आपल्या जुन्याजाणत्या लोकांमध्ये एक महान फार प्रसिद्ध होती, “उत्तम शेती, माध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी.” थोडक्यात पूर्वीच्या काळी नोकरीला म्हणावं तितकं महत्व दिलं जात नसायचं. पण आता काळ बदलला आहे. आता “उत्तम नोकरी” म्हणायची वेळ आली आहे. कारण शेती क्षेत्रातील अडचणी आपण बघतच आहोत आणि व्यापार क्षेत्रातही धोक्यांचे प्रमाण वाढल्याने व्यावसायिक अनेकदा तोट्यातच असल्याचे बघायला मिळते. नोकरी असेल तर निदान खाऊन पिऊन सुखी तरी राहता येतं असं नोकरी करणाऱ्यांचं म्हणणं असतं.
नोकरीच्या बाबतीतही आधी ठराविक क्षेत्रांमध्येच नोकऱ्या असायच्या, ज्यामध्ये लोकं आपले करिअर करण्याविषयी विचार करायचे. पण नोकरीच्या क्षेत्रातही आता परिस्थिती बदलली आहे. खाउजा धोरणानंतर नोकऱ्यांसाठीही नवीन क्षेत्रांची दारे खुली झाली आहेत. परंतु तुम्हाला हे जाणून घेतल्यानंतर आश्चर्य वाटेल की नोकरीच्या क्षेत्रात असेही एक प्रोफेशन आहे ज्यामध्ये संपूर्ण जगातील फक्त ११२ लोकच काम करतात. या ११२ लोकांनीच आपल्या प्रोफेशनद्वारे आपल्या सर्वांच्या दैनंदिन गरजेमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.
तुम्हालाही प्रश्न पडला असेल की अशी कोणती नोकरी आहे. तर वाचकहो, ज्या पद्धतीने अन्नपदार्थ किंवा ड्रिंक्स तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये तयार मालाची चव घेण्यासाठी ठराविक लोक नेमलेले असतात, तशाच प्रकारे पाण्याची चव पाहण्यासाठीही एका नव्या नोकरीचा जन्म झाला आहे.
आपल्या माहितीसाठी, पाण्याची देखील चव वेगवेगळी असते. ज्यामध्ये हलके पाणी, फ्रुटी (फळ), वुडी (लाकूड), इत्यादि प्रकारच्या चवींचा समावेश आहे. जगात केवळ ११२ लोकच पाण्याची चव घेण्याची नोकरी करतात. विशेष म्हणजे संपूर्ण भारतात केवळ एका व्यक्तीला ही नोकरी मिळाली आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे, गणेश अय्यर ! ते देशातील एकमेव सर्टिफाईड वॉटर टेस्टर आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार येणाऱ्या ५-१० वर्षांच्या काळात वॉटर टेस्टिंगच्या क्षेत्रात मागणी प्रचंड वाढणार आहे.
२०१० साली गणेश अय्यर यांनी पहिल्यांदा या कोर्सबद्दल ऐकले होते. त्यानंतर त्यांनी जर्मनीच्या एका इन्स्टिट्यूट Doemens Academy in Graefelfing मधून सर्टिफिकेट कोर्स केला. अय्यर यांनी दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काळात रेस्टोरंट व्यवसायात या प्रोफेशनला मागणी येणार आहे. अय्यर हे Veen नावाच्या बेव्हरेज कंपनीच्या भारत आणि भारतीय उपखंड क्षेत्राचे ऑपरेशन डायरेक्टर आहेत.