व्हाट्सअपवर आपल्याला सकाळ संध्याकाळ नियमित नशिबावरचे छान छान सुविचार वाचायला मिळतात. कुणी म्हणतं “एखादी गोष्ट नशिबातच असावी लागते”, तर कुणी आपल्याकडे नसणाऱ्या गोष्टीला “नशीबच कारणीभूत” असल्याचा समज बाळगून असतात. एखादा माणूस प्रयत्न करुन करुन ठाकतो त्यावेळी त्याचा प्रयत्नवादावरचा विश्वास डळमळायला लागतो आणि तो नशिब मानायला सुरुवात करतो. पण आज आम्ही तुम्हाला ज्या माणसाची गोष्ट सांगणार आहोत, त्याच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्हीसुद्धा म्हणाल …च्यायला माणसानं एवढं पण कमनशिबी नसावं !
आपण ज्या व्यक्तीबाबत माहिती घेणार आहोत त्याचे नाव आहे वॉल्टर समरफोर्ड. वॉल्टर हा ब्रिटनचा रहिवासी. ब्रिटिश सैन्यात तो अधिकारी होता. त्याच्यासोबत एकापाठोपाठ एक अशा ज्या घटना घडल्या, त्यामुळे त्याला इतिहासातील सर्वात कमनशिबी व्यक्ती म्हणून ओळखले जाते.
१) पहिली घटना : वॉल्टर समरफोर्ड सोबतची पहिली घटना १९१८ साली घडली. त्यावेळी वॉल्टर पहिल्या महायुद्धात बेल्जियममध्ये तैनात होता. एके दिवशी तो घोड्यावर बसून रपेट मारत होता, त्यावेळी अचानक त्याच्या अंगावर आकाशातून वीज कोसळली. वॉल्टरला त्या विजेचा जोरदार धक्का बसला. यामुळे त्याच्या कंबरेखालील संपूर्ण शरीराला लकवा मारला. पण काही महिन्यांतच तो पूर्णपणे बरा झाला आणि स्वतःच्या पायाच्या त्याने चालायला सुरुवात केली. तोपर्यंत इकडे त्याला सक्तीने सैन्यातून सेवामुक्त करण्यात आले.
२) दुसरी घटना : वॉल्टर समरफोर्ड सोबतची दुसरी घटना ही पहिल्या घटनेच्या सहा वर्षानंतर म्हणजेच १९२४ साली घडली. त्यावेळी वॉल्टरने कॅनडामध्ये आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. तिथे असताना एक दिवस तो मासेमारीसाठी जवळच्या तलावात गेला. त्याठिकाणी तो एका झाडाखाली बसला होता. तेवढ्यात अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. यावेळी त्याच्या शरीराच्या उजव्या बाजूला अर्धांगवायू झाला. तथापि चमत्कारीकरित्या दोन वर्षातच तो पूर्णपणे बरा झाला आणि चालायला फिरायला लागला.
३) तिसरी घटना : दुसर्या घटनेच्या अगदी सहा वर्षांनंतर म्हणजेच १९३० साली वॉल्टर समरफोर्ड सोबत पुन्हा एकदा अशीच घटना घडली. एका बागेमध्ये तो फिरत होता आणि तिथल्या नयनरम्य सौंदर्याचा आनंद घेत होता. अचानक हवामान खराब झाले आणि काळ्या ढगांनी आभाळ व्यापले. त्याच दरम्यान आकाशातून एक गडगडाटी वीज त्याच्या अंगावर पडली. ही तिसरी वेळ होती. यावेळी मात्र धक्का जोराचा होता. दोन वर्ष वॉल्टरने जीवनमरणाशी संघर्ष केला आणि १९३२ मध्ये अखेर त्याची प्राणज्योत मावळली.
४) चौथी घटना : वॉल्टरच्या कमनशिबी पुराणाचा अध्याय इथेच संपत नाही. वॉल्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी कॅनडामधील वैंकुवर येथील माउंटन व्हिव दफनभूमीत त्याला दफन केले. सहा वर्षानंतर अजून एकदा मनोरंजक घटना घडली. पुन्हा एकदा आकाशातील वीज थेट त्यांच्या थडग्यावरच पडली. त्यात त्यांच्या थडग्याला लावण्यात आलेला कोनशिलेचा दगड फुटला. लागोपाठच्या या चार घटनांमुळे वॉल्टर समरफोर्डला इतिहासातील सर्वात कमनशिबी व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले.