत तिला केली आहे. गीता २४ तास या मुलांची सेवा करते. ती त्यांना कुठल्याच गोष्टीची कमी जाणवू देत नाही.
मागील १२ वर्षांपासून गीता कॅन्सरपीडित चिमुकल्यांची सेवा करत आहे. आज हे सर्व मुलं गीताला आई म्हणूनच बोलवतात. गीता एक चांगली कुक देखील आहे. ती एक फूड बँक चालवते. यामधून ती दर रविवारी अनाथ, बेघर लोकांना जेवण देते. यामध्ये तिला कुटुंबाची देखील साथ मिळाली आहे. गीताला आता फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.